Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 January 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ जानेवारी २०१८ दुपारी
१.०० वा.
****
पद्मावत या वादग्रस्त हिंदी चित्रपटाचं प्रदर्शन
संपूर्ण देशभरात प्रदर्शन करण्याचा आपला निर्णय सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे.
राजस्थान आणि मध्य प्रदेश सरकारनं या निर्णयाबाबत पुनर्विचार याचिका दाखल केली होती.
यावर आज झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावत, अठरा जानेवारीला
दिलेल्या आपल्या आदेशात कोणताही बदल करण्यास नकार दिला. चित्रपट प्रदर्शित झाला तर
राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल, अशी भीती, या राज्यांनी आपल्या याचिकेत
वर्तवली होती, मात्र कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचं न्यायालयानं
स्पष्ट केलं आहे. त्यामुळे हा चित्रपट परवा २५ तारखेला संपूर्ण देशभरात प्रदर्शित होण्याचा
मार्ग मोकळा झाला आहे.
****
लाभाच्या पद प्रकरणात अपात्र ठरलेल्या आम आदमी पक्षाच्या
२० आमदारांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यासंदर्भात सरकारनं काढलेली अधिसूचना
रद्द करण्याची मागणी या आमदारांनी केली आहे. या याचिकेवर न्यायालय उद्या सुनावणी घेणार
आहे.
****
गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी
आज मध्यप्रदेशच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. भोपाळ इथं राजभवनात आयोजित समारंभात मध्यप्रदेश
उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी त्यांना पदाची शपथ दिली. लोकसभेच्या
अध्यक्ष सुमित्रा महाजन, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह अनेक
मान्यवर यावेळी उपस्थित होते. सप्टेंबर २०१६ मध्ये रामनरेश यादव यांचा कार्यकाळ पूर्ण
झाल्यावर मध्यप्रदेशच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल ओमप्रकाश
कोहली यांच्याकडे सोपवण्यात आला होता.
****
विमुद्रीकरण
तसंच वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीमुळे मंदावलेली भारतीय अर्थव्यवस्था वेग घेईल
अणि २०१८ मध्ये भारताच्या आर्थिक विकासाचा दर सात पूर्णांक चार दशांश
टक्के इतका राहील, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणे निधीनं वर्तवला आहे. दावोस
जागतिक आर्थिक मंचाच्या शिखर संमेलनाच्या पार्श्वभूमीवर हा जागतिक आर्थिक अंदाज प्रकाशित
करण्यात आला. ऑक्टोबर २०१७
मध्ये भारताबाबत वर्तवलेला अंदाज या
अहवालातही कायम आहे.
****
मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग ही सुनियोजित औद्योगिक
मार्गिका ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. आज
स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं आयोजित जागतिक आर्थिक मंचावर बोलताना, मुख्यमंत्र्यांनी
सुमारे ३५ हजार कोटी रुपये उभारला जाणारा हा
सर्वात लांब द्रुतगती मार्ग ठरणार असल्याचं सांगताना, या महामार्गावर उभारले जाणारे
तीन ड्रायपोर्ट, ऑरिक सिटी, आदींबाबत माहिती दिली. या मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया
वेगानं सुरू असून, ८५ टक्के जमीन संपादित होताच, बहुधा येत्या मार्चपासून कामाला सुरुवात
होईल, अनेक संस्था या प्रकल्पात गुंतवणुकीस उत्सुक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदासह विविध पदांसाठी आज
निवडणूक होत आहे. शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांच्या जयंतीदिनी होणाऱ्या या निवडणुकीत
पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरे यांची फेरनिवड होण्याची शक्यता आहे. या पदासाठी इतर कोणीही
अर्ज भरला नसल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
सर्व
रक्तपेढ्यांनी नियमांचं पालन करुन आपल्या रक्तपेढ्या सुरळीत
चालवाव्यात, असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या धर्मादाय
संस्थांच्या विविध प्रलंबित विषयाच्या संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. रक्तपेढ्या ही
चळवळ केवळ शासनाची नसून, यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्वाची आहे, असं ते म्हणाले.
****
ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं मोटरसायकल आणि ट्रकच्या
धडकेत दुचाकीस्वार तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. आज पहाटेपूर्वी एक वाजेदरम्यान
ही दुर्घटना घडली. या प्रकरणी भिवंडी पोलिस ठाण्यात अज्ञात ट्रकचालका विरोधात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
****
मुंबईतल्या कमला मिल अग्निकांड प्रकरणी पोलिसांनी
कमला मिलचा मालक रमेश गोवानी याला अटक केली आहे. मुंबईतल्या चेंबुर परिसरातून त्याला
काल रात्री पकडण्यात आलं. या प्रकरणात कमला मिलचे भागीदार रवी भंडारी, अग्निशमन दलाचे
अधिकारी राजेंद्र पाटील आणि हुक्का बारचा मालक उत्कर्ष पांडेय यांना यापूर्वीच अटक
करण्यात आली आहे. २९ डिसेंबरला कमला मिल परिसरातल्या लागलेल्या या आगीत १४ जणांचा होरपळून
मृत्यू झाला होता.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक, आणि उच्च माध्यमिक परीक्षेमध्ये
चालू शैक्षणिक वर्षापासून शास्त्रीय कला, चित्रकला आणि लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या
विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्यात येणार आहेत. इलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण
असल्याशिवाय, इंटरमिजिएट परीक्षेचे गुण मिळणार नसल्याची अट, मार्च २०१९ च्या परीक्षेपासून
लागू करण्यात येणार आहे. तसंच राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रातही याबाबत
बदल करण्यात आला आहे.
*****
***
No comments:
Post a Comment