Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 January 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ जानेवारी २०१८ सकाळी ६.५० मि.
****
Ø संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आजपासून प्रारंभ; गुरूवारी
अर्थसंकल्प सादर होणार
Ø विकलांग
कर्मचाऱ्यांसाठीचं आरक्षण चार टक्के करण्याचा निर्णय; मानसिक आजार, बौध्दिक विकलांग आणि ॲसिड हल्ल्याचे
बळी ठरलेल्यांना केंद्र सरकारच्या
नोकरीत आरक्षण मिळणार
Ø प्रजासत्ताक दिनाच्या पथ संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला
पहिला क्रमांक
आणि
Ø ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत भारताचा
रोहन बोपन्ना आणि इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालला उपविजेते पद
****
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे.
आज सकाळी ११ वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं अधिवेशनास प्रारंभ
होईल. त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण सादर केलं जाईल. येत्या गुरुवारी एक फेब्रुवारीला
सन २०१८-१९ चा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अधिवेशनाचं हे पहिलं सत्र नऊ फेब्रुवारीपर्यंत
चालणार आहे. त्यानंतर एक महिन्याच्या सुटीनंतर ५ मार्च रोजी अधिवेशन पुन्हा सुरू होईल
आणि ते ६ एप्रिलपर्यंत चालेल. या काळात तिहेरी तलाक विधेयक आणि मागासवर्ग आयोगाला वैधानिक
दर्जा देणारं विधेयक मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न राहील.
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहकार्य करण्याचं
आवाहन पंतप्रधानांनी विरोधी पक्षांना केलं आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं सर्वपक्षीय बोलावली होती. या बैठकीनंतर संसदीय कार्यमंत्री
अनंतकुमार यांनी वार्ताहरांना माहिती दिली. ही बैठक जवळपास दोन तास चालली. सरकार कोणत्याही
मुद्यावर चर्चा करण्यास तयार असल्याचं त्यांनी सांगितलं.
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी बोलावलेल्या
बैठकीत सभागृहाचं कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन सर्व पक्षांनी
दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
विकलांग
कर्मचाऱ्यांसाठीचं आरक्षण सध्याच्या तीन टक्क्यांवरून चार टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. यामध्ये स्वमग्न,
मानसिक आजार, बौध्दिक विकलांगता आणि ॲसिड हल्ल्याचे बळी असलेल्यांना यापुढे केंद्र
सरकारच्या नोकरीत आरक्षणाचा लाभ देण्यात
येणार आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं सर्व केंद्रीय विभागांना याबाबतची
सूचना जारी केली आहे. विकलांगता अधिकार अधिनियम २०१६ पारित झाल्यावर हा निर्णय घेण्यात
आला. केंद्र सरकारच्या नोकरीत प्रत्येक पदाच्या एक टक्के भाग दृष्टीबाधित, कर्णबधीर, प्रमस्तिष्काघात -
सेरेब्रल पालसी सारखी शारीरिक स्नायू दुर्बलता, कुष्ठरोगांमधून बरे झालेले आणि ॲसिड
हल्ल्याचे बळी यांच्यासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश या विभागानं दिले आहेत.
****
कालबाह्य असलेली प्रत्येक गोष्ट सोडून देत, आवश्यक
तिथे सुधारणांचा स्वीकार केला पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
आकाशवाणीवरुन प्रसारित झालेल्या मन की बात कार्यक्रमात ते काल बोलत होते. या मालिकेचा
चाळीसावा भाग काल प्रसारित झाला. सुधारणा घडवून आणणं ही भारताची परंपरा असून, कुप्रथांचं
समाजातून समूळ उच्चाटन करण्याची प्रतिज्ञा आपण सगळ्यांनी करावी, असं ते म्हणाले.
स्वच्छ भारत अभियानाबद्दल सांगताना पंतप्रधानांनी
अकोल्यातल्या मोरणा नदी स्वच्छता उपक्रमाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
३० जानेवारी ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची
पुण्यतिथी असून, त्यांनी सांगितलेल्या मार्गावरुन पुढे जाण्याचा संकल्प करणं, यापेक्षा
मोठी श्रद्धांजली त्यांना होऊ शकणार नाही, असं पंतप्रधान म्हणाले.
****
प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील पथ संचलनात महाराष्ट्राच्या
'छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा' या संकल्पनेवर आधारित चित्ररथाला पहिला
क्रमांक मिळाला आहे. काल नवी दिल्लीत झालेल्या समारंभात संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण
यांच्या हस्ते, महाराष्ट्र सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक संजय पाटील यांना हा पुरस्कार
प्रदान करण्यात आला.
पथ संचलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात
आले होते, यामध्ये नागपूरच्या दक्षिण-मध्य केंद्राला प्रथम पुरस्कार देऊन गौरवण्यात
आलं. प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय रंग शाळेत झालेल्या आंतरराज्यीय
नृत्य स्पर्धेत महाराष्ट्राच्या पथकानं प्रथम क्रमांक मिळवला.
****
२०१९ ची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढवणार असली तरी भारतीय जनता पक्ष हा तिचा सहयोगी पक्ष शिवसेनेला असं करू देणार नाही
असं मत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, व्यक्त केलं आहे. ते काल मुंबईत
पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते. भाजप यासाठी आपली सर्व राजकीय ताकद पणाला लावेल
असंही त्यांनी पुढं नमूद केलं.
*****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
देशभरात काल सर्वत्र पोलिओ लसीकरण
मोहीम राबवण्यात आली. मराठवाड्यातल्या सर्व आठही जिल्ह्यात ही मोहिम यशस्वीपणे राबवली
गेली.
****
महाराष्ट्र टंचाई मुक्ती तसंच दुष्काळमुक्तीकडे वाटचाल
करत असल्याचं, राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी म्हटलं आहे. काल औरंगाबाद
इथं आयोजित ११व्या गुणीजन साहित्य संमेलनात ते बोलत होते. ज्येष्ठ कवी फ.मुं शिंदे
यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं. यावेळी ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक पंडित
नाथराव नेरळकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. महेश लोंढे, लक्ष्मी चव्हाण,
एकनाथ पांडवे तसंच इंद्रजित घुले यांना यावेळी धोंडिराम माने साहित्य पुरस्कार,तर संजय
झट्टू, वंदना मुळे तसंच सुभेदार बाबुराव पेठकर यांना गंगाबाई माने सामाजिक कृतज्ञता
पुरस्कार प्रदान करण्यात आले.
****
मातंग
समाजानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाची परतफेड
करून स्वाभिमानानं जगण्याचं आवाहन सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केलं
आहे. क्रांतीगुरू लहुजी साळवे विकास परिषदेच्या वतीनं काल औरंगाबाद इथं आयोजित राज्यस्तरीय मातंग समाज
मेळाव्यात ते बोलत होते. विधानसभा अध्यक्ष
हरिभाऊ बागडे, परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उत्तमराव कांबळे यांच्यासह अन्य मान्यवर
यावेळी उपस्थित होते. माजी आमदार किशनचंद तनवाणी, यांच्यासह
सहा जणांना क्रांतीगुरू लहुजी साळवे समाज गौरव पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले.
****
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत
भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याची जोडीदार टेमिया बाबोस जोडीला उपविजेतेपदावर समाधान
मानावं लागलं. काल या गटाच्या झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात क्रोएशियाच्या मॅट
पॅविच आणि कॅनडाच्या गॅब्रिएला दाब्रोव्हस्की जोडीनं बोपन्ना बाबोस जोडीचा पराभव केला.
दरम्यान या स्पर्धेच्या पुरुष एकेरीत स्वित्झर्लंडचा
रॉजर फेडरर अजिंक्य ठरला आहे. काल झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात फेडररनं क्रोएशियाच्या
मरिन सिलिकचा पराभव करत, या स्पर्धेचं अजिंक्यपद सहाव्यांदा पटकावलं. फेडररचं हे कारकिर्दीतलं
वीसावं ग्रॅण्डस्लॅम अजिंक्यपद आहे.
****
जकार्ता इथं काल झालेल्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालला उपविजेते पदावर
समाधान मानावं लागलं. अंतिम फेरीत तिचा चीनी
तैपेईच्या ताइ जू यिंगनं पराभव केला.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं
नेहरु युवा केंद्राच्या जिल्हास्तरीय युवा पुरास्कारांचं वितरण काल आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या उपस्थितित
करण्यात आलं. जिल्ह्यातल्या युवतींचा सहभाग असलेल्या वैयक्तिक, सामुहीक नृत्य स्पर्धेचही आयोजन केंद्रातर्फे करण्यात
आलं होतं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जवळपास ६७ किलोमीटर स्त्यांच्या कामांसाठी निधी
मंजूर झाला आहे. यात खामसवाडी-देवळाली, उस्मानाबाद ते झरेगाव, शेकापूर ते धारुर यासह
अन्य तीन अशा एकूण सहा विविध ठिकाणच्या मार्गांचा समावेश आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या परळी उपजिल्हा रूग्णालयात काल
एका नऊ महिन्याच्या बालिकेस बुस्टर डोस दिल्यानं तिचा मृत्यु झाल्याची घटना घडली. डोस
दिल्यानंतर दुध पिल्यावर काही वेळातच या बालिकेचा मृत्यु झाल्याचं तिच्या नातेवाइकांनी
सांगितलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सरकारनं जातीच्या आधारावर मदत न करता ती आर्थिक निकषांवर
करावी असं मत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केलं आहे.
काल उदगीर इथं त्यांच्या हस्ते डॉ. ना.य.डोळे स्मृती पुरस्कार आमदार कपिल पाटील यांना
प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. स्वार्थापोटी स्वतंत्र धर्माची मागणी केल्यापेक्षा
सर्वव्यापी विचार रूजणं महत्त्वाचं असल्याचं म्हणाले.
****
बीड जिल्ह्यातल्या किल्ले धारूरच्या ऐतीहासिक किल्ल्यात
वीस गावच्या पाच हजार नागरिकांनी एकत्र येत काल महास्वच्छता मोहीम राबवली. ४० एकरात
असलेल्या या किल्ल्यात ३८ पथकांनी किल्ल्याचा प्रत्येक भाग स्वच्छ केला.
****
नांदेड जिल्ह्यातल्या माहूर इथं वनपरिक्षेत्र कार्यालयाजवळच्या
रामगड किल्ला परिसरातल्या जंगलाला आग लागून मोठ्या प्रमाणात वनसंपदा काल जळाली. यात
काही वन्यजीवांचा होरपळून मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या भागात
जाण्यासाठी रस्ता नसल्यानं अग्निशमन दलाला आग विझवण्यात अडचण झाली होती.
*****
***
No comments:
Post a Comment