Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 January 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ जानेवारी २०१८ सकाळी ६.५० मि.
****
// आमच्या
सर्व श्रोत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक
शुभेच्छा.//
****
§
देशभरात
६९व्या
प्रजासत्ताक दिनाचा उत्साह
§
पद्म पुरस्कारांची घोषणा; प्रख्यात शास्त्रीय गायक
गुलाम मुस्तफा खान यांना पद्मविभूषण तर औरंगाबादचे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर गंगाधर
पानतावणे तसच अभय आणि राणी बंग डॉक्टर दाम्पत्याला पद्मश्री
§
लष्करी पुरस्कारांमध्ये वायुदलाचे ज्योती प्रकाश
निराला यांना मरणोत्तर अशोकचक्र, मेजर विजयंत बिस्ट यांना किर्ती चक्र, तर सार्जंट
मिलिंद खैरनार यांच्यासह १४ जणांना शौर्यचक्र पुरस्कार
आणि
§
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात,
भारताच्या दुसऱ्या डावात एक बाद ४७ धावा
****
६९ वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात उत्साह आणि जल्लोषात साजरा होत आहे. नवी दिल्ली इथं राजपथवर प्रजासत्ताक दिनाचा
मुख्य समारंभ थोड्याच वेळात सुरु होत आहे. या समारंभामध्ये तिन्ही दलांचे
जवान संचलनाद्वारे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सलामी देतील.
आजच्या या समारोहाला दहा आशियाई देशांचे राष्ट्राध्यक्ष, प्रमुख अतिथी
म्हणून उपस्थित आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथवर आज प्रथमच आशियाई देशांचे
ध्वज फडकणार आहेत. १४ राज्य आणि नऊ केंद्रीय मंत्रालयांचे चित्ररथ पथसंचलनात
सहभागी असतील. या चित्ररथांमधून देशाची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, वन्य
जीव आणि वनस्पति, त्याचबरोबर देशाच्या
सामाजिक, आर्थिक
विकासाच्या प्रगतीचं दर्शन घडवलं जाईल. देशभरातही प्रजासत्ताक दिनानिमित्त ठिकठिकाणी झेंडावंदनासह विविध
कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यात मुंबईत या दिनाचा मुख्य सोहळा होईल.
प्रत्येक जिल्ह्यात त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री झेंडावंदन करतील. शिवाय शासकीय,
निमशासकीय कार्यालय, शैक्षणिक संस्था, खाजगी संस्था कार्यालयांमध्येही प्रजासत्ताक
दिन साजरा केला जात आहे.
****
सामाजिक
आणि आर्थिक दृष्ट्या मागास नागरिकांना विकासाच्या संधी निरंतर प्राप्त करून देणं हा
आपल्या लोकशाहीचा सर्वात महत्वाचा उद्देश असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी
म्हटलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला राष्ट्राला संबोधित करतांना काल ते
बोलत होते. भारत एक विकसित राष्ट्र बनवण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण वाटचाल करत
आहोत. आपले युवक, आपल्या कल्पना, आकांक्षा आणि आदर्शाच्या बळावर देशाला प्रगतीच्या
शिखरावर नेतील. आपले देशवासी आपल्या कल्पना, आकांक्षा आणि आदर्शासाठी, आपली लोकशाही
मुल्यं आणि प्राचीन आदर्शातून नेहमीच प्रेरणा घेत राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त
केला.
****
केंद्र सरकारनं काल पद्म पुरस्कारांची
घोषणा केली. तीन पद्मविभूषण, नऊ पद्मभूषण, तर ७३ पद्मश्री पुरस्कार घोषित झाले आहेत.
दक्षिण भारतातले प्रसिद्ध संगीतकार इलिया राजा आणि प्रख्यात शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा
खान यांना पद्मविभूषण सन्मान जाहीर झाला आहे. क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी, पंकज अडवाणी,
सतार वादक अरविंद पारीख, गोव्याचे ज्येष्ठ चित्रकार लक्ष्मण पै, यांना पद्मभूषण पुरस्कार
जाहीर झाला आहे. पुण्यातले संशोधक अरविंद गुप्ता, औरंगाबादचे ज्येष्ठ साहित्यिक आणि
विचारवंत डॉक्टर गंगाधर पानतावणे, अभिनेते मनोज जोशी, अपंगासाठीच्या ऑलिम्पिक स्पर्धेत
जलतरणात सुवर्णपदक प्राप्त केलेले मुरलीकांत पेटकर, वैद्यकीय सेवेसाठी डॉ.अभय बंग आणि
राणी बंग, सामाजिक कार्यासाठी संपत रामटेके, रामेश्वरलाल काबरा, शिशिर मिश्रा आदी ७३
जणांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाला आहे.
****
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर काल राष्ट्रपतींनी
३९० लष्करी पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये वायुदलाचे ज्योती प्रकाश निराला यांना
मरणोत्तर अशोकचक्र, मेजर विजयंत बिस्ट यांना मरणोत्तर किर्ती चक्र, सार्जंट मिलिंद
खैरनार यांच्यासह १४ जणांना शौर्यचक्र पुरस्कार घोषित झाला आहे. याशिवाय २८ परम विशिष्ट
सेवा पदक, चार उत्तम युद्ध सेवा पदक, दोन बार अतिविशिष्ट सेवा पदक तसंच ४९ अतिविशिष्ट
पदकांची घोषणा करण्यात आली.
सेवा पदकांमध्ये शौर्यासाठी १० युद्ध सेवा पदक, दोन बार
सेना पदक, ८६ सेना पदक, एक लघु सेना पदक, तीन वायु सेना पदकांचीही घोषणा करण्यात आली
आहे. कर्तव्यासाठी देण्यात येणाऱ्या पदकांमध्ये दोन बार सेना पदक, १३ लघु सेना पदक,
१४ वायु सेना पदक, एक बार विशिष्ट सेवा पदक आणि १२१ विशिष्ट सेवा पदकांचा समावेश आहे.
****
तीन महिलांसह ५० कामगारांना काल २०१६ चे श्रम पुरस्कार
जाहीर करण्यात आले. यामध्ये १२ जणांना श्रम भूषण, १८ जणांना श्रम वीर तर २० जणांना
श्रमश्री पुरस्कार देण्यात आले आहेत. यात पुण्याच्या मनोज कुमार अंछोर यांना श्रमश्री
पुरस्कार घोषित झाला आहे.
****
पद्मावत चित्रपट काल राज्यभरात कडेकोट पोलिस बंदोबस्तात
प्रदर्शित झाला. काही ठिकाणी या चित्रपटाला विरोध करण्यात आला. औरंगाबादनजीक लासूर
स्टेशनजवळ विरोधकांनी एका बसवर दगडफेक केली, जालना इथं चित्रपटगृहांवर तर परभणी इथं
दोन एसटी बसेसवर अज्ञात व्यक्तिंनी दगडफेक केली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
राज्य सरकारनं न्यायालयीन शुल्कामध्ये वाढ केल्याच्या
निषेधार्थ राज्यातल्या अनेक ठिकाणच्या वकील संघांनी न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार
टाकला. लातूर इथं जिल्हा वकील मंडळानं हे शुल्क
कमी करावं अशा मागणीचं निवेदन निवासी जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांना दिलं. तर
नाशिक इथं दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करताना वकिलांनी दरवाढीच्या
शासन निर्णयाची होळी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या कसोटी
क्रिकेट मालिकेतल्या अखेरच्या तिसऱ्या सामन्यात, काल दुसऱ्या दिवस अखेर, भारतानं दुसऱ्या
डावात एक बाद ४७ धावा केल्या आहेत. त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १९४ धावांत
संपुष्टात आला. भारतानं आपल्या पहिल्या डावात सर्व गडी बाद एकशे सत्याऐंशी धावा केल्या
आहेत. मुरली विजय १३ तर लोकेशराहुल १६ धावांवर खेळत आहे.
****
राज्य परीवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसंदर्भात
शासनानं स्थापन केलेल्या समितीचा अहवाल या कर्मचाऱ्यांच्या कुठल्याही संघटनेला मान्य
न झाल्यानं, महामंडळाच्या बीड आगारात या अहवालाची होळी करून निषेध नोंदवण्यात आला.
महाराष्ट्र एस टी वर्कर्स काँग्रेस, अर्थात इंटक, या संघटनेनं ही माहिती दिली. हा अहवाल
तयार करताना या समितीनं कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली नाही, तसंच कामगारांच्या
मागण्यांकडे दुर्लक्ष केलं, असा आरोप इंटकनं केला आहे.
****
परभणी शहरातल्या प्रस्तावित रात्र-निवारा इमारतीचं भूमीपूजन
परभणीच्या महापौर मीना वरपूडकर यांच्या हस्ते काल करण्यात आलं. या रात्र निवाऱ्यामुळे
शहरातल्या बेघर, अनाथ, निराधार वृद्ध आणि अपंग नागरिकांची राहण्याची आणि जेवण्याची
सोय होईल, असं महापौर म्हणाल्या. लवकरच ही इमारत पूर्ण करून लोकार्पण करण्यात येईल,
असं वरपूडकर यांनी सांगितलं.
****
भोकरदन तालुक्यातल्या कृषी कार्यालयातला कृषी सहायक संदीप
दळवी याच्यावर पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याबद्दल जालन्याच्या लाचलुचपत
प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराचं शेततळ्याचं अनुदान सरकार दफ्तरी
परत न पाठवण्यासाठी दळवी यानं ही लाच मागितली होती.
****
राष्ट्रीय मतदार दिना निमित्त काल राज्यभरात विविध कार्यक्रम
घेण्यात आले. राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांनी मंत्रालयातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना
शपथ दिली. राज्यात मतदार दिनाच्या मुख्य कार्यक्रमात नंदुरबार इथं, मुख्य निवडणूक अधिकारी
अश्विनीकुमार यांच्या उपस्थितीत पहिल्या मतदार साक्षरता क्लबचं उद्घाटन झालं. मराठवाड्यात
औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली इथंही विविध कार्यक्रम
घेण्यात आले.
****
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला उत्कृष्ट व्यवसायवृद्धीसाठीचा
बँको पुरस्कार जाहीर झाला आहे. तेलंगणाचे उपमुख्यमंत्री मोहम्मद अली यांच्या उपस्थितीत
हैदराबाद इथं हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
//*********//
No comments:
Post a Comment