आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
०५ डिसेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. डॉक्टर आंबेडकर यांनी राष्ट्राला सामाजिक, आर्थिक
आणि संवैधानिक दूरदृष्टी दिली, असं पंतप्रधानांनी
आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी आज
दादर इथे चैत्यभूमीवर डॉक्टर आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहिली. बाबासाहेबांच्या,इंदू
मिल इथल्या प्रस्तावित स्मारकाचं काम एक महिन्यात सुरू होईल, असं मुख्यमंत्री यांनी
यावेळी सांगितलं. चैत्यभूमी इथल्या स्मारकावर
अनुयायांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे.
****
भारतीय रिझर्व्ह बँक चालू आर्थिक वर्षातलं पाचवं द्वैमासिक
पतधोरण आज जाहीर करणार आहे. या आधीच्या,ऑक्टोबरच्या
पतधोरणात बँकेनं व्याजदरात काहीही बदल केले नव्ह्ते.
****
रोहिंग्या समुदायाच्या लोकांना म्यानमारला परत पाठवण्यासंदर्भात
दाखल झालेल्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालय पुढच्या महिन्याच्या एकतीस तारखेला
सुनावणी घेणार आहे.भारतात आलेल्या चाळीस हजारहून जास्त रोहिंग्या निर्वासितांना परत
पाठवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयासंदर्भात दोन रोहिंग्या निर्वासितांच्या याचिकांसह
अन्य काही याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत.
*****
ओखी चक्रीवादळाचा जोर आता ओसरला असून त्याचं कमी दाबाच्या
पट्ट्यात रूपांतर झालं आहे. गुजरातमध्ये आता वादळाचा धोका उरलेला नसला तरी राज्य प्रशासनानं
कोणत्याही संकटाचा सामना करण्याची सिद्धता केली असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं.
गुजरातसह मध्य प्रदेश आणि उत्तर कोकणात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची
शक्यता हवामानखात्यानं वर्तवली आहे.
****
औरंगाबाद शहरातल्या जुना बाजार इथल्या मुख्य टपाल
कार्यालयात आधार नोंदणी केंद्र सुरू झालं आहे. औरंगाबाद शहरातल्या नागरिकांनी याचा
लाभ घेण्याचं आवाहन औरंगाबाद विभागाचे प्रवर अधीक्षक ए एस रसाळ यांनी केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथला विद्यार्थी
सनी पंडित याची महाराष्ट्राच्या रणजी क्रिकेट संघात निवड झाली आहे. सनी यानं नारायणराव
वाघमारे वरिष्ठ महाविद्यालयाच्या तसंच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या
क्रिकेट संघाचं अनेक स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व केलं आहे.
****
No comments:
Post a Comment