Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 December 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ डिसेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रीय
लोकशाही आघाडी सरकारच्या काळात महागाई दरात सातत्यानं घट झाल्याचं प्रतिपादन अर्थमंत्री
अरुण जेटली यांनी केलं आहे. महागाईबाबत काँग्रेसकडून करण्यात आलेल्या आरोपांना हे उत्तर
देताना त्यांनी तुलनात्मक आकडेवारीही दिली आहे. २०१४ मध्ये पाच पूर्णांक नऊ टक्के इतका
असलेला ग्राहक मूल्य महागाई दर ऑक्टोबर २०१७ मध्ये दोन पूर्णांक सात टक्क्यांवर आला
असल्याचं जेटली यांनी म्हटलं आहे.
****
चीन पाकिस्तान
आर्थिक कॉरिडॉरअंतर्गत पाकिस्तानात निर्माण होत असलेल्या तीन प्रमुख रस्ते प्रकल्पांचा
निधी काही काळासाठी रोखण्याचा निर्णय चीननं घेतला आहे. या कामातल्या कथित भ्रष्टाचारांच्या
वृत्तानंतर चीननं हा निर्णय घेतला असून, याचा पाकिस्तानातल्या रस्ते प्रकल्पांवर मोठा
परिणाम होणार आहे.
****
मायक्रोब्लोगिंग
माध्यम ट्विटरनुसार, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक
लोकप्रिय जागतिक नेता आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप हे चार कोटी एक्केचाळीस
लाख फॉलोअर्स सह लोकप्रियतेत पहिल्या क्रमांकावर असून, तीन कोटी पंचाहत्तर लाख फॉलोअर्ससह
मोदी दुसर्ऱ्या क्रमांकावर असल्याचं ट्विटरनं काल जाहीर केलं आहे.
****
बंगालच्या
खाडीत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अंदमान आणि निकोबारमध्ये मोठ्या प्रमाणात
पाऊस सुरू आहे. आज सकाळपर्यंत पोर्ट ब्लेयर शहरात पंचाण्णव मिलिलिटर पावसाची नोंद झाली
आहे.हा कमी दाबाचा पट्टा येत्या अट्ठेचाळीस तासात अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे.
****
भूपृष्ठावरून
आकाशात मारा करणाऱ्या आकाश या भारतीय क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली आहे. काल ओडिशातल्या चंडीपूर
इथे ही चाचणी घेण्यात आली. जमिनीवरून आकाशात मारा करणारं कुठल्याही प्रकारचं क्षेपणास्त्र
बनवण्याची क्षमता आता भारतानं मिळवली आहे.या क्षेपणास्त्राचा लष्करात समावेश करण्यात
येत आहे.
****
डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यात आज विविध कार्यक्रमांचं
आयोजन होत आहे. औरंगाबाद शहरात डॉक्टर आंबेडकर यांच्या भडकल गेट इथल्या पुतळ्याला विविध पक्षसंघटनांच्या
वतीनं अभिवादन करण्यात येत आहे.तर, या दिनाच्या औचित्यानं लातूर इथे राष्ट्रीय स्वयंसेवक
संघाच्या लोकसेवा मंडळाच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं असल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जालना इथल्या
नियोजित सीड पार्ककरता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं जालना परिसरात एकशे तीस
एकर जमीन विकसित करून,बियाणे उद्योगांच्या उभारणीकरता उपलब्ध करून द्यावी, असा आदेश
राज्य शासनानं जारी केला आहे.ही जमीन महामंडळानं उपलब्ध करून दिल्यानंतर तिथे,महाबीज,बीज
प्रमाणीकरण यंत्रणा, महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळ आणि कृषी विभाग,यांनी
बियाणे उद्योगासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असा आदेशही
शासनानं जारी केला आहे.
****
गडचिरोली
जिल्ह्यातल्या सिंगानूर वनक्षेत्रात पोलिसांशी झालेल्या चकमकीत सात नक्षलवाद्यांचा
मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. मृत नक्षलवाद्यांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे.
****
राज्यातल्या
साधा यंत्रमाग धारकांना त्यांनी घेतलेल्या कर्जाच्यावरच्या व्याजात पाच टक्के सवलत
अनुदान देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे.दुष्काळ आणि मंदीमुळे अडचणीत आलेल्या वस्त्रोद्योगाला
चालना देण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे.नियमितपणे कर्जाचे हप्ते भरणाऱ्या पात्र
यंत्रमागधारकांसाठी ही सवलत अनुदान योजना पुढच्या पाच वर्षांपर्यंत सुरू राहणार आहे.
****
बुलढाणा
जिल्ह्यातल्या मलकापूर आणि नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुलै आणि ऑगस्ट २०१६
मध्ये कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यासाठी शासनानं जाहीर केलेलं अनुदान लाभार्थ्यांना
मिळण्याला सुरुवात झाली आहे.ज्या शेतकऱ्यांनी आपले बँक़ खाते क्रमांक कृषी उत्पन्न बाजार
समितीकडे आत्तापर्यंत दिलेले नाहीत त्यांनी ते त्वरित द्यावेत, असं आवाहन जिल्हा उपनिबंधकांनी
केलं आहे. ऑक्टोबर्, नोव्हेंबर आणि डिसेंबर २०१६ मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये
सोयाबीनची विक्री करणाऱ्या शेतकऱ्या साठी सरकारनं जाहीर केलेलं अनुदानही लवकरच लाभार्थ्यांच्या
बँकखात्यांमध्ये जमा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या
भोकरदन तालुक्यात गिरजा-पूर्णा नदीपात्रातून सात हजार ब्रास वाळू साठा जप्त करण्यात
आला. तहसीलदार योगिता कोल्हे यांच्यासह पंधरा अधिकाऱ्यांच्या पथकानं काल संध्याकाळी
ही कारवाई केली. जप्त वाळूसाठ्याची किंमत दोन कोटी ८० लाख रुपये आहे
*****
No comments:
Post a Comment