Thursday, 7 December 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 07.12.2017 06.50AM

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 December 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ डिसेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.
****
** डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बासष्टाव्या पुण्यतिथीनिमित्त काल राज्यभरात विविध कार्यक्रमांतून अभिवादन
** सर्व शासकीय कार्यालयांमध्ये इंग्रजी आणि हिंदी बरोबरच मराठी भाषेचा वापर करण्याचे निर्देश देणारं परिपत्रक जारी
** गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांशी झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार
आणि
** भारत आणि श्रीलंकेदरम्यान तिसरा कसोटी क्रिकेट सामना अनिर्णित; मालिका विजयासह भारतीय संघाचा सलग नऊ कसोटी मालिका विजयाचा विक्रम
****
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बासष्टाव्या पुण्यतिथीनिमित्त काल राज्यभरात विविध कार्यक्रमांतून त्यांना अभिवादन करण्यात आलं. राज्यपाल सी. विद्यासागर राव, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी काल सकाळी मुंबईत दादर इथं चैत्यभूमीवर डॉक्टर आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहिली.
इंदू मिल इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम महिनाभरात सुरू करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं समतेचं राज्य निर्माण करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची मोठी गर्दी झाली होती. औरंगाबादसह मराठवाड्यात ठिकठिकाणी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं. औरंगाबादमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं सकाळी विद्यापीठ ते भडकल गेट अशी समता शांती पदयात्रा काढण्यात आली. लातूरमध्ये पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार डॉक्टर सुनील गायकवाड आणि महापौर सुरेश पवार यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली. नांदेड इथं खासदार अशोक चव्हाण यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं, या निमित्तानं महारक्तदान आणि सर्वरोगनिदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. जालना इथं राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते तर परभणी इथं महापौर मीना वरपूडकर यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. हिंगोली जिल्हा वकील संघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं.
****
विधान परिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान होत आहे. भाजप शिवसेनेचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप माने यांच्यात ही निवडणूक होत आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या राजीनाम्यानं ही जागा रिक्त झाली आहे.
****
विविध शैक्षणिक संस्थामधलं शैक्षणिक शुल्क एकसमान असावं, यासाठी शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियमात सुधारणा करणार असल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं आहे. शैक्षणिक शुल्क सुधारणेचं प्रारुप तयार करण्यासाठी नियुक्त समितीनं काल याबाबतचा अहवाल राज्य शासनाला सादर केला. अहवालाचा अभ्यास करुन येत्या मार्च पूर्वी अधिनियमात बदल करण्यात येईल, असं तावडे यांनी सांगितलं.
****
केंद्र शासनाच्या त्रि-भाषा सूत्रानुसार राज्यात केंद्र शासनाची कार्यालयं, बँका, विमा कंपन्या, रेल्वेसह अन्य कार्यालयांमध्ये इंग्रजी आणि हिंदी बरोबरच मराठी भाषेचा वापर करावा, असे निर्देश देणारं परिपत्रक राज्यशासनानं जारी केलं आहे. मौखिक तसंच लेखी व्यवहार, संवाद, सर्व ऑफलाईन आणि ऑनलाईन सेवा तसंच सर्व प्रकाराच्या पावत्या आणि दस्तऐवजांसाठी मराठी भाषेचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
****
राज्यातल्या यंत्रमाग धारकांना त्यांनी घेतलेल्या कर्जाच्यावरच्या व्याजात पाच टक्के सवलत अनुदान देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. नियमितपणे कर्जाचे हप्ते भरणाऱ्या पात्र यंत्रमागधारकांसाठी ही सवलत अनुदान योजना पुढच्या पाच वर्षांपर्यंत सुरू राहणार आहे.
****
औद्योगिक क्षेत्राच्या सहभागातून विविध सामाजिक क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवण्याच्या उद्देशाने राज्यशासनानं काल विविध कंपन्यांबरोबर ३४ सामंजस्य करार केले. आरोग्य, पोषण, वन्यजीव संवर्धन, पशुसंवर्धन, कौशल्य विकास, जलसंधारण, आदी क्षेत्रात काम करण्याबाबत हे करार करण्यात आल्याचं शासनाकडून सांगण्यात आलं.
****
मुंबई उच्च न्यायालयानं स्थावर मालमत्ता नियमन आणि विकास अधिनियम - अर्थात रेरा - ची वैधता कायम ठेवली आहे. या अधिनियमाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणीनंतर न्यायालयानं हा निर्णय दिला. यानुसार सगळ्या विकासकांनी नियामक प्राधिकरणाकडे नोंदणी करणं आवश्यक आहे. घरांचा ताबा देण्यास विलंब झाल्यास ग्राहकांना मोबदला देण्याची, तसंच निर्धारित वेळेत बांधकाम पूर्ण न केल्यास विकासकांची नोंदणी रद्द करण्याची तरतूद या अधिनियमात आहे.
****
चालू आर्थिक वर्षातलं पाचवं द्वैमासिक पतधोरण रिजर्व्ह बँकेनं जाहीर केलं. रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात बँकेनं काहीही बदल केला नसून, पुढील दोन तिमाहींमध्ये महागाई दर चार पूर्णांक तीन ते चार पूर्णांक सात टक्क्यांच्या दरम्यान राहील, असा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, रोखरहित व्यवहारांना चालना देण्यासाठी बँकेनं मर्चंट डिस्काउंट दर नव्यानं निश्चित केले आहेत. येत्या एक जानेवारीपासून नवे दर लागू होतील.
****
गडचिरोली जिल्ह्यातल्या सिंगानूर वनक्षेत्रात पोलिसांशी झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी मारले गेले. यामध्ये पाच महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. कल्लेड जंगलात नक्षलविरोधी अभियानादरम्यान काल सकाळच्या सुमारास नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हे नक्षलवादी मारले गेले.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
राज्यात सध्या सुरु असलेल्या सर्व उपसा जलसिंचन योजना येत्या दोन वर्षात सौर ऊर्जेवर आणण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरण तसंच महाऊर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. मंत्रालयात या संदर्भात आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. या योजनेसाठी एक समिती गठित होणार असून या समितीला महिनाभरात आपला अहवाल सादर करायचा आहे. या सर्व योजनांना दीड हजार मेगा वॅट वीज लागणार असून शासकीय, खाजगी किंवा सिंचन विभागांच्या उपलब्ध जमिनीवर हा प्रकल्प होईल असं बावनकुळे म्हणाले.
****
राज्य परिवहन महामंडळ आपल्या प्रवाशांसाठी रोखरहीत स्मार्ट कार्ड योजना सुरू करणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. येत्या महाराष्ट्र दिनापासून ही योजना सुरू होईल.
****
संगीत क्षेत्रात अत्यंत मानाचा समजला जाणारा तानसेन पुरस्कार ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित उल्हास कशाळकर यांना जाहीर झाला आहे. दोन लाख रुपये आणि स्मृती चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. कशाळकर यांना २००८ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि २०१० साली पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं आहे.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर खेळला गेलेला तिसरा आणि अंतिम कसोटी सामना अनिर्णित राहिला. पाचव्या दिवसअखेर श्रीलंकेच्या पाच बाद २९९ धावा झाल्या. भारतानं ही तीन कसोटी सामन्याची मालिका एक - शून्य अशी जिंकत सलग नऊ कसोटी मालिका विजयाचा विक्रम केला. या कसोटीत सहावं द्वी-शतक झळकावणारा कर्णधार विराट कोहली सामनावीर तसंच मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
दरम्यान, श्रीलंकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका रविवारपासून सुरू होत असून, पहिला सामना हिमाचल प्रदेशात धर्मशाला इथं होणार आहे.
****
नांदेड नजिक मालटेकडी रेल्वे स्थानकाजवळच्या उड्डाण पुलाच्या कामाकरता उद्या आणि परवा तसंच, १० आणि १२ तारखेला दररोज चार तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावर धावणारी अदिलाबाद - नांदेड एक्स्प्रेस गाडी अंशत: रद्द राहील, तर काचीगुडा-मनमाड, काचीगुडा-नरखेड आणि इंटर सिटी एक्सप्रेस या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होईल, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं दिली आहे.
****
परभणी जिल्ह्यात सेलु इथं बसस्थानक तसंच रेल्वेस्थानक परिसरात अन्न औषधी प्रशासनानं धाड टाकून गुटखा तसंच पानमसाल्याचा साठा जप्त केला. या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात पोलिसांनी एका टेम्पोमधून २१ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. कर्नाटकमधून हा गुटखा आणला जात होता, या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
ऊस दर जाहीर करण्याच्या मागणीसाठी बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी काल आंदोलन केलं. ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांच्या चाकातली हवा यावेळी सोडून देण्यात आली. दरम्यान, ऊस दरवाढीच्या मागणीसाठी नांदेड, हिंगोली तसंच परभणी जिल्ह्यात आज रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 27.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 27 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...