आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
११ डिसेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता
****
राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर इथं सुरु झालं. सुमारे दोन आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनात तेरा नवीन विधेयकं तसंच १२ अधिसूचना मांडण्यात येणार आहेत. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी आज विरोधी पक्षांनी विधान भवनाबाहेर हल्लाबोल आंदोलन करत शेतकरी कर्जमाफी, कपाशीला बोंड अळीचा प्रादुर्भाव आदी मुद्यांवर सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
दरम्यान, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल चहापानानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, सरकार अधिवेशनासाठी सज्ज असल्याचं सांगितलं. विरोधकांनी केलेल्या विविध आरोपांनाही त्यांनी यावेळी उत्तर दिलं. राज्यातले सर्व प्रश्न चर्चेनं सोडवण्यात येतील, असं ते म्हणाले.
****
जम्मू काश्मीरमध्ये बारामुल्ला जिल्ह्यात बोमाई परिसरात हिंशू इथं सुरक्षा दलांबरोबर काल रात्री उशीरा झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. शोधमोहीमेदरम्यान ही चकमक झाल्याचं राज्याचे पोलीस महासंचालक एस पी वेद यांनी सांगितलं.
****
नवी दिल्लीत आज रशिया, भारत आणि चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत परस्परहिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता असून, त्रिपक्षीय देवाणघेवाण आणि सहकार्य याबद्दलही चर्चा अपेक्षित आहे. या बैठकीसाठी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लॅव्हरोव्ह आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत.
****
मराठवाड्यासह विदर्भातल्या दुग्धविकास प्रकल्पाच्या प्रगतीचा काल नागपूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. या दोन भागातल्या दहा जिल्ह्यांमध्ये दुग्धोत्पादन वाढ विशेष कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यात ३४९, नांदेड जिल्ह्यात ३०९, उस्मानाबाद ४९४ आणि जालना जिल्ह्यात ४०१ गावांमध्ये हा कार्यक्रम राबवण्यात येत असून, यापैकी काही गावांमध्ये दूध संकलन सुरुही झालं आहे.
****
परभणी इथं काल आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीरात दोन हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. रुग्णांच्या रक्त तपासणीसह ॲलोपॅथी, आयुर्वेदीक आणि होमिओपॅथीचे उपचार या शिबीरातून करण्यात आले. शिवसेना आमदार डॉक्टर राहूल पाटील यांच्या पुढाकारातून शहरातील विविध प्रभागात असं शिबीर घेण्यात येत आहे.
*****
No comments:
Post a Comment