Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 11 December 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ डिसेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर इथं सुरु झालं. पहिल्याच दिवशी
विरोधी पक्षांनी विधान भवनाबाहेर हल्लाबोल आंदोलन करत शेतकरी कर्जमाफी, बोंड अळीमुळे
नुकसान झालेल्या कपाशीला नुकसान भरपाई, ऊसाला हमीभाव, शेतकरी आत्महत्या आदी मुद्यांवर
सरकार विरोधात घोषणाबाजी केली. शेतकरी कर्जमाफीची रक्कम अद्याप शेतकऱ्यांना प्राप्त झाली नसल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी यावेळी केला. या विविध प्रश्नांवर अधिवेशनादरम्यान आपण सरकारला जाब विचारणार
असून, सरकारला उत्तर द्यावं लागेल, असं ते म्हणाले.
सरकार चालवण्यात भारतीय जनता पक्षाला अपयश आल्याचं विधानसभेतले विरोधी पक्षनेते
राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले. सुमारे दोन आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनात तेरा
नवीन विधेयकं तसंच १२ अधिसूचना मांडण्यात येणार आहेत.
****
परराष्ट्र व्यवहार
मंत्री सुषमा स्वराज यांनी आज नवी दिल्ली इथं चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची
भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी परस्पर हितांच्या मुद्यांवर चर्चा केल्याचं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे. रशिया, चीन आणि भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या दिल्लीत
होणाऱ्या बैठकीच्या
पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली. तत्पूर्वी या मंत्र्यांनी आज सकाळी राष्ट्रपती रामनाथ
कोविंद यांची भेट घेतली.
****
दिवाळखोरी विषयक संहितेतले तक्रार निवारण
प्रक्रियेसंबंधीचे नियम जारी करण्यात आले आहेत. भारतीय दिवाळखोरी आणि बुडीत कर्ज मंडळामार्फत वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक पध्दतीनं तक्रार निवारण
व्हावं, दोषी सेवा- पुरवठादार सुटून जाऊ नयेत तसंच निरपराध सेवा-पुरवठारदारांना
प्रक्रियेचा त्रास होऊ नये, अशी खबरदारी या नियमांमध्ये घेण्यात आली आहे. यामुळे
आता एखाद्या सेवा- पुरवठादाराविरुध्द तक्रार दाखल करणं, कर्ज
घेणाऱ्या आणि देणाऱ्यांना तसंच सेवा पुरवठादारांनाही शक्य होणार आहे.
****
केंद्र सरकार २०१७-१८ ते
२०१९-२० या कालावधीत एक हजार ७५६ कोटी
रुपये खर्च करुन ‘खेलो इंडिया’ कार्यक्रम सुरु करणार असल्याचं केंद्रीय युवक कल्याण
आणि क्रीडा राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी म्हटलं आहे. भुवनेश्वर
इथं आयोजित केलेल्या युवा संवर्धन उत्सवात ते काल बोलत
होते. २०१८ हे वर्ष क्रीडा वर्ष म्हणून साजरं केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. देशभरातले २० विद्यापीठं आणि दीडशे जिल्ह्यातल्या
निवडक शाळांना क्रीडा नैपुण्य केंद्र म्हणून प्रोत्साहन देण्याचा खेलो इंडिया अभियानाचा
उद्देश असून, यामध्ये १०
ते १८ वयोगटातल्या
२० कोटी मुलांना सामावून घेतलं जाईल असं ते म्हणाले.
****
सातारा जिल्ह्यातल्या
कोयना परिसरात एकोणीसशे सदूसष्ठ मध्ये झालेल्या भूकंपाला आज ५० वर्ष पूर्ण झाली. या
भूकंपात मृत्यू पावलेल्या १७५ नागरिकांना आज कोयनानगर इथं श्रद्धांजली अर्पण करण्यात
आली. या भूकंपाची तिव्रता सहा पूर्णांक सहा रिश्टर स्केल इतकी होती.
****
औरंगाबाद इथं आज 'निवारा हक्क कायदा आणि त्याचं बदलतं स्वरुप' या विषयावरच्या राज्यस्तरीय
चर्चासत्राचं उद्घाटन राज्य ग्राहक मंचाचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांच्या हस्ते झालं.
स्थावर मालमत्ता नियमन संस्था - रेरा कायदा जसा पिडीतांना न्याय देतो, त्याच पद्धतीनं
बांधकाम व्यवसायिकांनाही लाभदायक असल्याचं मत देशपांडे यांनी व्यक्त केलं. या चर्चासत्रात
विधी क्षेत्रातले तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
****
छत्रपती शिवाजी
महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातल्या ७८ हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत
४१८ कोटी रुपयांची कर्जमाफीची रक्कम मिळाली आहे. आणखी एक लाख ७७ हजार शेतकरी कर्जमाफीच्या
प्रतिक्षेत असून, यामध्ये शेतकऱ्यांनी भरलेल्या कर्जमाफीच्या अर्जांपैकी ५० टक्के अर्ज
बाद झाले आहेत. जिल्हयात ७७ हजार ३२९ शेतकऱ्यांसाठी ४१८ कोटी २६ लाख रुपये विविध बँकांना
प्राप्त झाल्याची माहीती जिल्हा प्रशासनानं दिली आहे
****
जपानमधल्या वाको
सिटी इथं सुरु असलेल्या दहाव्या आशियाई अजिंक्यपद दहा मीटर रायफल पिस्तुल स्पर्धेत
भारताच्या जितू राय आणि हिना सिंद्दूनं कांस्यपदकं पटकावली. जितूनं पुरुषांच्या दहा
मीटर एअर पिस्तुल प्रकारात वैयक्तीक कांस्य पदक मिळवलं आणि शहजार रिझवी आणि ओंकार सिंग
यांचा समावेश असलेल्या भारतीय सघांला सांघीक सुर्वण पदकंही मिळवून दिलं. हीनानं महिलांच्या
दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात वैयक्तीक कांस्य
पदक पटकावून सांघीक रौप्य पदक जिंकण्यास मदत केली. पुरुषांच्या
ज्युनिअर गटानंही या स्पर्धेत सांघीक रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत
चार सुर्वण, सहा रौप्य आणि सात कांस्य पदकांसह एकूण सतरा पदकांची कमाई केली.
*****
No comments:
Post a Comment