Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 12 December 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ डिसेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.
****
** विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकार आणि विरोधक आक्रमक; बोंडआळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना
मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
** कर्जमाफीसाठी १५ हजार कोटी रूपयांची पुरवणी मागणीत
तरतूद
** काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राहुल गांधी
यांची बिनविरोध निवड
आणि
** यशवंतराव चव्हाण
राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा
****
****
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास कालपासून
नागपूर इथं प्रारंभ झाला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकार
आणि विरोधक आक्रमक झाले. गेल्या १५ वर्षात आघाडी सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला केवळ
पानं पुसण्याचंच काम केलं असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा त्याचाच परिणाम आहे, असा
हल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विरोधकांवर केला.
विधानसभेत कामकाजाला
सुरूवात होताच, सभागृहाचं सर्व कामकाज रद्द करून कर्जमाफीवर चर्चा करण्याची मागणी विरोधी
पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. मात्र त्यांचा हा प्रस्ताव नाकारल्यानं
विरोधकांनी सभागृहात सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बोंडआळी प्रादुर्भावासंदर्भात
संबंधित बियाणं कंपनीवर गुन्हा दाखल केला असून, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा कंपन्या
आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधीतून मदत देणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी यावेळी
बोलतांना सागितलं.
***
विधानपरिषदेतही शेतकरी कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या अन्य प्रश्नांसंदर्भात
विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत प्रचंड गदारोळ केला. सरकार याच अधिवेशनात
चर्चेला तयार आहे, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतरही, विरोधकांनी
गदारोळ चालूच ठेवल्यामुळे सदनाचं कामकाज दोनदा
दहा मिनिटांसाठी, त्यानंतर १५ मिनिटांसाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. त्यापूर्वी सभागृहाचं कामकाज सुरू होताच नव नियुक्त
सदस्य प्रसाद लाड यांचा शपथविधी झाला.
****
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काल एकूण २६ हजार ४०२ कोटी, ३२
लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधान परिषदेत
मांडण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या कर्ज मुक्तीसाठी असलेल्या, १५ हजार कोटी रुपयांच्या
मागण्यांचा त्यात समावेश आहे. या पुरवणी मागण्यांवर या अधिवेशनाच्या काळात सभागृहात
चर्चा होईल. राज्याची आर्थिक स्थिती पाहता, एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुरवणी मागण्या
मांडल्या बद्दल विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली.
****
दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काल विदर्भ राज्य आंदोलन समितीनं
विदर्भ बंदची हाक दिली होती. नागपुर आणि यवतमाळ जिल्ह्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद
मिळाला, तर गडचिरोली जिल्ह्यात शाळा महाविद्यालयं, तसंच दुकानं बंद ठेवून कडकडीत बंद
पाळण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत
भाजपा नेत्यांनी दिलेल्या वेग वेगळ्या
विदर्भाच्या आश्वासनावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांच्या
नेतृत्वाखाली काल नागपुरात ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आलं. यामुळे नागपूर शहरात
येणारी, आणि शहराबाहेर जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
दरम्यान, शेतकरी कर्जमाफी, बोंडअळी मुळे कापसाचं झालेलं नुकसान, आणि यवतमाळ
इथं विषारी कीटक नाशकांमुळे बळी गेलेल्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल काँग्रेस,
राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सह सर्व विरोधी पक्ष आज एकत्रीतपणे नागपूरच्या विधान
भवनावर मोर्चा काढणार आहेत. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते, गुलाम नबी आझाद, आणि राष्ट्रवादी
काँग्रेसचे अध्यक्ष, शरद पवार मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत.
****
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून,
राहुल गांधी यांची बिनविरोध निवड झाली आहे. पक्षाचे निवडणूक प्रमुख मुलापल्ली रामचंद्रन
यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. येत्या १६ डिसेंबर रोजी ते
अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतील. अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांचा एकमेव अर्ज आला होता.
काँग्रेसचे ते १८ वे अध्यक्ष असून, अध्यक्षपद भूषवणारे गांधी घराण्यातले सहावे व्यक्ती
आहेत.
****
हे
बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
मराठी भाषा विभागाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या,‘ स्वर्गींय
यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची’ घोषणा, काल मराठी भाषा मंत्री विनोद तावडे
यांनी केली. २०१६ साठी जाहीर झालेले हे पुरस्कार ३५ वाङमय प्रकारात वेगवेगळ्या लेखक
आणि साहित्यिकांना देण्यात येणार आहेत. प्रौढ
वाड्मय प्रकारातील पुरस्कार विजेत्यांमध्ये औरंगाबादचे विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर,
प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी,
डॉ. जनार्दन वाघमारे, बब्रुवान रूद्रकंठवार, डॉ. सुरेश चौथाईवाले, आदींचा समावेश आहे तर बाल वाङ्मय गटात सोनाली गावडे, डॉ. सतिष साळुंके, डॉ. विशाल तायडे, माया
धुप्पड आदींना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. प्रथम प्रकाशन प्रकारात नांदेडचे प्रा.के.डी.
वाघमारे, तसंच, बीडचे बाळू दुगडुमवार यांचा समावेश आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण आपेगांव विकास प्राधिकरणाच्या
रस्त्याच्या कामात झालेल्या गैरव्यवहारामधल्या दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची
कारवाई करण्याचे, तसंच, निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्याचे
आदेश, प्राधिकरणाचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी काल दिले. प्राधिकरणांतर्गत
सुरु असलेल्या विविध विकास कामांचा आढावा काल त्यांनी घेतला,
प्राधिकरणाची सर्व कामं प्राधान्यानं पूर्ण करण्याची सूचनाही
त्यांनी यावेळी दिली.
****
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी काल सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी
१ जानेवारी २०१६ पासून लागू कराव्यात, सेवानिवृत्तीचं वय ६० करावं, पाच दिवसांचा आठवडा
करावा यासह विविध मागण्यांसाठी काल राज्यभर निदर्शन केली. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी,
हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद आणि लातूर इथं कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
निदर्शनं केली.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या खुलताबाद तालुक्यामधल्या रसूलपूरा
गावात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत तीन बंधांऱ्यांचं काम करण्यात आलं. यामुळे शेतकऱ्यांना
झालेल्या लाभाबद्दल सांगताहेत शेतकरी अलिम नवाज पठाण ....
माझ्या
कडे 15 ते 20 म्हशी आहेत. आणि 2014 ते 2015 मध्ये जलयुक्त शिवारचे 3 केट्या झालेल्या
आहेत. ह्या केट्याच्या पाण्यामूळे आमचा फार मोठा फायदा झालेला आहे. कारण की, आमच्या येथे शेती उत्पादन
कमी आहे. जणावरांच उत्पादन जादा आहे म्हशी , गायी, बकऱ्या गरीबच्या गरीब पणबी 2 ते 5 कोणी गायी,कोणी म्हशी, कोणी बकऱ्या घेतल्या
यांचा पासून आम्हाला दुधाचा व्यवसाय हा फार मोठा झालेला आहे. ह्या पाण्या मुळ आम्ही दररोज दुध
औरंगाबादला संध्याकाळी जातो आणि सकाळीपण जातो. आणि 1 केट्या मुळ आमचा फार मोठा उत्पादण झाल.
****
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या ६८ व्या जयंतीनिमित्त,
बीड जिल्ह्यातल्या गोपीनाथ गड इथं आज आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम, रद्द करण्यात
आला असल्याची माहिती, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. परळीच्या वैद्यनाथ
सहकारी साखर कारखान्यात गेल्या आठवड्यात घडलेल्या दुर्घटनेच्या पाश्र्वभुमीवर हा कार्यक्रम
रद्द करण्यात आल्याचं, मुंडे यांनी सांगितलं. मात्र, जयंती निमित्तानं गोपिनाथ गडावर
येणाऱ्या प्रत्येकाला आपण आपल्या परिवारासह भेटणार असल्याचं त्या म्हणाल्या.
****
जालना जिल्ह्यातल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष
लाभ मिळण्यास सुरुवात झाली असून, राष्ट्रीयीकृत आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे खातेदार
असलेल्या, एक लाख २२ हजार ६१ शेतकर्यांच्या कर्ज खात्यात आतापर्यंत ६५७ कोटी ३० लाख,
५१ हजार रुपये जमा झाले आहेत, असं जिल्हा उपनिबंधक एन. व्ही. आघाव यांनी सांगितलं.
****
किनवट नगरपरिषदेची सार्वत्रिक
निवडणूक उद्या होत असून, मतदानासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी
किनवट शहरामध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
*****
औरंगाबाद शहरातल्या, शारदा मंदीर शाळेतल्या सेवानिवृत्त
शिक्षिका, रत्नप्रभा गोगटे यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. त्या ९० वर्षांच्या होत्या. शारदा मंदीर
शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. त्यांच्या पार्थीव देहावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले.
******
No comments:
Post a Comment