आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
१२ डिसेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता
****
गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीचा प्रचार आज
संध्याकाळी संपत आहे. त्यामुळे विविध पक्षांच्या राज्यभर प्रचार सभांचं आयोजन करण्यात
आलं आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान परवा गुरुवारी होणार
असून, गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल १८ डिसेंबरला जाहीर होणार
आहे.
****
इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या स्वदेशी उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारनं गेल्या तीन
वर्षात अनेक पावलं उचलली असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. ते काल दिल्लीत अर्थसंकल्पपूर्व बैठकीत बोलत होते. इलेक्ट्रॉनिक उत्पादनात भारत हे जागतिक
केद्रं बनावं, यासाठी आवश्यक वातावरण तयार करण्याच्या उद्देशानं सवलत योजनांवरची तरतूद
यंदाच्या अर्थसंकल्पात ७४५ कोटी रुपयांपर्यंत वाढवल्याची माहिती त्यांनी दिली.
****
सरकारी सेवांवरच्या सायबर हल्ल्यांविषयी पूर्वसूचना देण्याच्या आणि ते हल्ले रोखण्याच्या
उद्देशानं, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती
तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल पहिल्या ‘एन. आय. सी- सी. इ. आर. टी.’प्रणालीचा प्रारंभ केला. या सर्वंकष प्रणालीमध्ये सायबर सुरक्षेची
जागतिक दर्जाची उपाययोजना आणि धोक्याविषयीची तपासयंत्रणा या दोन्हींचा समावेश असल्याचं
प्रसाद यांनी सांगितलं. संभाव्य सायबर हल्ले ओळखून ते रोखणं यामुळे शक्य होणार आहे.
****
उस्मानाबाद शहरात आज सकाळी भूगर्भातून मोठा आवाज झाला. यावेळी तावदानं हादरल्यामुळे
नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मौखिक कर्करोगाचा वेळेत प्रतिबंध व्हावा, योग्य उपचार व्हावे, यासाठी राज्यात मौखिक
आरोग्य तपासणी मोहीम सुरु आहे. हिंगोलीसह एकूण पाच जिल्ह्यांमध्ये या मोहिमेअंतर्गत
सर्वाधिक रूग्णांची तपासणी करण्यात येत आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी अन्य जिल्ह्यांनीही
प्रयत्न करावेत, असं आवाहन, आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी केलं आहे. सावंत यांनी
काल दूर दृष्य संवाद प्रणाली मार्फत संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क
साधून, मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
*****
No comments:
Post a Comment