Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 12 December 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ डिसेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
उत्तम कायदे तयार करण्याचं काम विधीमंडळामार्फत करण्यात येत असून राज्य विधीमंडळानं
अनेक क्रांतीकारक कायदे तयार केले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं
आहे. नागपूर इथं, ४७ व्या संसदीय अभ्यासवर्गाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते
करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी
विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, यावेळी उपस्थित
होते. सुसंस्कृतपणे विरोध करण्याची संधी ही लोकशाहीची जादू असून, विविध भाषा, जाती
धर्मांना एकसंघ बांधण्याचं काम लोकशाहीमुळे झालं असल्याचं, निंबाळकर म्हणाले. तर विधानसभा
अध्यक्ष बागडे यांनी आपल्या प्रास्ताविकात, या अभ्यासक्रमाचं महत्त्व विशद केलं.
****
दरम्यान, नागपुरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या जनआक्रोश
मोर्चाला थोड्यावेळापूर्वीच दीक्षाभूमी इथून सुरुवात झाली. शेतकरी कर्जमाफी, बोंडअळीमुळे
कपाशीचं नुकसान आणि विषारी कीटकनाशकांमुळे यवतमाळ जिल्ह्यातल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर
राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी आयोजित या हल्लाबोल मोर्चात काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष
खासदार अशोक चव्हाण यांच्यासह विरोधी पक्षाचे नेते सहभागी झाले आहेत.
दरम्यान, विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आल्याचं
वृत्त आहे.
****
बर्फवृष्टी आणि कमी दृश्यमानतेमुळे काश्मीर खोऱ्याचा देशाच्या अन्य भागांशी संपर्क
तुटला आहे. बर्फवृष्टीमुळे आज सलग दुसऱ्या दिवशीही श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग
बंद आहे. कमी दृश्यमानतेमुळे विमान सेवेवरही परिणाम झाला आहे.
दरम्यान, गुरेझ सेक्टरमध्ये या हिमवादळात तीन भारतीय जवान बेपत्ता झाले असल्याचं
पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
दूरचित्रवाहिन्यांनी सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत
निरोधाच्या जाहिरातींचं प्रसारण करू नये अशी सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं
जारी केली आहे. या जाहिराती लहान मुलांच्या दृष्टीनं बिभत्स आणि अयोग्य असू शकतात,
त्यामुळे नमूद वेळेनंतरच अशा जाहिरातींचं प्रसारण केलं जाऊ
शकतं, असं या सूचनेत म्हटलं आहे.
यासंबंधी दूरचित्रवाहिन्यांनी, उपग्रह वाहिन्यांसाठी असलेल्या नियमांचं पालन करावं, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगानं
मंत्रालयाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
****
खरेदीतली वाढ, सार्वजनिक गुंतवणूक आणि सध्या सुरु
असलेल्या रचनात्मक सुधारणांमुळे २०१८ मधे भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर सात पूर्णांक दोन दशांश
राहील, असं संयुक्त राष्ट्र संघाच्या एका
अहवालात म्हटलं आहे. त्यानंतरच्या वर्षात
वृद्धीदर सात पूर्णांक चार दशांश टक्के राहील, असा अंदाज आहे. विमुद्रीकरणामुळे सुरुवातीला
वृद्धीदरात घसरण झाली असली तरी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक अंदाज या
अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
****
केंद्र सरकारनं प्रसूतीगृह दर्जा सुधार आणि सेफ डिलव्हरी अॅप्लिकेशन असे
दोन नवे उपक्रम सुरु केले आहेत. केद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी काल नवी दिल्ली इथं या
उपक्रमांचं उद्धाटन केलं. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयं, जिल्हा रुग्णालयं, प्रसूतीसंख्या जास्त असलेली उप
जिल्हा रुग्णालयं तसंच कम्युनिटी हेल्थ सेंटर्समध्ये ही योजना राबवली जाईल, असं नड्डा यांनी सांगितलं.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईनं या महिन्याच्या पाच तारखेला झालेल्या
यूजीसी नेट परिक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची उत्तर पत्रिका संकेतस्थळावर अपलोड
करण्याचा निर्णय घेतला आहे. सी बी एस ई एन ई टी डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर
१८ डिसेंबर पर्यंत या उत्तर पत्रिका विद्यार्थ्यांना पाहता येणार आहेत. या उत्तर पत्रिकांवर
आक्षेप असल्यास असे दावेही १८ तारखेपर्यंत ऑनलाईन स्वीकारणार असल्याचं मंडळानं कळवलं
आहे.
****
जागतिक व्यापारी संघटनेनं अन्नधान्याच्या साठवणुकीच्या प्रश्नावर कायमस्वरुपी
तोडगा काढावा, असं आवाहन वाणिज्य आणि
उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी केलं आहे. ब्यूनस आयर्स इथं सुरु असलेल्या जागतिक
व्यापारी संघटनेच्या अकराव्या मंत्रीस्तरीय परिषदेत ते बोलत होते. संघटनेच्या
सदस्य देशांनी नियमांवर आधारीत बहुआयामी व्यापार पद्धतीनुसार वचनपूर्ती करण्यासाठी
प्रयत्न करावेत, ज्याचा लाभ संपूर्ण जगाला होऊ शकेल
असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
जपानमधल्या वाको सिटी इथं सुरु असलेल्या दहाव्या आशियाई अजिंक्यपद १० मीटर रायफल
पिस्तुल स्पर्धेत भारतानं २१ पदकांची कमाई केली. या स्पर्धेतल्या चार भारतीय खेळाडूंनी
२०१८ मध्ये होणाऱ्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रताही मिळवली आहे. पुरुषांच्या
१० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सौरभ चौधरीनं वैयक्तिक तसंच सांघिक सुवर्ण पदक मिळवून
दिलं. महिलांच्या गटात मनू भाकेरनं रौप्य पदक पटकावलं. भारतानं या स्पर्धेत सहा सुवर्ण,
आठ रौप्य आणि सात कांस्य पदक जिंकले.
*****
No comments:
Post a Comment