Wednesday, 13 December 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 13.12.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 13 December 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  १३ डिसेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****



शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार संलग्न करण्यासंबंधीच्या प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ उद्या सुनावणी घेणार आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए एम खानविलकर, न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या पीठानं ही माहिती दिली. उद्या दुपारी दोन वाजता होणाऱ्या या सुनावणीत आधार संलग्नीकरण बंधनकारक करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरही सुनावणी होणार आहे. आधार संलग्नीकरणाला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

****

राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचार प्रकरणी १२ विशेष न्यायालयं स्थापन करणार असल्याचं केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. कायदा आणि न्याय मंत्रालयानं एका आदेशावर न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात ही माहिती दिली. देशभरातल्या राजकीय नेत्यांच्या विरोधात असलेल्या प्रलंबित प्रकरणांची संख्या एकत्रित करुन त्याचं विश्लेषण करण्यासाठी सरकारनं पुरेसा वेळ मागितला आहे.

****

सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या तुरुंगातले महानिदेशक किंवा महानिरीक्षकांची बैठक घेऊन, देशभरात मुक्त तुरुंगवास उघडण्याच्या व्यवहार्यतेवर विचार करावा, असं सर्वोच्च न्यायालयानं केंद्रीय गृह मंत्रालयाला सांगितलं आहे. मुक्त तुरुंगवास किंवा अर्धमुक्त तुरुंगवासात कैद्यांना आपल्या उपजीविकेसाठी दिवसभर बाहेर काम करुन संध्याकाळी तुरुंगात परतण्याची मुभा असते. गृह मंत्रालयानं यासंदर्भात सर्व राज्यांचे विचार जाणून घ्यावे, असं न्यायालयानं सांगितलं आहे. राज्यांना चार आठवड्यात उत्तर द्यायचं असून, फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.

****

भारतीय नौदलातले निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तान आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात उत्तर सादर करणार आहे. भारतानं या प्रकरणी आपली बाजू गेल्या १३ सप्टेंबरला मांडली होती. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली दोषी ठरवत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती, मात्र भारतानं दाखल केलेल्या याचिकेनंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे. दरम्यान जाधव यांच्या आई आणि पत्नीला त्यांची भेट घेण्याची परवानगी देण्यात आली असून, येत्या २५ तारखेला त्या पाकिस्तानात जाऊन जाधव यांची भेट घेणार आहेत.

****

जागतिक व्यापार संघटनेची अकरावी मंत्रिस्तरीय बैठक अयशस्वी होण्याचे संकेत आहेत. सार्वजनिक अन्न साठवणीच्या मुद्यासंदर्भात कायम स्वरुपी उपाय शोधण्याचे प्रयत्न करण्यास अमेरिकेनं नकार दिला आहे. भारतासह ३३ देशांनी अन्न साठवणीच्या मुद्यासंदर्भात कायम स्वरुपी उपाय शोधण्याला समर्थन दिलं आहे. या संदर्भात कायमस्वरुपी उपाय न शोधल्यास जागतिक व्यापार संघटनेची विश्वासार्हता कमी होईल, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे. ही बैठक आज संपत आहे.

****

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत विरोधकांनी आजही कापसावरील बोंडअळीच्या मुद्यावरून घोषणाबाजी केली. कपाशीवरच्या बोंडअळीबाबतची लक्षवेधी पूढे ढकलल्याबद्दल, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार अजित पवार यांच्यासह विरोधकांनी आक्षेप नोंदवला. दरम्यान, कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं. लक्षवेधी विचारू दिली जात नसल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.

****

६५व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला आजपासून पुण्यात सुरुवात होत आहे. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात २८ कलाकार आपली कला सादर करणार आहेत. यंदाच्या महोत्सवाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महोत्सवाच्या शेवटच्या दिवसाच्या संगीत सत्राला दुपारी बारा वाजेपासून सुरुवात होणार आहे.

****

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघानं नुकत्याच प्रसिध्द केलेल्या क्रमवारीत भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघ अनुक्रमे सहाव्या आणि दहाव्या स्थानावर कायम आहेत. यावर्षीच्या सुरुवातीपासूनच भारतीय पुरुष संघ सहाव्या स्थानावर होता, ते स्थान संघानं कायम राखलं आहे. तर यावर्षाच्या सुरुवातीला बाराव्या स्थानावर असलेल्या भारतीय महिला हॉकी संघानं दहाव्या स्थानावर झेप घेतली आहे.

*****

No comments: