आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
१९ डिसेंबर २०१७ सकाळी ११.००
वाजता
****
जम्मू
काश्मीरमध्ये गेल्या आठवड्यात आलेल्या हिमवादळात बेपत्ता झालेल्या पाच जवानांपैकी तीन
जणांचे मृतदेह सापडले आहेत. दोन सैनिकांचे मृतदेह गुरेझ सेक्टरमध्ये तर एका जवानाचा
मृतदेह नौगाम सेक्टरमध्ये सापडल्याचं संरक्षण सूत्रांनी सांगितलं. आणखी दोन बेपत्ता
जवानाचा शोध सुरु आहे.
दरम्यान,
शोपियान जिल्ह्यात सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी
ठार झाले. काल रात्री ही चकमक झाली. आज सकाळपर्यंत ही चकमक सुरु होती.
****
पनवेल
महानगरपालिकेच्या महासभेत महापालिका क्षेत्रांत दारूबंदी करण्याचा ठराव एकमतानं संमत
झाला. सत्ताधारी भाजपचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी 'पनवेल मनपा क्षेत्रात दारूबंदी
करण्यात यावी' असा प्रस्ताव मांडला. त्याला विरोधी शेकाप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी
पाठिंबा दिल्यानं हा ठराव बिनविरोध संमत झाला. या ठरावावर आयुक्त डॉक्टर सुधाकर आणि
राज्य सरकारच्या भूमिकेवर लक्ष असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नाशिक
महापालिकेतल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जेष्ठ नगरसेविका सुरेखा भोसले यांचं
आज पहाटे कर्करोगानं निधन झालं, त्या ६३ वर्षांच्या होत्या. १९९७ मध्ये त्या शिवसेनेकडून
नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. तीन वेळा नगरसेवकपद भूषवणाऱ्या सुरेखा भोसले आता
मनसेकडून निवडून आल्या होत्या. मनसेचे माजी आमदार नितीन भोसले यांच्या त्या काकू होत.
आज दुपारी नाशिक मधल्या अमराधाम इथं त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात
येणार आहेत.
****
नांदेड जिल्हा परिषदेतर्फे
दिला जाणारा नरहर कुरूंदकर पुरस्कार यंदा प्रसिद्ध साहित्यिक रा. रं. बोरडे यांना जाहीर
झाला आहे. येत्या २६ तरखेला नांदेड इथं मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होईल.
नांदेड जिल्हा परिषदेतर्फे ही माहिती देण्यात आली.
****
भ्रष्टाचार आणि बेनामी संपत्ती
बाळगल्याच्या आरोपावरून तुरूंगात असलेले माजी मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या
माजी खासदार समीर भुजबळ या दोघांनाही काल मुंबईच्या
स्थानिक न्यायालयानं जामीन नाकारला. यापूर्वी माजी मंत्री भुजबळ यांनी वैद्यकीय कारणावरून
जामिन देण्यासाठी केलेला अर्जदेखील न्यायालयानं फेटाळून लावला होता.
*****
No comments:
Post a Comment