Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 December 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ डिसेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी आज केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्वीपच्या दौऱ्यावर असून, ते ओखी चक्रीवादळामुळे नुकसान
झालेल्या भागांना भेट देणार आहेत. आज सकाळी ते लक्षद्वीपमधल्या कावारती इथं पोहोचले.
त्याठिकाणी त्यांनी ओखी वादळाचा फटका बसलेल्या नागरिकांसाठी केलेल्या उपाययोजनांचा
आढावा घेतला.
****
लोकसभेत आज प्रश्नोत्तराच्या
तासात नशेच्या आहारी गेलेल्या नागरिकांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. नशेच्या आहारी
गेलेल्या मुलांसाठी सरकारनं केलेल्या उपाययोजना आणि मुलांमध्ये नशेच्या वाढत्या प्रमाणाला
आळा घालण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्यासंदर्भात औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे
यांनी प्रश्न विचारला. यासाठी एक कृती धोरण आखणार असून, आरोग्य मंत्रालयासोबत एक संयुक्त
समिती स्थापन करणार असल्याचं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी
सांगितलं.
****
राज्यातल्या कपाशी
पिकांचं बोंड अळीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या घटनेकडे आज खासदार सुप्रिया
सुळे आणि प्रतापराव जाधव यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडून
आर्थिक मदत मिळण्याची मागणी जाधव यांनी केली.
****
शहीद जवानांच्या वारसांना लष्करात नोकरी
देण्यास सरकार प्राधान्य देत
असल्याचं केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज लोकसभेत सांगितलं. शहीद जवानांच्या
कुटुंबांना केंद्र आणि राज्यांकडून संयुक्तरित्या जास्तीत जास्त मदत मिळण्यासंदर्भातला
प्रश्न भाजपचे परवेश साहीब सिंग यांनी विचारला होता. देशातल्या युवकांना लष्करात भरती
होण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु असल्याचं
अहीर यांनी यावेळी सांगितलं.
****
दरम्यान, लोकसभेत
प्रश्नोत्तराच्या तासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविरोधात
केलेल्या वक्तव्यावरुन विरोधकांनी गदारोळ केला. कामकाज सुरु होताच काँग्रेसचे मल्लिकार्जुन
खरगे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. गुजरात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली
असल्याचं सांगून अध्यक्षांनी हा मुद्दा नाकारला. यावरुन विरोधकांनी गदारोळ केला, यातच
अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास सुरु ठेवला. मात्र विरोधकांची घोषणाबाजी वाढत गेल्यानं
अध्यक्षांनी कामकाज १२ वाजेपर्यंत तहकुब केलं होतं.
****
राज्यसभेत आज शून्यकाळात
भगत सिंग, सुखदेव, राजगुरु आणि चंद्रशेखर आझाद यांना शहीदाचा दर्जा देण्याची मागणी
करण्यात आली. कायदा मंत्रलयानं यासंदर्भात विचार करण्याचे निर्देश सभापती एम व्यंकय्या
नायडू यांनी दिले.
****
गुजरातमधल्या १८२ मतदान
केंद्रातल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात नोंदवलेलं मतदान आणि मतदारांना व्ही व्ही
पॅट यंत्रामार्फत मिळालेल्या मतदानाच्या पोचपावत्या शंभर टक्के
जुळल्या असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. भाजपाला
मदत करण्याच्या दृष्टीनं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर करण्यात येत असलेल्या
आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगान निवडक मतदान केंद्रातली ईव्हीएम यंत्रावर
नोंदवलेली मतं आणि मतदानाची पोचपावती तुलना केली होती, असं निवडणूक आयोगाच्या
आधिकाऱ्यांनी सांगीतलं. यासाठी लॉटरी पध्दतीनं मतदान केंद्र निवडली होती तसंच
त्यावेळी उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
****
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत केंद्र
सरकारनं आतापर्यंत देशभरात पाच कोटीहून अधिक स्वच्छतागृह बांधली आहेत, अशी
माहिती पेयजल आणि सार्वजनिक स्वछता मंत्री रमेश चंदाप्पा जिगजिगानी यांनी दिली.
ग्रामीण भागात सरकारनं आतापर्यंत पाच लाख ६१ हजार शौचालयं बांधली, असं
ते म्हणाले. मनरेगा अंतर्गत सुमारे २९ लाख शौचालयं बांधण्यात आली असून, त्यामुळे
सात राज्ये उघड्यावर शौचापासून मुक्त घोषित करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राज्यांना निधी हवा असल्यास त्यांनी आधी दिलेल्या
निधीच्या वापराचा सविस्तर अहवाल सादर करावा, असं
आवाहन त्यांनी केलं.
****
पर्यावरण आणि
वनमंत्री हर्षवर्धन यांनी काल भारतीय जंगल सुधारणा विधेयक लोकसभेत मांडलं. या
प्रस्तावित कायद्यामुळे बांबूची एका राज्यातून दुसऱ्या
राज्यात वाहतूक करताना परमीट घ्यावं लागणार नाही. या
विधेयकासोबत राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद सुधारणा विधेयक, ग्रॅच्युइटी
मिळण्याबाबतचं सुधारणा विधेयक, दंतचिकित्सकांबाबत सुधारणा विधेयक २०१७, जनतेच्या
प्रतिनिधीत्वाबाबतचं सुधारणा विधेयक २०१७ ही विधेयकं देखील सरकारनं मांडली.
****
लोकसभा सभापती सुमित्रा
महाजन यांनी भारतीय जनता पक्षाच्या तीन खासदारांचे राजीनामे काल मंजूर केले. यात महाराष्ट्रातले
गोंदियाचे खासदार नाना पटोले यांचा समावेश आहे.
*****
No comments:
Post a Comment