Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 December 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० डिसेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
गुजरात विधानसभा
निवडणुकीच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग
यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागावी अशी मागणी करत आज संसदेच्या दोन्ही
सभागृहात विरोधी पक्षांनी गदारोळ केल्यामुळे कामकाज तहकूब करण्यात आलं. काँग्रेस पक्षानं
हा विषय सभागृहात उपस्थित केल्यानं सलग तिसऱ्या दिवशी कामकाज तहकूब करण्यात आलं आहे.
राज्यसभेत कामकाज सुरू होताच, कॉग्रेस सदस्यांनी हौद्यात उतरून आपल्या मागणीसाठी घोषणा
देण्यास प्रारंभ केला, सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्याची
परवानगी नाकारली, तसंच सभागृहाची प्रतिष्ठा राखण्याचं सदस्यांना वारंवार आवाहन केलं,
मात्र त्यानंतरही गोंधळ कायम राहिल्यानं सभागृहाचं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित
करण्यात आलं.
लोकसभेत ज्योतिरादित्य
सिंदिया आणि काँग्रेसच्या इतर सदस्यांनी याच विषयावरून घोषणाबाजी केली. बिजु जनता दलाच्या
सदस्यांनीही ओडिशा आणि छत्तीसगड राज्यांमधला पाण्याचा वाद सभागृहात उपस्थित केला. गोंधळाच्या
वातावरणातच अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सभागृहाचं कामकाज तहकूब केल.
****
नवभारताच्या निर्माणासाठी नवीन पिढीला
सर्व पातळींवर प्रोत्साहन देण्याचं तसंच भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी जनतेप्रती
समर्पित भावनेनं काम करणं चालू ठेवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं
आहे. भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलतांना संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार
यांनी ही माहिती दिली. २०१९ मधल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्र
स्तरापर्यंत भाजप मजबुत करण्याचं तसंच पक्षात आणि पक्षाबाहेर तरूणांना प्रोत्साहीत
करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं असल्याचं कुमार यांनी सांगितलं.
मोदी यांनी हिमाचल प्रदेश आणि गुजरातमधला
भाजपचा विजय जनतेला समर्पित केला आहे, असं ते म्हणाले. बैठकीत भाजपचे अध्यक्ष अमित
शहा यांनी भाजपची निवड केल्याबद्दल दोन्ही राज्यातल्या जनतेचे आभार मानले आहेत.
*****
राज्यातील सत्ताधारी
भाजपला कोणताही मदतीचा हात राष्ट्रवादी काँग्रेसकडून
दिला जात नसून विधिमंडळात आणि विधिमंडळाबाहेर सातत्यानं राज्य सरकारच्या धोरणांवर टीका
करण्यात येत असल्याचा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला
आहे. ते आज नागपूरात सुयोग पत्रकारांच्या निवासस्थानी अनौपचारिक चर्चेदरम्यान बोलत
होते. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी
काँग्रेसमध्ये आघाडीच्या दृष्टीकोनातून चर्चा सुरु झाली असल्याचं सांगून निवडणूकीतील
जागावाटप ५०-५० टक्के स्वरूपात असावं अशी राष्ट्रवादीची भूमिका असल्याचं धनंजय मुंडे
यावेळी म्हणाले.
****
साखरेच्या उत्पादनात
वाढ होण्याचा अंदाज असल्यानं, सरकारनं साखरेच्या साठ्यावरील आणि व्यापारावरील निर्बंध
त्वरित उठवले आहेत. साखरेच्या किंमतीही माफक राहण्याची शक्यता असल्याचंही खाद्यान्न
आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. २०१७-१८ च्या विपणन वर्षात
भारतात साखरेचं उत्पादन २४९ लाख टनापर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
****
देशभरातल्या वैद्यकीय
महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ४ हजार ८०० हून अधिक जागा वाढवण्यात येणार
आहेत. केंद्रिय आरोग्य आणि कुटूंबकल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चोबे यांनी राज्यसभेत
लेखी उत्तरात ही माहिती दिली. वैद्यकिय शिक्षणाच्या अधिकाधिक सोयी निर्माण करुन देशातल्या
तज्ञ डॉक्टरांची संख्या वाढवण्यावर सरकारचा भर आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात अधिक डॉक्टरांची
उपलब्धता होणं आवश्यक आहे असंही चोबे यांनी सांगितलं.
****
२०१६-१७ च्या आर्थिक
वर्षात बँकिंग लोकपालाकडे एक लाखा तीस हजार तक्रारी आल्या असून गेल्या वर्षीच्या तुलनेत
हा आकडा सत्तावीस टक्क्यांनी वाढला आहे. रिझर्व बँकेनं प्रसिद्ध केलेल्या बँकिंग लोकपाल
वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. यात बँकिंग कायद्यांच्या उल्लंघनासंबंधी
३४ टक्के तक्रारी आहेत. एटीएम आणि डेबिट कार्डसंबंधीच्या तक्रारींची संख्या साडेबारा
टक्के आहे तर क्रेडिट कार्ड संबंधी सहा टक्के आहेत. या तक्रारींपैकी ब्यान्नव टक्के
निकालात काढण्यात आल्याचं रिझर्व बँकेनं स्पष्ट केलं आहे.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
संशोधन आणि प्रशिक्षण संस्था-बार्टीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या मोफत स्पर्धा परीक्षा
प्रशिक्षणाचं विद्यार्थ्यांनी सोनं करीत यशाचं उत्तुंग शिखर गाठावं, असं प्रतिपादन
बीडचे भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी केलं. काल बीड इथं बार्टी स्पर्धा परीक्षा
केंद्रामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना एक लाख रूपये
किंमतीच्या पुस्तकांचं मोफत वाटप करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. गेल्या वीस वर्षांच्या
काळात शैक्षणिक क्षेत्रामध्ये डोकावून पाहिले तर शिक्षणासाठी किती अडचणींचा सामाना
करावा लागत असे हे दिसून येतं असं ते म्हणाले.
*****
No comments:
Post a Comment