Monday, 11 December 2017

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 11.12.2017 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 11 December 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ डिसेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

दहशतवादाविरोधात एकजूट आवश्यक असून, त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही यासंदर्भात भारत, रशिया आणि चीन या राष्ट्रांमध्ये एकमत झालं आहे. या तिन्ही राष्ट्रांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक झाली, त्यांनतर माध्यमांशी बोलताना परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लॅव्हरोव्ह आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी तिन्ही राष्ट्रांमधले संबंध अधिक दृढ करण्याचा संकल्प केला. दोन्ही नेत्यांना भारतात गुंतवणूक वाढवण्याचं आवाहन केल्याचं स्वराज यांनी सांगितलं.

****

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांची बिनविरोध निवड झाली आहे. पक्षाचे निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मुलापल्ली रामचंद्रन यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. येत्या १६ डिसेंबरला राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

****

सरकारनं पुढच्या वर्षापर्यंत दररोज ४० किलोमीटरचे रस्ते बनवण्याचं उद्दीष्ट ठेवलं असल्याचं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं भारत आसियान संपर्क शिखर परिषदेत बोलत होते. भारतानं राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीत प्रगती केली असल्याचं ते म्हणाले. भारतमाला योजनेअंतर्गत पुढच्या पाच वर्षात ३४ हजार किलोमीटरचे रस्ते बनवण्यासाठी केंद्र सरकारनं मंजुरी दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. नदी आणि बंदरांच्या माध्यमातून व्यापाराला चालना देणं आणि आसियान राष्ट्रांबरोबरच भारतातही गुंतवणुक वाढवणं गरजेचं असल्याचं गडकरी यांनी नमूद केलं.

****

राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर इथं सुरु झालं. विधानसभेत आज कामकाजाला सुरूवात होताच विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आजचं सर्व कामकाज रद्द करून शेतकरी कर्जमाफीवर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, त्यांचा हा प्रस्ताव नाकारल्यानं विरोधकांनी सभागृहात सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. कर्जमाफीची रक्कम अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नसल्याची टीका विखे पाटील यांनी केली.

यावर प्रत्यूत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ४१ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचं स्पष्ट केलं. विरोधक केवळ राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. बोंडअळी संदर्भात संबंधित बियाणे कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दरम्यान, विधानसभेत कामकाज सुरु होण्यापूर्वी राज्याचे माजी मंत्री गोविंदराव सरनायक, विधानसभेचे माजी सदस्य राजीव राजळे, संपतराव पाटील, मुसा अली मोडक, रामभाऊ तुपे, डॉ. शंकरराव बोबडे, डॉ. कुसुमताई कोरपे या दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

****

विधान परिषदेत कामकाज सुरु होण्यापूर्वी नवनिर्वाचित सदस्य प्रसाद लाड यांना सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सदस्यत्वाची शपथ दिली.

****

दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज विदर्भ राज्य आंदोलन समितीनं विदर्भ बंदची हाक दिली होती. नागपूर इथं आज या समितीनं आंदोलन करत वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी केली. या बंदला यवतमाळ जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

मराठी भाषा विभागाच्या वतीनं प्रदान करण्यात येणारे २०१६ चे यशवंतराच चव्हाण राज्य वांङमय पुरस्कार जाहीर झाले आहेत. मराठी भाषेतल्या उत्कृष्ट वाङमय निर्मितीस हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही घोषणा केली.

****

नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे संजय इंदुलकर विजयी झाले. तर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे पुरूषोत्तम लोहगावकर विजयी झाले. इगतपुरीत एकूण १८ जागांपैकी शिवसेनेला १३, भाजपाला चार तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आल. त्र्यंबकेश्वर इथं एकूण १७ जागांपैकी भाजपा १४, शिवसेना दोन तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला.

****

देशातल्या सर्व आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंचा केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेत समावेश करण्याची मागणी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. महान खेळाडूंना आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचं तेंडुलकरनं पंतप्रधानांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे. सर्व केंद्र सरकारी कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक विजेते हॉकीपटू मोहम्मद शाहीद यांना खूप उशीरा मृत्यूपूर्वी उपचार मिळाल्याचा तेंडुलकरनं आपल्या पत्रात उल्लेख केला आहे.

//******//

No comments: