Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 2 December 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २ डिसेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
लक्षद्वीप
बेटावर ‘ओखी’ चक्रीवादळाचा जोर वाढल्यामुळे लक्षद्वीप आणि केरळच्या किनारपट्टीवर जोरदार
पाऊस झाला आहे. चक्रीवादळामुळे लक्षद्वीपमधले मिनीकॉय बेट सर्वात जास्त प्रभावित झालं
आहे. केरळमध्ये वादळामध्ये अडकलेल्या ३०० मच्छिमारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं
असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. तामिळनाडूमध्ये कन्याकुमारी जिल्ह्यामध्ये जनजीवन
विस्कळीत झालं असून चार हजार प्रभावित वीजेचे खांब पूर्ववत करण्यासाठी जलदगतीनं प्रयत्न
सुरू आहेत. या चक्रीवादळामुळे श्रीलंकेत १३ जणांचा मृत्यू झाला असल्याचं पीटीआयच्या
वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान,
नाविक दलाचे प्रमुख सुनिल लान्बा यांनी संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांना प्रभावित
भागांमधील मदत आणि बचाव कार्याची माहिती दिली.
****
अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा
सल्लागार मायकल फ्लेन यांनी अमेरिकेची सर्वोच्च तपास संस्था फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशनला
त्यांच्या रशियाशी असलेल्या संपर्काबाबतची खोटी माहिती दिल्याची कबुली दिली आहे. काल
फेडरल न्यायालयासमोर हजर झाल्यानंतर त्यांनी रशियाशी असलेल्या त्यांच्या संपर्काबाबत
जाणीवपूर्वक खोटी आणि बनावट माहिती दिली असल्याचं म्हटलं आहे. विशेष वकील रॉबर्ट म्युलर
रशियाच्या २०१६ च्या अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक प्रभावित करण्याच्या प्रयत्नांची
चौकशी करत आहे. त्या तपासामध्ये फ्लेन हे दोषी आढळलेले पहिले अधिकारी आहेत. फ्लेन हे
निवृत्त लेफ्टनंट जनरल असून ते चोविस दिवसांसाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
यांचे सुरक्षा सल्लागार होते.
****
अहमदनगरच्या समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त पांडुरंग
वाबळे यांच्या अंगावर चर्मकार उठाव महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आज शाई फेकली. राज्यातल्या
शोषित, वंचित समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न मार्गी लावावा, या
मागणीचं निवेदन घेऊन चर्मकार उठाव महासंघाचे कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी समाजकल्याण
विभागात गेले होते. निवेदन दिल्यावर काही कार्यकर्त्यांनी वाबळे यांच्या चेहऱ्यावर
काळी शाई फेकली आणि घोषणाबाजी केली.
दरम्यान, शाई फेकणाऱ्या तीन कार्यकर्त्यांना एमआयडीसी
पोलिसांनी अटक केली असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी सांगितलं.
****
दुसरं अखिल भारतीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन नऊ ते
११ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत लातूर इथं होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष अण्णाराव
पाटील यांनी आज लातूर इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या संमेलनात धनगर समाजाच्या
प्रश्नासोबतच समाजातल्या अन्य प्रश्नांवरही चर्चा होणार असल्याचं ते म्हणाले. या संमेलनात
चर्चासत्र, परिसंवाद असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
****
औरंगाबाद शहरातल्या १९ धर्मादाय रुग्णालयात उद्या निर्धन
आणि गरीब रुग्णांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. सहधर्मादाय आयुक्त
श्रीकांत भोसले यांनी आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. धर्मादाय आयुक्त
कार्यालयाअंतर्गत नोंदणी असलेल्या दोन हजार ४२८ संस्थांचा लेखापरिक्षणाचा अहवाल तपासून
त्यांची नोंदणी रद्द करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या संस्था बंद करण्याचा
आयुक्त कार्यालयाचा हेतू नसून, कायद्याचा जरब बसवण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी स्पष्ट
केलं.
****
अंबड-जालना मार्गावर कर्जत पाटीजवळ ट्रकनं दुचाकीला धडक
दिल्यानं झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृत दोघेही भोकरदन
तालुक्यातले आहेत. खराब रस्त्यामुळे या मार्गावर दोन दिवसांत चार जणांचा मृत्यू झाल्यामुळे
वाहनधारकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
****
मोहम्मद पैगंबर यांची जयंती म्हणजे
ईद-मिलाद-उन-नबी आज नांदेड शहरात उत्साहात आणि
पारंपारिक पद्धतीनं साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत
मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यातल्या
आडगांव इथल्या भूमि अभिलेख कार्यालयातला परिरक्षक सुभाष साळवे याला ३० हजार रुपयांची
लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. स्मशानभूमीत अतिक्रमणाची मोजणी करण्यासाठी त्यानं
ही लाच मागितली होती.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान दिल्ली इथं सुरु असलेल्या कसोटी
क्रिकेट सामन्याचा आजच्या पहिल्या दिवस अखेर भारताच्या कर्णधार विराट कोहली आणि मुरली
विजयच्या शतकी खेळीच्या बळावर चार बाद ३७१ धावा झाल्या. मुरली विजयनं १५५, शिखर धवन
आणि चेतेश्वर पुजारानं प्रत्येकी २३ धावा केल्या. विराट कोहली १५६ आणि रोहीत शर्मा
सहा धावांवर खेळत आहे. कोहलीच्या कसोटी क्रिकेटमध्ये पाच हजार धावा पूर्ण झाल्या असून,
तो पाच हजार धावा करणारा अकरावा भारतीय खेळाडू बनला आहे.
****
No comments:
Post a Comment