Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 06 December 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ६ डिसेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
मुंबई उच्च न्यायालयानं रिअल
इस्टेट-नियमन आणि विकास अधिनियम - अर्थात रेरा -ची वैधता कायम ठेवली आहे. रियल इस्टेट
विकासक आणि खाजगी जमीन मालकांच्या, या अधिनियमाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर
सुनावणी झाल्यानंतर न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. यानुसार सगळ्या विकासकांनी नियामक
प्राधिकरणाकडे नोंदणी करणं आवश्यक आहे. घरांचा ताबा देण्यास विलंब झाल्यास खरेदीदारांना
मोबदला मागता येण्याची, तसंच निर्धारित वेळेत बांधकाम प्रकल्प पूर्ण न केल्यास विकासकांची
नोंदणी रद्द करण्याची तरतूद या अधिनियमात आहे.
****
चालू आर्थिक वर्षातलं पाचवं द्वैमासिक
पतधोरण आज रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलं. रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात बँकेनं काहीही
बदल केला नसून, पुढील दोन तिमाहींमध्ये महागाई दर चार पूर्णांक तीन ते चार पूर्णांक
सात टक्क्यांच्या दरम्यान राहील, असा अंदाज वर्तवला आहे. आर्थिक वृद्धी दर सहा पूर्णांक
सात टक्के राहील, हा अंदाज बँकेनं कायम ठेवला आहे.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या
बासष्टाव्या पुण्यतिथीनिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांतून त्यांना अभिवादन करण्यात
आलं. राज्यपाल सी. विद्यासागर राव, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस आणि महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज सकाळी दादरच्या चैत्यभूमीवर
डॉक्टर आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहिली. चैत्यभूमीवर अनुयायांची मोठी गर्दी झाली
होती. विधानभवन प्रांगणातही बाबासाहेबांच्या पुतळ्याला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण
करून अभिवादन केलं. औरंगाबादसह मराठवाड्यात ठिकठिकाणी सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात
आलं होतं. औरंगाबादमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं सकाळी
विद्यापीठ ते भडकल गेट अशी समता शांती पदयात्रा काढण्यात आली. लातूरमध्ये पालकमंत्री
संभाजी पाटील निलंगेकर, खासदार डॉक्टर सुनील गायकवाड आणि महापौर सुरेश पवार यांनी बाबासाहेबांच्या
पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली. नांदेड इथं खासदार अशोक चव्हाण यांनी बाबासाहेबांना
अभिवादन केलं, या निमित्तानं महारक्तदान आणि सर्वरोगनिदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं
होतं. जालना इथे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला
पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
****
नांदेड नजिक मालटेकडी रेल्वे
स्थानकाजवळच्या उड्डाण पुलाच्या कामाकरता येत्या ८,९,१० आणि १२ तारखांना दररोज चार
तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावर धावणारी अदिलाबाद - नांदेड
एक्स्प्रेस गाडी अंशत: रद्द राहील, तर काचीगुडा-मनमाड, काचीगुडा-नरखेड आणि इंटर सिटी
एक्सप्रेस या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होईल, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या
नांदेड विभागानं दिली आहे.
****
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या
वतीनं जालना जिल्ह्यात विशेष घटक योजना प्रवर्गातल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी तांत्रिक
उद्योजकता विकास प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं आहे. एक महिना कालावधीच्या या कार्यक्रमामधून
अभ्यासक्रमानुसार तांत्रिक प्रशिक्षण प्रात्यक्षिकांद्वारे दिलं जाणार आहे. इच्छुक
सुशिक्षित बेरोजगारांनी जालन्याच्या जिल्हा उद्योग केंद्रात कार्यक्रम आयोजकांशी संपर्क
साधावा, असं आवाहन केंद्राच्या वतीनं करण्यात आलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात ग्रामीण भागातल्या
रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचं काम जिल्हा परिषदेच्यावतीनं सुरू करण्यात आल्याची माहिती
मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे यांनी दिली. ते काल परभणी इथं बोलत होते. रस्त्यांच्या
मजबुतीकरणासाठी सुमारे नऊशे एकेचाळीस लाख रुपयांचा आराखडा तयार करुन शासनाकडे पाठवल्याचं
सवडे यांनी सांगितलं.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान दिल्लीच्या
फिरोजशहा कोटला मैदानावर खेळला गेलेला तिसरा आणि अंतिम कसोटी सामना आज अनिर्णित राहिला.
४१० धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात आज पाचव्या दिवसअखेर पाच बाद
२९९ धावा झाल्या. भारतानं ही तीन कसोटी सामन्याची मालिका एक - शून्य अशी जिंकली आहे.
श्रीलंकेविरुद्ध तीन एकदिवसीय
सामन्यांची मालिका रविवारपासून सुरू होत असून, पहिला सामना हिमाचल प्रदेशात धर्मशाला
इथं होणार आहे.
****
No comments:
Post a Comment