Friday, 15 December 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 15.12.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15 December 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ डिसेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

तिहेरी तलाकवर बंदी आणण्यासंदर्भातल्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी मंत्रिमंडळानं, २००० रुपयांपर्यंतच्या डिजिटल व्यवहारांवर लागणारा शुल्क - एमडीआरची भरपाई सरकार करणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचं प्रसाद यांनी सांगितलं. 

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात निवणुकीच्या प्रचारादरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर पाकिस्तानी शिष्टमंडळाची भेट घेतल्याचा आरोप केल्याच्या मुद्यावरुन राज्यसभेत आज विरोधकांनी गदारोळ केला. यामुळे कामकाज वारंवार तहकुब करावं लागलं. दुपारी अडीच वाजता कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी या मुद्यावर चर्चेची मागणी केली, मात्र उपसभापती पी जे कुरीयन यांनी ती मान्य न केल्यानं काँग्रेस सदस्यांनी घोषणाबाजी सुरु केल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकुब झालं.

****

मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशमधल्या कापूस पिकावर बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी नुकसान भरपाई जाहीर केली जाईल, अशी घोषणा कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज विधानसभेत केली. कापूस बियाणे विक्री केलेल्या कंपन्यांकडूनही नुकसान भरपाई वसूल केली जाईल आणि अशा कंपन्यांवर धाडी टाकणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी, बोंडअळी बाधित झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी २५ हजार, तर धानावर तुडतड्या रोगामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली.

****

राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या शंभर शाळा अशा एकूण तीन हजार ५०० शाळांमध्ये महाराष्ट्र राज्य शालेय सुरक्षा कार्यक्रम राबवण्याचं विचाराधीन असल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शालेय सुरक्षा कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रश्न सदस्य निर्मला गावित, विजय वडेट्टीवार, असलम शेख, अमिन पटेल, बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला होता.

****

राज्यातल्या महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं सर्व जिल्ह्यात निर्भया पथकाची स्थापना करण्यात येणार असल्याचं गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. सदस्य निलम गोऱ्हे यांनी उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. राज्यातल्या जनतेच्या सुरक्षितेतला शासन सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

मराठा समाजाला आरक्षण आणि अन्य सुविधा देण्याच्या संदर्भात शासनाची भूमिका सकारात्मक असून त्यासाठी अनेक योजना सुरु केल्या असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितलं. सदस्य शरद रणपीसे यांनी यासंदर्भातला प्रश्न विचारला होता.

****

राज्यातल्या सर्व नागरी सहकारी बॅंकांना एकरकमी कर्ज परतफेड योजना राबवण्यास मंजूरी देण्यात आली आहे. याबातचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. या योजनेचा अधिकाधिक कर्जदारांनी तसंच बँकेकडील एन.पी.ए. कमी होण्याच्या दृष्टीनं बँकानी लाभ घ्यावा अशा सूचना सहकार आयुक्तालयामार्फत देण्यात आल्या आहेत.    

****

महिलांच्या मानवाधिकारासाठी सद्य:स्थितीत खूप आव्हानं असली तरी आज महिला आपल्या मानवाधिकारासाठी आवाज उठवत असल्याचं समाजसेविका रझिया पटेल यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं आज एमजीएम पत्रकारिता आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या वतीनं ‘मानवी हक्क आणि महिला’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात त्या बोलत होत्या. देशात सर्वच जाती धर्माच्या स्त्रियांना न्याय देणारे कायदे निर्माण होणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

****

शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल असं सुलभ तंत्रज्ञान निर्मितीला उद्योजकांनी प्राधान्य द्यावं, असं आवाहन पशुसंवर्धन आणि दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केलं आहे. जालना इथं आयोजित तीन दिवसीय ‘रोटरी जालना एक्स्पो २०१७’चं उद्घाटन आज खोतकर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. जालन्यात राष्ट्रीय पातळीवरील औद्योगिक प्रदर्शन केंद्र उभारणीची स्थानिक उद्योजकांची मागणी असून, त्यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रस्ताव सादर केल्यास मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईलं, अशी ग्वाही खोतकर यांनी यावेळी दिली.

****

उस्मानाबाद इथं आज राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या वतीनं आयोजित ‘राज्यस्तरीय अंधकल्याण शैक्षणिक सप्ताहा’चं उद्घाटन नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर, राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचे उपाध्यक्ष रघुनाथ बारड यांच्या हस्ते झालं. राज्यातल्या २२ अंध शांळांमधले ३०० विद्यार्थी या सप्ताहानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाले आहेत. यानिमित्त उद्या उस्मानाबाद इथं अंधांच्या क्षमतांची प्रात्यक्षिकं दाखवणारी जनजागृती फेरी काढली जाणार आहे.

****

No comments: