Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 December 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ डिसेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
मुस्लिम आरक्षणासंदर्भात
राज्य सरकारकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं विधानपरिषदेत आज विरोधकांनी सरकार विरोधी घोषणा देत सभात्याग
केला. मुस्लिम समाजाला शासकीय सेवा आणि शैक्षणिक सोयी सुविधांमध्ये पाच टक्के
आरक्षण देण्यासंदर्भात संबंधित आमदार आणि अन्य लोकांची राज्याच्या
महाधिवक्त्यांसोबत बैठक घेऊन त्यांची याबाबतची मतं जाणून घ्यावीत, असे निर्देश सभापती रामराजे
नाईक निंबाळकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात राज्य सरकारला दिले. काँग्रेसचे संजय
दत्त यांनी यासंदर्भातला प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारची भूमिका
अल्पसंख्याकांविरोधी असल्याचा आरोप केला. विविध धर्मातल्या मागास घटकांना आरक्षण मिळावं, हीच सरकारची भूमिका असल्याचं
शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. मात्र मुस्लिम समाजाच्या आरक्षणावरुन
सरकारनं दिशाभूल करू नये, असं सांगत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीका केली आणि
विरोधकांनी सभात्याग केला.
****
पतंजली उद्योग समूहाला मिहानमध्ये सवलतीत जागा दिल्याबद्दल विधानपरिषदेत विरोधकांनी
लक्षवेधी सूचनेमार्फत आक्षेप घेतला. मंत्री मदन येरावार यांनी दिलेल्या उत्तरावर विरोधकांनी
असामाधान व्यक्त केल्यानं मंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यांसह सभागृहातल्या सर्व सदस्यांचा
अधिवेशन काळात मिहान दौरा काढण्याची सूचना सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली.
मात्र त्यानंतरही विरोधकांचा गोंधळ सुरुच राहिल्यानं सभापतींनी कामकाज अर्ध्या तासासाठी
तहकूब केलं.
दरम्यान, विधानपरिषदेत आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर चर्चेला सुरुवात झाली.
****
राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात रक्तातील प्लाझ्मा विलगीकरणासाठी फ्रॅक्सिनेशन सेंटर सुरु करण्याचं
विचाराधीन असल्याचं आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज विधानसभेत सांगितलं.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली
होती. कालबाह्यतेमुळे रक्त वाया जाण्याचं प्रमाण एकूण रक्त संकलनाच्या एक पूर्णांक
८० टक्के इतकं असून, रक्ताच्या विहित दरापेक्षा जास्त दर आकारणाऱ्या ७२
रक्तपेढ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.
राज्यातले अर्भक मृत्यू रोखण्यासाठी येत्या सहा महिन्यांमध्ये सहा ठिकाणी एस. एन. सी. यू. सुरू करणार असल्याचं, तसंच खाजगी रूग्णालयांकडून मोठ्या प्रमाणावर
रूग्णांना भरमसाठ बिलं आकारली जातात, यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्यात क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट
कायदा लवकरच आणणार असल्याचं सावंत यांनी सांगितलं.
****
राज्याच्या विकासात महसूल आणि रस्ते विकास यांचं योगदान महत्वाचं असल्याचं
महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं महाराष्ट्र राष्ट्रकुल संसदीय
मंडळाच्या वतीनं आयोजित संसदीय अभ्यास वर्गात ‘महाराष्ट्राच्या गतिशील पायाभूत
विकासात सार्वजनिक बांधकाम आणि महसूल विभागाचं अमूल्य योगदान’ या विषयावर ते आज बोलत होते. जनतेला
विविध योजनांची माहिती, दाखले एकाच ठिकाणी मिळावेत यासाठी ‘महाराजस्व अभियान’ महसूल यंत्रणेमार्फत राबवण्यात आलं,
तसंच सातबारा ऑनलाईन देण्यात येत असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर आज केंद्र सरकार
आणि लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या अधिवेशनात तिहेरी तलाक, तसंच मागासवर्गीय आयोगाच्या
घटनात्मक स्थितीबाबतची विधेयकं मंजुरीसाठी येण्याची अपेक्षा आहे.
****
केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी
योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्याच्या निर्णयावर स्थगिती आणण्याची
मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय उद्या निर्णय सुनावणार आहे. योजनांसाठी
आधार क्रमांक अनिवार्य करण्याची मुदत सरकारनं ३१ मार्च २०१८ करण्याची तयारी दर्शवली
असल्याचं महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी न्यायालयात सांगितलं.
****
गुजरात विधानसभा
निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान आज पार पडलं. दुपारी दोन वाजेपर्यंत ४० टक्के
मतदान झाल्याचं वृत्त आहे. येत्या १८ डिसेंबरला गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा
निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यातील किनवट नगर परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे आनंद
मच्चेवार विजयी झाले. १८ नगरसेवक पदांपैकी भाजप नऊ, राष्ट्रवादी कॉँग्रेस सहा, काँग्रेस
दोन आणि एका अध्यक्षपदावर अपक्ष उमेदवार विजयी झाला.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपचे सुहास सिरसाट
विजयी झाले. एकूण १७ जागांपैकी भाजपनं ११, फुलंब्री विकास आघाडीनं चार आणि एमआयएमनं
एका जागेवर विजय मिळवला.
****
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई जवळ वरवटी गावाजवळ दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन
झालेल्या अपघातात बस चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर ३० जण जखमी झाले. आज सकाळी हा अपघात
झाला.
//********//
No comments:
Post a Comment