Tuesday, 1 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.05.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 May  2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ मे २०१ सकाळी .५० मि.

****



Ø मराठी शाळांसाठी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Ø महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५८व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यात उत्साहाचं वातावरण

Ø अहमदनगर जिल्ह्यात जामखेड दुहेरी हत्याकांड प्रकरणात पाच जणांना अटक  

आणि

Ø औरंगाबाद शहराला आता तीन दिवसाआड पाणीपुरवठा तर शहरातला जवळपास ९० टक्के कचरा उचलल्याचा महापौरांचा दावा

****



 मराठी शाळांसाठी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ -सी बी एस ई, तसंच भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र - आय सी एस ई या मंडळांप्रमाणे हे मंडळ मराठी शाळांचा अभ्यासक्रम तयार करणार असल्याचं तावडे यांनी सांगितलं.

 या योजनेच्या पहिल्या टप्प्यात निवडक १३ मराठी शाळा या मंडळाशी संलंग्नित केल्या जातील,  त्यानंतर लवकरच प्रत्येक जिल्ह्यातली किमान एक शाळा या मंडळाशी संलग्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानंतर, महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ हे राज्यातलं दुसरं शिक्षण मंडळ असेल, असं तावडे म्हणाले.   

****



 ५५ वे राज्य चित्रपट पुरस्कार काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार - ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना, चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार - अभिनेते विजय चव्हाण यांना, राज कपूर विशेष योगदान पुरस्कार - प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांना, तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार - अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या बोधचिन्हाचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं.

****



 महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५८वा वर्धापन दिन आज उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबाद इथं पोलिस आयुक्तालयाच्या मैदानावर सकाळी आठ वाजता पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण होणार असून, नांदेड इथं पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते, बीड इथं पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते तर लातूर इथं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे.



 दरम्यान, महाराष्ट्र दिनानिमित्त आज सार्वजनिक सुटी असल्यानं औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीचा बाह्यरुग्ण विभाग बंद राहणार आहे.

****



 राज्याचे मुख्य सचिव म्हणून काल वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव डी.के जैन यांनी पदभार स्वीकारला. भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९८३ च्या तुकडीचे जैन हे अधिकारी आहेत. धुळे इथं सहायक जिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय कारकीर्द सुरू केलेल्या जैन यांनी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये विविध पदांवर काम केलं आहे. सेवानिवृत्त मुख्य सचिव सुमित मलिक यांची राज्याचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

****



 सांगली जिल्ह्यातल्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं विश्वजीत कदम यांना उमेदवारी दिली आहे. माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे इथं पोटनिवडणूक होत आहे. विश्वजित हे त्यांचे चिरंजीव असून युवक काँग्रेसचे राज्य अध्यक्ष आहेत.

****



 अहमदनगर जिल्ह्यात जामखेड इथल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी ही माहिती दिली. कैलास माने, प्रकाश माने, दत्ता गायकवाड, सचिन जाधव, बापू काळे अशी या पाच जणांची नावं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते योगेश राळेभात आणि राकेश राळेभात यांची गेल्या शनिवारी जामखेड बाजार समितीच्या आवारात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ जामखेड इथं दोन दिवस बंद पाळण्यात आला.



 दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातून गुंडगिरी आणि गुन्हेगारी समूळ नष्ट करण्यासाठी पोलीस विभागानं प्रभावी आराखडा तयार केला असल्याचं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केसरकर यांनी काल अहमदनगर इथं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

$33FD113F-59D5-4F37-83B1-FC574C0A020A$     

****



 बुद्ध पौर्णिमा काल सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. नवी दिल्लीत, ‘बुद्धजयंती २०१८ या सोहळ्याचं उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. सध्याच्या समस्या सोडवण्यासाठी भगवान बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावरूनच जावं लागेल, असं, पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितलं. औरंगाबादसह मराठवाड्यात यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन काल करण्यात आलं होतं. ‘बुद्धम शरणमं गच्छामी’ च्या जयघोषानं औरंगाबादचा बुद्धलेणी परिसर दुमदुमला होता. भिक्खू संघातर्फे क्रांती चौकातून मिरवणूक काढण्यात आली, तर अनेक ठिकाणी गौतम बुद्धांना अभिवादन करण्यात आलं.

****



 औरंगाबाद शहराला आता तीन दिवसांनंतर पाणी पुरवठा केला जाणार आहे. यापूर्वी शहराच्या काही भागात सात दिवसांनंतर पाणी पुरवठा केला जायचा. पाण्याचं योग्य नियोजन करण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले होते. त्यामुळे आता, संपूर्ण शहराला दर तीन दिवसांनी पाणी पुरवठा केला जाईल.



 दरम्यान, उन्हाळ्यामुळे  पाण्याची मागणी वाढल्यानं, जायकवाडी धरणातून औरंगाबाद शहराला होणारा पाणी पुरवठा अपुरा पडू लागला आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

****



 औरंगाबाद शहरात काल महास्वच्छता अभियान राबवून रस्त्यावर साचलेला जवळपास ९० टक्के कचरा उचलल्याचा दावा महापौर नंदकुमार घोडेले यांनी केला आहे. काल सकाळी तीन तास राबवलेल्या महास्वच्छता अभियानानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शहरात चार ठिकाणी उभारण्यात आलेल्या प्रक्रिया केंद्रात शास्त्रोक्त पद्धतीने या कचऱ्याचं वर्गीकरण करून विल्हेवाट लावली जात आहे, शहरातला उर्वरित कचरा नियमितपणे उचलला जाईल, असं महापौरांनी सांगितलं. विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांच्यासह अनेक अधिकारी, पदाधिकारी आणि नागरिक या मोहिमेत सहभागी झाले, नागरिकांनी स्वच्छतेबरोबरच कचरा वर्गीकरण करण्याचं आवाहन भापकर यांनी केलं.

****



 उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीवर कायम स्वरूपी मात करण्यासाठी ग्रामस्थ आणि तरूणांनी एकत्र येत जलसंधारणाची लोकचळवळ उभारली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ग्रामविकास विभाग आणि महात्मा फुले कृषी प्रतिष्ठानच्या वतीनं जिल्ह्यातल्या सहा गावातल्या नद्यांचं पुनरूज्जीवन करण्यात येत आहे. या विषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर.....

 

जिल्ह्यात या वर्षी बेंबळी, टाकळी बेंबळी, खेड, करंजकल्ला, जवळा, पिंपळ वाटोळा या गावातील नद्यांचं पुनरुज्जीवन करण्याची कामं प्रगती पथावर आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी या वीस हजार लोकवस्ती असलेल्या गावातील ग्रामविकास सेवा ग्रूपच्या युवकांनी एकत्र येऊन तीस टक्के लोकवाटा, पाच लाख रुपये गोळा करून महात्मा फुले कृषी प्रतिष्ठानच्या सतरा लाख रूपये निधीतून पाच किलोमीटर सावळा नदीचं खोलीकरण – रुंदीकरण सुरू केलं आहे. हे काम आता प्रगतीपथावर आहे. गावातल्या तरुण युवकांच्या एकीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं साथ दिली आणि गावाकडचा पाणी प्रश्न आता कायमस्वरूपी संपवण्याकडे वाटचाल सुरू आहे.  ---  देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद. 



****



 खतं-बियाणं खरेदीतून नांदेड इथल्या शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी कृषि खात्यानं विशेष लक्ष देऊन, बोगस कंपन्यांच्या मालकांविरुद्ध कडक कारवाई करावी, असे निर्देश, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत. खरीप हंगाम २०१८ जिल्हास्तरीय आढावा बैठक  काल कदम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. महिला आर्थिक विकास महामंडळ बचत गटातील महिलांकडून कापडी पिशव्यांचं वाटपही काल कदम यांच्या हस्ते करण्यात आलं. वजिराबाद इथल्या गुरु गोविंदसिंह जिल्हा रुग्णालयातल्या नियंत्रण कक्षाचं उद्घाटनही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं.

****



 राज्यात काल तीन वेगवेगळ्या अपघातांच्या घटनांमध्ये एकूण १४ जण ठार झाले तर, ८ जण जखमी झाले. मुंबई- पुणे महामार्गावर पनवेल नजीक कार आणि टेम्पोच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. पुणे शहरात काल एका उपाहारगृहात धावती कार घुसून झालेल्या अपघातात, नांदेड जिल्ह्यातल्या मुक्रमाबाद इथले व्यापारी ओमप्रकाश पंदिलवार यांचा मृत्यू झाला.



 तिसरा अपघात भंडारा जिल्ह्यातल्या लाखनी इथं झाला. महामार्गावर एका मंगल कार्यालया समोर उभ्या असलेल्या, वऱ्हाडींना भरधाव कंटेनरनं उडवल्यानं, ७ जणांचा मृत्यू झाला, तर ८ जण जखमी झाले.

*****

***

No comments: