Tuesday, 1 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.05.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 1 May 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक मे  २०१ दुपारी १.०० वा.

****



 आंतरराष्ट्रीय कामगार दिवस आज साजरा होत आहे. आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटनांच्या संवर्धनासाठी दर वर्षी हा दिवस पाळण्यात येतो. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशभरातल्या कामगारांना शुभेच्छा दिल्या आहेत. कामगारांची शिस्त आणि समर्पणामुळे राष्ट्र उभारणी होत असून, नव भारताची पायाभरणी होत असल्याचं सांगून राष्ट्रपतींनी, कामगारच राष्ट्रनिर्माता असल्याचं नमूद केलं.

****



 महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांचा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही राज्यांतल्या रहिवाशांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या दोन्ही राज्याचा विकास आणि संपन्नतेची आशा करत असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. तर पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात, देशाच्या विकासात महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं म्हटलं आहे.

****



 डिजिटल स्वाक्षरीकृत सातबारा योजनेचं आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या सातबारा उताऱ्याची प्रत काढून या सेवेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी काही शेतकऱ्यांनाही सातबारा उताऱ्याच्या प्रती वितरित करण्यात आल्या.

 ही योजना यशस्वी केल्याबद्दल महसूल विभागातले अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या वेळी गौरव करण्यात आला.

****



 राज्याच्या स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरात जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी आज सकाळी ध्वजारोहण करण्यात आलं. पालघर इथं पालकमंत्री विष्णू सावरा, रायगड इथं पालकमंत्री रविंद्र चव्हाण, नंदुरबार इथं पालकमंत्री जयकुमार रावल, अहमदनगर इथं पालकमंत्री राम शिंदे, भंडारा इथं पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, नाशिक इथं पालकमंत्री गिरीश महाजन, सातारा इथं पालकमंत्री विजय शिवतारे, सिंधुदुर्ग इथं पालकमंत्री दीपक केसरकर, तर धुळे इथं पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आलं. 

****



 औरंगाबाद इथं मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर, राज्य सरकारचं मुखपत्र असलेल्या लोकराज्यच्या वाचक उद्दीष्टपूर्तीबद्दल औरंगाबादचे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांचा उत्कृष्ट अधिकारी म्हणून पालकमंत्री दीपक सावंत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

****



 औरंगाबाद इथं वीज महावितरण कंपनीचं प्रादेशिक कार्यालय आणि परिमंडल कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त प्रादेशिक सह व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. गुणवंत कामगारांचा यावेळी प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

****



 स्वच्छ भारत अभियानाला जनआंदोलनाचं स्वरुप प्राप्त व्हावं या उद्देशानं आजपासून स्वच्छ भारत उन्हाळी आंतरवासिता - इंटर्नशीप कार्यक्रम सुरु होत आहे. याद्वारे उन्हाळी सुट्टयांच्या कालखंडात देशातल्या लाखो विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना स्वच्छ भारत मोहिमेत सहभागी करुन घेतलं जाईल. तीन महिन्यांच्या या कार्यक्रमाचा समारोप ३१ जुलै २०१८ रोजी होईल. युवक-युवतींनी पुढाकार घेऊन स्वच्छता मोहिम देशव्यापी करावी आणि या कार्यक्रमात भाग घ्यावा, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बातया कार्यक्रमात केलं होतं.

****



 गावं विजेनं स्वयंपूर्ण झाली याचा अर्थ प्रत्येक गावातल्या १० टक्के घरांमध्ये वीज पोहोचली असल्याचं स्पष्टीकरण ऊर्जा मंत्रालयानं दिलं आहे. ग्रामीण भागात घरगुती वीजपुरवठा ८२ टक्क्यांहून अधिक असून, विविध राज्यात वीज पुरवठ्याचं प्रमाण ४७ ते शंभर टक्के असल्याचं राज्यांच्या ताज्या आकडेवारीत दिसून येत आहे.

****



 जम्मू काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यात काल संध्याकाळी अज्ञात बंदुकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात तीन नागरिक ठार झाले. या हल्ल्यामागे लष्कर - -तय्यबा या दहशयतवादी संघटनेचा संबंध आढळून आल्याचं विभागीय पोलिस मुख्यालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. एका पाकिस्तानी तसंच दोन स्थानिक दहशतवाद्यांचा प्रमुख संशयितात समावेश आहे. अद्याप कुठल्याही दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

****



 मुंबई - गोवा महामार्गावर दुचाकी आणि पीक अप वाहन यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. इंदापूर नजीक धरणवाडी इथं काल रात्री हा अपघात झाला. 

****



 नांदेड इथं काल महिलांसाठी कर्करोग नियंत्रण जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी यावेळी केलेल्या भाषणात जिल्हा कर्करोग नियंत्रण विभागाच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत, नागरिकांनी योग्य वेळी तपासणी तसंच आवश्यकतेनुसार उपचार करून घेण्याचं आवाहन केलं. वजिराबाद इथल्या गुरु गोविंदसिंहजी जिल्हा रुग्णालयातल्या नियंत्रण कक्षाचं उद्घाटनही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं.

*****

***

No comments: