Monday, 21 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 21.05.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 May 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ मे २०१ सकाळी .५० मि.

*****



Ø स्थानिक स्वराज्य संस्थांमधून राज्य विधान परिषदेच्या सहा जागांसाठी आज मतदान

Ø या निवडणुकीत बीड नगर परिषदेतल्या अकरा अपात्र नगरसेवकांचं मत, संबंधित खटल्याच्या पुढील सुनावणीपर्यंत ग्राह्य धरू नये - उच्च न्यायालयाचे निर्देश

Ø म्हाडाचे प्रकल्प वेळेत पूर्ण न करणाऱ्या व्यावसायिकांचं कंत्राट रद्द करण्यासाठी कायद्यात सुधारणेचा राज्य सरकारचा विचार

Ø छत्तीसगडमध्ये दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सात जवानांना वीरमरण

आणि

Ø महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 'कविवर्य भा. रा. तांबे ' पुरस्कार ज्येष्ठ कवी - चित्रकार राजेंद्र अत्रे यांना जाहीर

*****



 स्थानिक स्वराज्य संस्थांमधून राज्य विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सहा जागांसाठी आज मतदान होत आहे. नाशिक, अमरावती, चंद्रपूर, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, उस्मानाबाद-लातूर-बीड, आणि परभणी-हिंगोली, या सहा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे. लातूर-बीड-उस्मानाबाद मतदार संघासाठी लातूरमधून - ३५३, उस्मानाबाद - २९१, आणि बीडमधून - ३६१ असे एकूण एक हजार पाच मतदार, तर परभणी - हिंगोली मतदार संघातून एकूण पाचशे तीन मतदार या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावतील. सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होणार आहे. हे मतदान पसंती क्रमांकानुसार असून, निवडणूक आयोगामार्फत पुरवण्यात आलेल्या जांभळया रंगाच्या मार्कर पेननेच मतदान नोंदवणं आवश्यक आहे. येत्या गुरुवारी म्हणजे २४ मे रोजी मतमोजणी होणार आहे.



 रम्यान, बीड नगर परिषदेतले काकू-नाना आघाडीचे नऊ नगरसेवक आणि इतर दोन, अशा एकूण अकरा नगरसेवकांचं मत पुढील सुनावणी पर्यंत ग्राह्य धरू नये असं, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं म्हटलं आहे. या अपात्र नगर सेवकांना या निवडणुकीत मतदान करता येईल, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं होतं, परंतू या संदर्भात काल खंडपीठात झालेल्या सुनावणीत न्यायालयानं, विजेत्या आणि पराभूत उमेदवारांमध्ये दहापेक्षा कमी मतांचा फरक असल्यास, पुढील सुनावणीपर्यंत लातूर-उस्मानाबाद-बीड मतदार संघाचा निकाल जाहीर करू नये, असे निर्देश दिले आहेत. नगराध्यक्षांच्या दालनात कचरा टाकल्याप्रकरणी या सर्वांना अपात्र घोषीत केलेलं आहे.

****



 २०१९ च्या लोकसभा निवणुकीत युती करण्यासंदर्भात शिवसेनेनं पुढाकार घेतल्याशिवाय बोलणी करणार नसल्याचं भाजप नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. भाजपनं युती करण्यासंदर्भात अनेकदा विचारणा केली, मात्र शिवसेनेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, असं त्यांनी सांगितलं. 

****



 खासगी बांधकाम व्यावसायिकांनी म्हाडाचे प्रकल्प वेळेत पूर्ण केले नाहीत तर या व्यावसायिकांचं कंत्राट रद्द करण्यासाठी कायद्यात सुधारणा करायचा राज्य सरकारचा विचार आहे. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी काल मुंबईत पीटीआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कायद्यात ही तरतूद असली तरी म्हाडा कायद्यात अशी तरतूद नाही, त्यामुळे म्हाडा कायद्यात सुध्दा ही तरतूद करण्यासाठी विधी विभागाकडे असा प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती, त्यांनी दिली. म्हाडा आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प, स्थावर मालमत्ता नियमन प्राधिकरण - रेरा कायद्याच्या अधीन आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं. रेरा अंतर्गत आल्यावर, हे प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होण्याची खात्री बाळगता येईल, असं मेहता म्हणाले.

****



 राज्यातल्या शेतकऱ्यांना आता स्वयंचलित हवामान केंद्रांच्या माध्यमातून हवामानाच्या स्थितीबद्दल सविस्तर माहिती मिळणार आहे. यामुळे पीक व्यवस्थापन आणि नुकसान प्रतिबंधाला मदत मिळेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. गावपातळीपर्यंत अचूक हवामानाचा अंदाज पोहोचवण्यासाठी, राज्यात अशी दोन हजार साठ हवामान केंद्रं उभारली जाणार आहेत.

****



 राज्य शासनातर्फे पशुपालक महिलांना दुभत्या गायी-म्हशींचं वाटप केलं जाणार असून हे पशुधन सांभाळण्यासाठी उत्तरप्रदेशच्या धर्तीवर संगोपन गृह उभारलं जाईल अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. पशूसंवर्धन दिनानिमित्त काल पुणे इथं आयोजित पशुपालक मेळावा आणि राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचं उद्घाटन मुंडे यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्या बोलत होत्या.



 पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यावेळी उपस्थित होते, फिरत्या दवाखान्याद्वारे पशूपालकांच्या गाई-म्हशींवर उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं जानकर यांनी सांगितलं.

****



 छत्तीसगडमध्ये दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सात जवानांना वीरमरण आलं. काल दुपारी झालेल्या या हल्ल्यात, नक्षलवाद्यांनी, जवानांना घेऊन जाणारं वाहन भू-सुरुंगाचा स्फोट करून उडवून दिलं. या हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी जवानांचा शस्त्रसाठाही लुटला. हुतात्मा जवानांमध्ये सशस्त्र दल आणि जिल्हा पोलीस दलाच्या जवानांचा समावेश आहे.  

****



 जागतिक दहशतवाद विरोधी आणि हिंसाचार विरोधी दिन आज देशभरात पाळण्यात येणार आहे. यानिमित्त सर्व शासकीय आस्थापनांनी दहशतवाद विरोधी आणि हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेण्याचे निर्देश शासनानं एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत.   

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ मे रोजी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४४वा भाग असेल.

*****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 आयएनएस तारिणी, हे पृथ्वी प्रदक्षिणेवर गेलेल्या सहा महिला नाविक दलाचं जहाज आज गोव्यात पोहोचणार आहे. सप्टेंबर २०१७ मध्ये गोव्यातूनच या मोहिमेला प्रारंभ झाला होता. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आणि नौदल प्रमुख एडमिरल सुनिल लांबा या महिलांचं स्वागत करणार आहेत.

****



 दक्षिण कोरियात दोंघाई इथं सुरु असलेल्या आशियाई महिला हॉकी अजिंक्यपद चषक स्पर्धेत भारतीय संघ उपविजेता ठरला आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात यजमान दक्षिण कोरियानं भारताला ०-१ नं पराभूत केलं.

****



 पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 'कविवर्य भा. रा. तांबे' विशेष ग्रंथकार पुरस्कार उस्मानाबाद इथले ज्येष्ठ कवी आणि चित्रकार राजेंद्र अत्रे यांना, जाहीर झाला आहे. अत्रे यांचे अनेक कथा-कविता संग्रह प्रसिध्द असून शैक्षणिक अभ्यासक्रमात त्यांच्या कवितांचा समावेश आहे. जालना इथं झालेल्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या विभागीय कवी संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलेलं आहे. आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्राच्या संगीत विभागानं त्यांची अनेक गाणी संगीतबध्द केली आहेत. येत्या शनिवारी २६ मे रोजी पुणे इथं हा पुरस्कार त्यांना समारंभपूर्वक प्रदान केला जाईल.

****



 केंद्रीय लोकसेवा आयोग तसंच राज्यसेवेच्या विविध परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले नांदेड जिल्ह्यातले उमेदवार, आणि त्यांच्या पालकांचा काल नांदेड जिल्हा प्रशासनातर्फे सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी यावेळी भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांना उद्देशून केलेल्या भाषणात, शासकीय सेवेत काम करतांना जनसेवेच्या कामांची जाणीव ठेवावी, असं आवाहन केलं.

****



 परभणी जिल्ह्यातल्या सावरगाव इथं जलसंधारणासाठी ग्रामस्थांच्या महाश्रमदानातून काल दोन बंधारे उभारण्या आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जिल्हाधिकारी पी.शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पृथ्वीराज यांच्यासह जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनीही या श्रमदानात सहभाग घेतला.

****



 लातूर जिल्ह्यात जलसंधारण कामांसाठीच्या इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानाला कालपासून प्रारंभ झाला. जिल्ह्यातल्या सुमारे तीन हजार नागरिकांनी यावेळी जलयोद्धा म्हणून नोंदणी केली. दोन वर्षांपूर्वी २० मे, २०१६ रोजी लातूरला मिरजहून रेल्वेनं पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली होती, ही परिस्थिती बदलण्यासाठी काल २० मे हा दिवस लातूर इथं स्वावलंबन दिन म्हणून साजरा करण्यात आला.

****



 वीज ग्राहकांना पावसाळयात अखंडित वीज पुरवठयासाठी मान्सूनपूर्व कामं वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी दिल्या आहेत. महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या औरंगाबाद, जळगाव, लातूर आणि नांदेड परिमंडळातल्या ११ जिल्हयात ही कामं दर शुक्रवारी सकाळी सुरू करून दुपारी एक वाजे पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत.

****



 जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यात मच्छिंद्रनाथ चिंचोली इथं लघूसिंचन तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर तीन मुलींना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आलं आहे. काल सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

****



 जालना शहरात भरधाव ट्रकनं दुचाकीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दोन विद्यार्थी ठार झाले. शहरातल्या छत्रपती संभाजी उद्यानासमोर काल दुपारी हा अपघात झाला. औरंगाबाद जळगाव मार्गावरही काल रस्ता अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला.

****



 नाट्य अभिनेत्री राणी जोशी यांचं काल औरंगाबाद इथं निधन झालं, त्या ३८ वर्षांच्या होत्या. गाढवाचं लग्न, विच्छा माझी पुरी करा, आदी नाटकातल्या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. काल सायंकाळी त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

*****

***

No comments: