Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 May 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ मे २०१८ दुपारी १.०० वा.
****
जम्मू काश्मीरमधल्या
अरनिया आणि आर एस पुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं आज परत एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन
केलं. सकाळी सात वाजता पाकिस्तानी सैन्यानं लष्करी तळ आणि रहीवाशी भागांना लक्ष्य करत
गोळीबार सुरु केला. यात तीन नागरिक जखमी झाल्याचं वृत्त आहे. सीमा सुरक्षा बलाचे जवान
या गोळीबाराला चोख प्रत्यूत्तर देत आहेत.
पाकिस्तानी सैन्यानं
काल रात्रीच्या सुमारासही जम्मूजवळ
गोळीबार आणि बॉंम्बहल्ले केले. अरनिया आणि रामगड सेक्टर मध्ये रात्री साडेदहाच्या
सुमारास हे हल्ले झाल्याचं सीमासुरक्षा दलानं सांगितलं.
****
माजी पंतप्रधान राजीव गंधी यांची आज पुण्यतिथी. यानिमित्त
देशभरात त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया
गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह इतर काँग्रेस
नेत्यांनी दिल्लीतल्या वीरभूमी इथल्या राजीव गांधी यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करुन
अभिवादन केलं.
देशभरात आजचा दिवस दहशतवाद विरोधी आणि हिंसाचार विरोधी
दिन म्हणून पाळण्यात येतो. यानिमित्त सर्व शासकीय आस्थापनांमध्ये दहशतवाद विरोधी आणि
हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली.
आकाशवाणी औरंगाबाद केंद्रातही कर्मचाऱ्यांना दहशतवाद
विरोधी आणि हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा देण्यात आली.
****
स्थानिक
स्वराज्य संस्थांमधून राज्य विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सहा जागांसाठी आज
मतदान होत आहे. नाशिक, अमरावती, चंद्रपूर, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, उस्मानाबाद-लातूर-बीड, आणि परभणी-हिंगोली, या
सहा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक होत आहे. सकाळी आठ वाजता
मतदानाला सुरुवात झाली. उस्मानाबाद इथं मतदानाची गती संथ असल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत तीन्ही जिल्ह्यातल्या २९ मतदान
केंद्रांवर एकूण एक हजार पाच पैकी ३६९ मतदारांनी, म्हणजे ३६ टक्के मतदारांनी मतदान
केलं. तर बीड जिल्ह्यात दोन तासात ४० जणांनी मतदान केल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे. लातूर इथंही सकाळी दहा वाजेपर्यंत दोन पूर्णांक ८३ टक्के मतदान झालं.
तर परभणी हिंगोली मतदासंघात दुपारी १२ वाजेपर्यंत १४ टक्के मतदान झालं.
****
औरंगाबादच्या
महिला महाविद्यालयाच्या प्राध्यापिका मनिषा वाघमारे यांनी जगातलं सर्वोच्च एव्हरेस्ट
शिखर सर केलं आहे. आज सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी एव्हरेस्ट शिखर चढण्याची
मोहीम पूर्ण केल्याची माहिती आय सी एफचे जगदीश खैरनार यांनी दिली. त्यानंतर त्या माघारी
फिरल्या असून परतीचा प्रवास सुरु झाला आहे. साधारण दोन ते तीन दिवसात त्या बेस कॅम्पला
परत पोचणार आहेत. गेल्या वर्षी खराब हवामानामुळे त्यांना मोहीम अर्धवट सोडून माघारी
परतावं लागलं होतं.
****
मुंबईच्या
जे. जे. रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांचा संप आज तिसऱ्या दिवशीही सुरुच आहे. शीव
इथल्या लोकमान्य टिळक रुग्णालयातल्या डॉक्टरांनीही या संपाला पाठिंबा दिला आहे. शनिवारी जे. जे. रुग्णालयात अत्यावस्थ रुग्णाचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला, त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली
होती. 'रुग्णालयातल्या प्रत्येक वॉर्डची सुरक्षा तातडीनं वाढवावी
या मागणीबाबत मार्ड' संघटना आणि वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक
प्रकाश वाकोडे यांच्यात काल तोडगा काढ़ण्यासंदर्भात बैठक झाली, मात्र
त्यात काहीही निर्णय न झाल्यानं मार्डनं संप सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला.
वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी मार्डच्या डॉक्टरांना चर्चेसाठी बोलावलं
आहे.
****
हवामान बदलाच्या समस्येशी लढा देण्यासाठी मोठी
कृती करण्यासंदर्भात विकसित देशांचा प्रतिसाद पुरेसा नसल्याचं भारतानं म्हटलं आहे. डर्बन
इथं २६ व्या बेसिक मंत्रीस्तरावरील पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत, केंद्रीय
पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी, जागतिक पातळीवर हवामान बदलाच्या
समस्या अत्यंत गंभीर असून, याला सामोरं जाण्यासाठी विकसनशील देशांना
अंमलबजावणीसाठी उद्दिष्ट्य ठरवून देण्यासाठी विकसित देशानं पुढे येवून नेतृत्व
स्वीकारण्याचं आवाहन केलं. बेसिक
या देशांमधे ब्राझिल, दक्षिण
आफ्रीका, भारत आणि चीन या विकसनशील देशांचा समावेश आहे.
****
राष्ट्रीय
कौशल्य विकास मिशनच्या माध्यमातून देशातल्या ४० कोटी
जनतेला २०२२ पर्यंत विविध कौशल्यांचं प्रशिक्षण देण्याचं सरकारचं
उद्दिष्ट्य असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र
प्रधान यांनी म्हटलं आहे. भुवनेश्वर इथं पेट्रोलियम मंत्रालयाच्या वतीनं कौशल्य
विकास संस्थेच्या दुसऱ्या वर्धापनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मिशनच्या
वतीनं युवकांना औद्योगिक वेल्डींग्, औद्योगिक विद्युतकार्य ते कॉम्प्युटर डाटा अॅप्लीकेशन
अशा विविध कौशल्याचं प्रशिक्षण दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
*****
***
No comments:
Post a Comment