Tuesday, 1 May 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 01.05.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 1 May 2018

Time - 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १ मे २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

बाल लैंगिक शोषणाशी निगडित सर्व खटले विशेष जलदगती न्यायालयात चालवावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. या खटल्यांवर देखरेख आणि नियमन करण्यासाठी सर्व राज्यांच्या उच्च न्यायालयांनी तीन न्यायमूर्तींची एक समिती स्थापन करावी, असंही न्यायालयानं या संदर्भात दिलेल्या दिशानिर्देशांमध्ये म्हटलं आहे. बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा - पॉक्सो नुसार अशा खटल्याचं कामकाज विनाकारण पुढे न ढकलण्याची सूचना उच्च न्यायालयानं संबंधित न्यायमूर्तींना करावी, असंही न्यायालयानं सांगितलं आहे. सर्व राज्यांच्या पोलिस महासंचालकांनी, यासंदर्भात एक विशेष कृतीदल स्थापन करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.

****

देशात वस्तू आणि सेवा कर - जीएसटी लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात जीएसटीच्या माध्यमातून एक लाख कोटी इतका महसूल प्राप्त झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयानं आज ही आकडेवारी जाहीर केली. जीएसटीला मिळालेलं हे ऐतिहासिक यश असून, वाढत्या आर्थिक व्यवहारांच्यादृष्टीनं फायदेशीर असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं आहे. 

****

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद - एनसीईआरटीनं शाळा आणि पालकांना सायबर सुरक्षेविषयी दिशानिर्देश जारी केले आहेत. विद्यार्थ्यांना इंटरनेटचा सुरक्षित, कायदेशीर आणि नैतिक उपयोग करण्यासाठी शिक्षक आणि पालकांनी प्रोत्साहन द्यावं, यासाठी परिषदेनं हे निर्देश जारी केले आहेत. विद्यार्थ्यांनी इंटरनेटवरुन ओळख झालेल्या व्यक्तीला भेटू नये, तर शिक्षकांनी मुलांच्या वर्तणुकीतल्या बदलांचं निरीक्षण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. सायबर सुरक्षेविषयी अधिक मार्गदर्शन करण्यासाठी शाळांनी विशेष उपक्रम घ्यावेत, असंही परिषदेनं सूचवलं आहे.      

****

देशातल्या कामगारांचं जीवनमान सुधारण्यासाठी नवीन विचारांसोबत काम करण्याची गरज असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. संघटीत आणि असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांना निवास, शिक्षण आणि आरोग्य या सुविधा मिळायला पाहिजे, असं ते म्हणाले. कामगारांच्या मेहनतीमुळे देश आज प्रगती करत असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

येत्या एक ऑगस्टनंतर सर्व शेतकऱ्यांना डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत आज डिजिटल स्वाक्षरीकृत सातबारा योजनेचं लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले -

आज आपण ४० हजार गावांचा अचूक डेटा हा संगणकीकृत डिजीटल फॉरमॅटमध्ये आणू शकतोय आणि एक ऑगस्टला आपण त्याची डिजीटल स्वाक्षरी देखील पूर्ण करु. रोज त्याच्यामध्ये १०-२० लाख, ५० लाखाची भर पडतेय. आणि ही भर पडून एक ऑगस्टपर्यंत हे निश्चितपणे मिळेल.

सर्वसामान्यांना सरकारच्या एका विभागातून कागदपत्रं घेऊन ती सरकारच्याच दुसऱ्या विभागात जमा करावी लागू नयेत, दोन विभागांनीच परस्पर समन्वय साधावा, हा सरकारी कामकाजाच्या डिजिटायझेनचा उद्देश असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांसह अनेक शेतकऱ्यांना यावेळी सातबारा उताऱ्याच्या प्रती वितरित करण्यात आल्या. ही योजना यशस्वी केल्याबद्दल महसूल विभागातले अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

****

मुंबई शहरासाठी तयार करण्यात आलेल्या ‘नव विकास आराखडा २०३४’ मुळे मूलभूत परिवर्तन होईल, असं केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास राज्यमंत्री हरदिप सिंह पुरी यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरणाच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. हा आराखडा तयार केल्याबद्दल पुरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यावेळी प्रशंसा केली. या विकास आराखड्यामुळे फक्त महानगरातच नव्हे तर संपूर्ण राज्यात गुणात्मक बदल दिसून येईल, असं ते म्हणाले. गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आलेल्या या विकास आराखड्यात, जमिनीचे नवीन दर निश्चित केले आहेत.

****

दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी पाणी फाऊंडेशनच्या वतीनं आज राज्यभरात महाश्रमदान अभियान राबवण्यात आलं. लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यात तळेगाव भोगेश्वर इथं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी श्रमदान केलं. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत देवणी तालुक्यानं भाग घेतला असून, सध्या नाला सरळीकरण आणि कंपार्टमेंट बंडीगची कामं श्रमदानाच्या माध्यमातून सुरु आहेत.

****

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आज महाराष्ट्र दिनी यवतमाळ इथं विदर्भवाद्यांनी काळा दिवस पाळला. नगर भवन परिसरात असलेल्या लोकनायक बापूजी अणे यांच्या पुतळ्याशेजारी विदर्भ राज्याचं ध्वजारोहण करुन कार्यकर्त्यांकडून स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा देत नेताजी चौकात धरणे आंदोलन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments: