Wednesday, 2 May 2018

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 02.05.2018 6.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 May  2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ मे २०१ सकाळी .५० मि.

****

·       महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन काल उत्साहात साजरा

·       डिजिटल स्वाक्षरीकृत सातबारा योजनेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

·       दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी पाणी फाऊंडेशनचं राज्यभरात महाश्रमदान; लातूर जिल्ह्यात फत्तेपूर इथं अभिनेता आमिर खान, तसंच अभिनेत्री अलिया भट यांचा श्रमदानात सहभाग

आणि

·       ५० लाख रूपये लाचप्रकरणी मुंबईत सीमाशुल्क विभागातल्या उपायुक्त दर्जाच्या चार अधिकाऱ्यांना अटक

****

महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस काल उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईत शिवाजी पार्कमध्ये राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाचं मुख्य ध्वजारोहण झालं. कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या जवळपास तीन लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, लातूर इथं नियोजित रेल्वे डब्याच्या कारखान्यामुळे प्रत्यक्षात २५ हजार नोकऱ्यांची निर्मिती आणि पुढील वर्षापर्यंत सर्व बेघरांना हक्काचं घर देण्यासाठी, १२ लाख घरं बांधण्याचा मनोदय, राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यभरात जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

औरंगाबाद इथं पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं. यावेळी केलेल्या भाषणात पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातला ग्रामीण भाग उघड्यावर शौचापासून मुक्त झाल्याचं सांगितलं. शासनामार्फत राबवल्या जात असलेल्या विविध योजनांचा त्यांनी आढावा घेतला, ते म्हणाले...

प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतांना देशाच्या विकासात आपल्या  राज्याचे योगदार फार महत्त्व पुर्ण आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान महत्वाकांक्षी योजना अतिशय पारदर्शकपणे राबविलेली आहे. शहिद सैनिकांच्या वीर पत्नीस पंचवीस लाख रुपये तसेच पाच एक्कर जमिन आणि इतर लाभही देण्यात येत आहे.  वीर पत्नींना शासन सेवेत सामावून घेण्याच्या संदर्भात तसेच वीर पत्नी आणि त्यांच्या अपत्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजणांच्या माध्यमातुन आरोग्याचे सुरक्षा कवच देखील उपलब्ध करण्यासाठी राज्य शासनाने सकारात्मक पावले उचलली आहेत.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते २२ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांची सन्मानचिन्हं प्रदान करण्यात आली. क्रीडापटू, तलाठी तसंच उद्योजकांचाही यावेळी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

हुतात्मा जवानांच्या वीरपत्नींना राज्य मार्ग परिवहन - एसटी बससेवेचे आजीवन मोफत पास वितरित करण्यात आले. 

जालना इथं पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. जालना जिल्हा निर्मितीला ३७ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लोणीकर यांनी जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या.

बीड इथं पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते तर लातूर इथं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

नांदेड इथं पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते, उस्मानाबाद इथं पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते तर परभणी इथं जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.

हिंगोलीत पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. पोलीस दलातल्या पदक प्राप्त आधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

****

आंतरराष्ट्रीय कामगार दिवसही काल विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटनांच्या सक्षमीकरणासाठी दर वर्षी हा दिवस पाळण्यात येतो.

****

येत्या एक ऑगस्टनंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत काल डिजिटल स्वाक्षरीकृत सातबारा योजनेचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते.



आज आपण ४० हजार गावांचा अचूक डेटा हा संगणकीकृत डिजीटल फॉरमॅटमध्ये आणू शकलोय आणि एक ऑगस्टला आपण त्याची डिजीटल स्वाक्षरी देखील पूर्ण करु. रोज त्याच्यामध्ये १०-२० लाख, ५० लाखाची भर पडतेय. आणि ही भर पडून एक ऑगस्टपर्यंत हे निश्चितपणे मिळेल.



सर्वसामान्यांना सरकारच्या एका विभागातून कागदपत्रं घेऊन ती सरकारच्याच दुसऱ्या विभागात जमा करावी लागू नयेत, दोन विभागांनीच परस्पर समन्वय साधावा, हा सरकारी कामकाजाच्या डिजिटायझेनचा उद्देश असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांसह अनेक शेतकऱ्यांना यावेळी सातबारा उताऱ्याच्या प्रती वितरित करण्यात आल्या. ही योजना यशस्वी केल्याबद्दल महसूल विभागातले अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

****

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआयनं मुंबईत सीमाशुल्क विभागातल्या उपायुक्त दर्जाच्या चार अधिकाऱ्यांना अटक केली आहे. एका आयातदाराच्या मालाला परवानगी देण्यासाठी ५० लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी ही अटक करण्यात आली. नवी दिल्लीत सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. या प्रकरणी आणखी दोघांना अटक केली जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी मुंबईतल्या एका न्यायालयात सांगितलं.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

$33FD113F-59D5-4F37-83B1-FC574C0A020A$****

बुलेट ट्रेन, नाणार या सारख्या प्रकल्पांना आपल्या जमिनी देऊ नका, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं आहे. काल पालघर इथं एका सभेमध्ये त्यांनी हे आवाहन करताना राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली. जनतेच्या समस्या सोडवण्यात राज्य आणि केंद्र सरकार पूर्णपणे अयशस्वी ठरल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.

****

दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी पाणी फाऊंडेशनच्या वतीनं काल राज्यभरात महाश्रमदान अभियान राबवण्यात आलं. लातूर जिल्ह्यातल्या फत्तेपूर या गावी अभिनेता आमिर खान, त्याची पत्नी किरण राव तसंच अभिनेत्री अलिया भट यांनी काल श्रमदानात सहभाग नोंदवला. गेली तीन वर्ष जलसिंचन प्रकल्पांसाठी अशी कामं राज्यात सुरू आहेत. यंदा राज्यातल्या ७५ तालुक्यांची या कामांसाठी निवड झाली असून त्यात लातूर जिल्ह्यातल्या औसा, निलंगा आणि देवणी तालुक्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी एक हजार तीनशे गावांत हा उपक्रम राबवण्यात आला, यंदा चार हजार पाचशे गावांत ही कामं होणार असल्याचं अमिर खाननं सांगितलं.

पाणी फाऊंडेशनचे एक लाख ३६ हजार स्वंयसेवक राज्यात श्रमदानात आपला सहभाग नोंदवणार आहेत. २१ मे पर्यंत हे काम चालणार आहे. यामध्ये जनतेनं सहभागी व्हावं, असं आवाहन अलिया भटनं यावेळी केलं.

देवणी तालुक्यात तळेगाव भोगेश्वर इथं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी श्रमदान केलं.

परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यात चारठाणा, जांब आणि भोसी इथंही महाश्रमदान करण्यात आलं.

****

गावांना शहराप्रमाणं पायाभूत सुविधा पुरवण्याची सुविधा असलेल्या श्यामा प्रसाद मुखर्जी रुरबन अभियानाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचं आवाहन औरंगाबादचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केलं आहे. या अभियानाच्या शिखर समितीची बैठक काल औरंगाबादमध्ये त्यांच्या उपस्थितीत झाली, त्यावेळी ते बोलत होते. या अभियानांतर्गत जिल्ह्यातल्या एकूण १२ गावांचा समावेश आहे.

खुलताबाद तालुक्यातल्या गदाना गावात श्रमदानातून केलेल्या कामाची पालकमंत्री डॉक्टर सावंत यांनी पाहणी करून गावकऱ्यांचं कौतुक केलं.

त्याचबरोबर पालकमंत्र्यांनी औरंगाबाद शहरातल्या विविध ठिकाणी भेट देऊन कचऱ्याच्या व्यवस्थापनाची पाहणी केली. कचऱ्यावर लवकरात लवकर प्रक्रिया करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

****

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी काल महाराष्ट्र दिनी यवतमाळ इथं विदर्भवाद्यांनी काळा दिवस पाळला. नगर भवन परिसरात असलेल्या लोकनायक बापूजी अणे यांच्या पुतळ्याशेजारी विदर्भ राज्याचं ध्वजारोहण करुन कार्यकर्त्यांकडून स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा देत नेताजी चौकात धरणे आंदोलन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

पुण्याजवळील भोसरी इथल्या एका भूखंडाच्या खरेदीत तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पदाचा दुरुपयोग केल्याच्या आरोपाच्या चौकशीचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पुणे न्यायालयात सादर केला आहे. हा २२ पानी अहवाल २७ एप्रिललाच सादर केला असल्याचं पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं. अहवालाचा तपशील सांगायला मात्र त्यांनी नकार दिला. पुण्याच्या एका व्यावसायिकानं खडसे यांच्या विरोधात ही तक्रार केली होती.

****

अहमदनगर जिल्ह्यात जामखेड इथं राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांडाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे देण्याची मागणी विधान सभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे. पीड़ित कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी वळसे पाटील काल अहमदनगरला आले होते. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली. २८ एप्रिल रोजी या दोन कार्यकर्त्यांची हत्या झाली. जामखेडमध्ये घडणाऱ्या घटना आणि पोलिसांची मानसिकता लक्षात घेता या घटनेचा तपास स्थानिक पोलिस कार्यक्षमपणे करू शकणार नाही, असं वळसे पाटील म्हणाले.

//*********//


No comments: