Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 2 May 2018
Time - 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २ मे २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
ऊस
उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी देण्यासाठी साखर कारखान्यांना प्रतिटन ५५ रूपयांची आर्थिक
मदत देण्याचा निर्णय, केंद्रीय मंत्रीमंडळांच्या आर्थिक व्यवहार समितीनं आज घेतला.
२०१७-१८ या वर्षातल्या हंगामासाठी ही मदत असणार आहे. ही मदत कारखान्यांच्या वतीनं थेट
शेतकऱ्यांना देण्यात येईल. साखरेचे दर घटल्यामुळे ऊस उत्पादक आणि साखर कारखाने अडचणीत
आले होते. मात्र या निर्णयानंतर त्यांना दिलासा मिळणार आहे.
ज्येष्ठ
नागरिकांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठीचा एक प्रयत्न म्हणून सरकारनं सुरू केलेल्या ‘प्रधानमंत्री
वय वंदन योजने’ मध्ये गुंतवणुकीसाठी असलेली याआधीची साडेसात लाख रुपयांची मर्यादा वाढवून
ती पंधरा लाख रुपये करण्यालाही केंद्रीय मंत्रीमंडळानं आज मंजुरी दिली. देशातल्या चेन्नई,
गुवाहटी आणि लखनौ इथल्या विमानतळांचं पाच हजार कोटी रुपये खर्च करून विस्तार आणि आधुनिकीकरण
करण्यासही मंत्रीमंडळानं मान्यता दिली. प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजनेला २०१९-२०
पर्यंत मुदतवाढ देण्याला तसंच ‘हरित क्रांती, कृषी उन्नती’ योजनेकरता २०१९-२० या वर्षासाठी
तेहतीस हजार दोनशे त्रेहात्तर कोटी रुपये निधी देण्यासदेखील मंत्रीमंडळानं मंजुरी दिली.
****
मुंबईतले
पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्या प्रकरणी आज मुंबईच्या विशेष मकोका न्यायालयानं
प्रमुख आरोपी छोटा राजनसहित सर्व नऊ दोषी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पत्रकार
जिग्ना व्होरा आणि पोल्सन जोसेफ या दोन आरोपींची न्यायालयानं सबळ पुराव्याअभावी निर्दोष
मुक्तता केली आहे. पत्रकार जे.डे यांची जून २०११ मध्ये मुंबईतल्या पवई भागात गोळ्या
घालून हत्या करण्यात आली होती.
****
गेल्या
पाच वर्षांमध्ये बँक घोटाळ्यांची तेवीस हजारहून जास्त प्रकरणं उघडकीला आली असून एकूण
एक लाख कोटी रुपयांची रक्कम या घोटाळ्यांमध्ये गुंतली असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह
बँकेनं दिली आहे. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत बँकेनं ही माहिती दिली आहे. या सगळ्या
प्रकरणांबाबत चौकशीची प्रक्रिया सुरू असून, योग्य ती कारवाई होत असल्याचं बँकेनं म्हटलं
आहे. यामध्ये पंजाब नॅशनल बँक आणि आयडीबीआय बँक घोटाळा प्रकरणांचाही समावेश असल्याचं
बँकेनं सांगितलं.
दरम्यान,
सरकारनं लोकसभा अधिवेशनाच्या काळात दिलेल्या माहितीनुसार, देशभरातल्या सगळ्या बँकांच्या
बुडित कर्जाची रक्कम आठ लाख चाळीस हजार नऊशे अट्ठावन्न कोटी रुपये, इतकी असून देशातली
सर्वात मोठी, भारतीय स्टेट बँक, दोन लाख कोटी रुपयांहून जास्त बुडित कर्जासह या यादीत
पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर या यादीत पंजाब नॅशनल बँक, आयडीबीआय बँक, बँक ऑफ इंडिया,
बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक आणि आयसीआयसीआय बँक आहेत.
****
छत्तीसगड
राज्याची रहिवासी असलेल्या एका नक्षलवादी महिलेनं आज गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण
केलं. ज्योती ऊर्फ रविना जोगा पुद्यामि नावाच्या या नक्षलवादी महिलेला पकडण्यासाठी
सरकारनं चार लाख रुपयांचं बक्षिस जाहीर केलं होतं. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या आत्मसमर्पण
धोरणाला गडचिरोली जिल्ह्यातले अनेक नक्षलवादी प्रतिसाद देत असून, यावर्षी आतापर्यंत
नऊ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं असल्याचं गडचिरोली पोलिसांनी सांगितलं.
****
बुलढाणा
जिल्ह्यातल्या देव्हरी गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांचे सातबारे डिजीटल स्वाक्षरीयुक्त
करण्यात आले असून हे गाव पूर्णत: डिजीटल स्वाक्षरीयुक्त ७/१२ असलेलं अमरावती विभागातलं
पहिलं गाव ठरलं आहे. खामगांव - बुलडाणा रस्त्यावर या गावाच्या या यशाचा माहिती फलक
उभारण्यात आला असून, या फलकाचं अनावरण आज पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते
करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
येत्या
चार दिवसांमध्ये मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये चाळीस अंश सेल्शियसहून जास्त
तापमान राहणार असून, विशेषत: परभणी आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवणार
असल्याचा इशारा परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं दिला आहे. येत्या
सहा आणि सात तारखेला लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी अतिशय हलका
पाऊस होण्याची शक्यताही विद्यापीठानं वर्तवली आहे.
विदर्भातल्या
सगळ्या जिल्ह्यांमधल्या काही ठिकाणी येत्या चार दिवसात उष्णतेची लाट येण्याचा इशारा
भारतीय हवामान खात्यानं दिला आहे.
****
No comments:
Post a Comment