Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 21 May 2018
Time - 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ मे २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून राज्य विधान परिषदेवर
निवडून द्यायच्या सहा जागांसाठी आज मतदान शांततेत पार पडलं. यात नाशिक, अमरावती, चंद्रपूर, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, उस्मानाबाद-लातूर-बीड, आणि परभणी-हिंगोली, या
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांचा समावेश आहे. उस्मानाबाद-लातूर-बीड
मतदारसंघात बीड जिल्ह्यात ९९ पूर्णांक ७२ टक्के, तर लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात १०० टक्के मतदान झालं. हिंगोली जिल्ह्यात ९८ पूर्णांक सोळा टक्के, तर परभणी जिल्ह्यात ९९ पूर्णांक ६० टक्के मतदान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात
१०० टक्के तर रायगड जिल्ह्यात ९९ पूर्णांक ५७ टक्के मतदान झालं. येत्या गुरुवारी २४ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
****
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी देशभरात आज
दहशतवाद विरोधी आणि हिंसाचार विरोधी दिन म्हणून पाळण्यात आली. यानिमित्त सर्व शासकीय
आस्थापनांमध्ये दहशतवाद विरोधी आणि हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली.मंत्रालयात
शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी
राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. आणि उपस्थित
कर्मचाऱ्यांना दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी शपथ दिली.
औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ.
पुरुषोत्तम भापकर यांनी, बीड
जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी, तर जालना
जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांनी उपस्थित अधिकारी,
कर्मचाऱ्यांना दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी शपथ दिली.
****
आयएनएसव्ही तारिणी या नाविक दलाच्या जहाजातून पृथ्वी प्रदक्षिणेवर
गेलेल्या सहा महिला नाविक अधिकारी आज भारतात परतल्या. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन
यांनी गोवा इथं या महिलांचं स्वागत केलं. या महिलांनी २१ हजार ६०६ समुद्री मैल अंतर
पार केलं. सप्टेंबर २०१७ मध्ये गोव्यातूनच या मोहिमेला प्रारंभ झाला होता.
****
भारतानं ब्राम्होस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी
चाचणी केली आहे. ओडीशातल्या चंडीपूर बेटावरुन आज सकाळी १० वाजून ४० मिनीटांनी या इंडो
रशियन क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. या क्षेपणास्त्रात नवीन तंत्रज्ञान समाविष्ट
करण्यात आलं आहे. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी संरक्षण संशोधन विकास संस्था
आणि ब्राम्होस गटाचं या यशस्वी चाचणीबद्दल अभिनंदन केलं आहे.
****
शेतकऱ्यांचं उत्पन्न २०२२ पर्यंत
दुप्पट करणं या उद्दिष्ट पूर्तीच्या अनुषंगानं राज्यात येत्या २४ मे ते सात जून या
कालावधीत "उन्नत शेती - समृध्द शेतकरी" पंधरवडा
राबवण्यात येणार आहे. कृषी विभागामार्फत शेती विकासाच्या तसंच शेतकरी
कल्याणाच्या विविध योजना आणि कार्यक्रम या कालावधीत राबवले जातात. कृषी
विभागाच्या प्रचलित योजनांच्या अमंलबजावणीत अधिक सुटसुटीतपणा तसंच सुसूत्रता आणून
योजना पारदर्शकरीत्या आणि
अधिक प्रभाविपणे राबवण्याचा
शासनाचा उद्देश आहे.
****
औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदिप
जैस्वाल यांना आज दुपारी अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं
आहे. औरंगाबाद शहरात या महिन्यात उसळलेल्या दंगलीनंतर अटक केलेल्या संशयीतांना सोडण्याची
मागणी करण्यासाठी जैस्वाल काल रात्री क्रांती चौक पोलिस ठाण्यात गेले होते. पोलिसांनी
आरोपींना सोडण्यास नकार दिल्यानंतर जैस्वाल आणि समर्थकांनी पोलीस ठाण्यात खुर्च्यांची
फेकाफेक करत तोडफोड केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली.
****
संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगानं सर्व यंत्रणांनी
सर्तक राहावं, तसंच उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी एकमेकांत समन्वय ठेऊन
कार्यवाही त्वरीत पार पाडावी, अशा सूचना औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिल्या
आहेत. औरंगाबाद इथं आज नैसर्गिक आपत्तीच्या संदर्भात करावयाच्या पूर्वतयारीबाबत आयोजित
आढावा बैठकीत ते बोलत होते.
****
धुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या अंतर जिल्हा
बदली प्रक्रिया ऑनलाईन राबवून देखील अनेक घोळ झाल्याचं स्पष्ट होत आहे. बदली प्रक्रियेचा
लाभ घेण्यासाठी तसंच बदलीत सुट मिळवण्यासाठी शिक्षकांनी स्वत:च खोटी कागदपत्रं सादर
केली असल्याचं निदर्शनास आलं आहे. यासंदर्भात तक्रारी देखील आल्या असून, धुळे जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराज यांनी खोटी कागदपत्रं सादर करणाऱ्या
शिक्षकांची माहिती मागविली आहे.
****
राज्यात उष्णतेत वाढ कायम असून, आज सर्वात जास्त ४७ पूर्णांक
पाच अंश सेल्सिअस तापमान ब्रम्हपुरी इथं नोंदवलं गेलं. नांदेड ४३ पूर्णांक पाच, परभणी
आणि उस्मानाबाद इथं सरासरी ४२, तर औरंगाबाद इथं ४१ पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची
नोंद झाली.
//*********//
No comments:
Post a Comment