Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 20 May 2018
Time
6.50 AM to 7.00 AM
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
२० मे २०१८
सकाळी ६.५०
मि.
*****
·
वीज पुरवठा नसलेल्या चार कोटी घरांना येत्या दीड
वर्षात वीज पुरवठा - पंतप्रधानांची ग्वाही
·
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांचा बहुमत
चाचणीपूर्वीच राजीनामा
·
सर्व विद्यापीठं आणि उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये
प्लास्टिक वस्तूंवर बंदी - विद्यापीठ अनुदान आयोगाचे आदेश
आणि
· बीड
जिल्ह्यात लाच प्रकरणी तीन पोलिसांसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
****
स्वातंत्र्यानंतर ज्या चार कोटी घरांना वीज पुरवठा झाला
नाही, अशा घरांना येत्या दीड वर्षात वीज पुरवठा करण्यात येईल, असं पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी काल जम्मू आणि काश्मीरमध्ये जोजिला पास इथं सुमारे
१४ किलोमीटर दोनशे मीटर लांबीच्या बोगद्याचं भूमिपूजन केलं, त्यानंतर ते बोलत होते.
या बोगद्यामुळे श्रीनगर, कारगील आणि लेह दरम्यान
सर्व ऋतुंमध्ये संपर्क राखणं शक्य होणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ मे रोजी आकाशवाणीवरच्या
‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४४वा
भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य
एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर, माय जी ओ व्ही ओपन फोरमवर किंवा
नरेंद्र मोदी ॲप वर नोंदवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी काल कर्नाटक
विधानसभेत बहुमत चाचणीपूर्वीच राजीनामा दिला. तत्पूर्वी विधानसभेत केलेल्या भाषणात
त्यांनी, कर्नाटकच्या जनतेनं भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून दिल्याबद्दल
आभार मानले, आणि बहुमत चाचणीला सामोरं न जाता, राजीनामा देत असल्याची घोषणा केली. दरम्यान,
राज्यपाल वजुभाई वाला यांनी धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच डी कुमारस्वामी यांना
सरकार स्थापन करण्यासाठी बोलावलं आहे.
****
विद्यापीठ अनुदान आयोग - युजीसीनं देशभरातली सर्व विद्यापीठं
आणि उच्च शैक्षणिक संस्थांना, त्यांच्या परिसरात प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घालण्याचे
आदेश दिले आहेत. भारत यंदाच्या जागतिक पर्यावरण दिन समारंभाचा यजमान असून, प्लास्टिकजन्य
प्रदुषणावर मात करणं, ही या दिनाची संकल्पना आहे, या पार्श्वभूमीवर युजीसीनं हा निर्णय
घेतला. प्लास्टीकची ताटं, वाट्या, जेवणाची पाकिटं, बाटल्या, मग, स्ट्रॉ अशा वस्तूंच्या
वापरास बंदी घालण्यासंर्भात आयोगानं सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंना पत्र पाठवलं आहे.
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत विद्यापीठांनी विविध उपक्रम राबवावेत, असंही आयोगानं सांगितलं
आहे.
****
राज्यातल्या धर्मादाय रुग्णालयांमध्ये मोफत आणि सवलतीच्या
दरात उपचार मिळण्याबाबत योजना जाहीर करण्यात आली आहे. वार्षिक उत्पन्न ८५ हजार रुपयांपेक्षा
कमी असणाऱ्यांना मोफत उपचार तसंच दुर्बल घटकातल्या व्यक्तींसाठी सवलतीच्या दरात उपचार
मिळणार आहेत. मुंबईच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी ही माहिती दिली.
****
‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’या अभियानाला चांगला
प्रतिसाद मिळत असून गेल्या वर्षभरात एक हजार ९६३ धरणातून एक पूर्णांक चार कोटी घनमीटर
गाळ काढण्यात आला असून, सुमारे ५० हजार शेतकऱ्यांच्या शेतात गाळाचा मोफत पुरवठा करण्यात
आला आहे. जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन समितीनं सादर
केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली. येत्या ३१ मे पर्यंत सुमारे दोन हजार धरणांमधून
गाळ काढला जाणार असल्याचं, प्रधान सचिव आय.एस.चहल यांनी सांगितलं.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनी,
येत्या ३१ मे रोजी, सोलापूर विद्यापीठाचा ‘पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्यात येणार आहे.
उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल ही माहिती दिली. काल
मंत्रालयात वीरशैव लिंगायत समाजाचे प्रतिनिधी आणि धनगर समाजाच्याचे प्रतिनिधींसोबत
झालेल्या बैठकीत तावडे बोलत होते.
सोलापूर विमानतळास महात्मा बसवेश्वर विमानतळ असं नाव
देण्याचा तसंच सोलापूर रेल्वे स्थानकाला श्री सिद्धेश्वर रेल्वे टर्मिनस असं नाव
देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासन संबंधित विभागांना पाठवणार असल्याची माहितीही
तावडे यांनी यावेळी दिली.
****
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत
मजुरांना त्वरित वेतन देण्यासाठी केंद्र सरकारनं राज्यांशी चर्चा करून, एक कालबद्ध
कार्यक्रम आखावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. योजनेत काम करणाऱ्या
मजुरांना पंधरा दिवसामध्ये वेतन देणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
****
राज्य विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी उद्या मतदान होत
आहे. यामध्ये मराठवाड्यात परभणी - हिंगोली आणि उस्मानाबाद-लातूर-बीड या दोन स्थानिक
प्राधिकारी मतदारसंघांचा समावेश आहे. सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होणार
आहे. या निवडणुकीतलं मतदान हे पसंती क्रमांकानुसार असून, निवडणूक आयोगामार्फत पुरवण्यात
आलेल्या जांभळया रंगाच्या मार्कर पेननेच मतदान नोंदवणं आवश्यक आहे. मतमोजणी गुरुवारी,
२४ मे रोजी होणार आहे.
****
बीड नगर परिषदेतले काकू नाना आघाडीचे नऊ नगरसेवक अपात्र
ठरले आहेत. आठ महिन्यांपूर्वी शहर स्वच्छतेच्या मुद्यावरून, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर
यांच्यासह या नऊ नगरसेवकांनी नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर यांच्या कक्षात तसंच आसनावर
कचरा टाकला होता, याबाबत केलेल्या तक्रारीवरून, नगरविकास राज्यमंत्र्यांनी या नऊ नगरसेवकांना
अपात्र ठरवलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
बीड जिल्ह्यात किल्ले धारुर इथं सहायक पोलिस निरीक्षकांसह
पाच जणांविरूद्ध लाच घेतल्याप्रकरणी काल गुन्हा दाखल करण्यात आला. खंडणीच्या गुन्ह्यात
तडजोड करण्यासाठी सहायक निरीक्षक नीलेश काळे, यांच्यासह फौजदार अमिरोद्दीन इनामदार,
हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय बिक्कड यांनी त्यांच्या दोन दलालामार्फत ८० हजार रूपये लाचेची
मागणी केली होती, त्यापैकी ४० हजार रूपये घेतांना दलालांना काल अटक करण्यात आली. लाचलुचपत
प्रतिबंधक विभागाच्या पथकानं धारूर पोलिस ठाण्यात सापळा रचून ही कारवाई केली.
****
जालना जिल्ह्यात अंबड इथल्या आरोग्य अधिकाऱ्याला पंधरा
हजार रुपये लाच घेताना काल रंगेहाथ अटक करण्यात आली. डॉ. अनिल वाघमारे असं या अधिकाऱ्याचं
नाव असून, आरोग्य सेविकेची अंतर्गत बदली करण्यासाठी त्यानं लाच मागितली होती. लाच लुचपत
प्रतिबंधक पथकानं काल लाच घेताना, त्याला रंगेहाथ अटक केली.
****
लातूर जिल्ह्यात केंद्रीय सीमा सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण
केंद्रात काल ४३४ प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत समारंभ झाला. चाकूर इथल्या या केंद्रात
शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात चंदीगडचे उपमहानिरीक्षक कमलनयन चौबे
हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रशिक्षणार्थींना ४४ आठवड्याच्या मूलभूत
प्रशिक्षणासोबतच शारीरिक क्षमता, अत्याधुनिक शस्त्र चालवणं, आंतरिक सुरक्षा, मानवाधिकार
कायदे यांचं सुध्दा प्रशिक्षण देण्यात आलं असल्याचं या केंद्राचं महानिरीक्षक संजीव
भनोट यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद शहरात गेल्या आठवड्यात उसळलेल्या दंगलीच्या निषेधार्थ
शिवसेनेतर्फे काल मोर्चा काढण्यात आला. पैठण गेट इथून हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर
जाणार होता, मात्र पोलीस प्रशासनानं या मोर्चाला पुढे जाण्यास परवानगी नाकारल्यानं,
हा मोर्चा सरस्वती भूवन शिक्षण संस्थेच्या प्रांगणात विसर्जित झाला. खासदार चंद्रकांत
खैरे यांच्या अध्यक्षतेखालील एका शिष्टमंडळानं आपल्या मागण्यांचं निवेदन विभागीय आयुक्त
डॉ.पुरूषोत्तम भापकर यांना सादर केलं.
****
आपत्ती व्यवस्थापन, नियंत्रणासाठी संघटीत आणि वेळेत प्रयत्न
करणं गरजेचं असल्याचं नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी म्हटलं आहे. नांदेड
इथं काल पावसाळापूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. संभाव्य आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी
अधिक सतर्कता, समन्वय आणि तत्परतेनं प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
****
शेतीमध्ये मजुरीवर होणाऱ्या खर्चात बचत व्हावी तसंच मशागतीची
कामं वेळेत आणि जलदगतीनं पूर्ण होण्यासाठी कृषी विभागाच्या उन्नत शेती समृद्ध शेतकरी
मोहिमेअंतर्गत लातूर जिल्ह्यात २०१८-१९ या वर्षासाठी कृषि यांत्रिकीकरण ही योजना राबवण्यात
येत आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी येत्या ३१ मे पर्यंत संबंधित तालुका
कृषि अधिकारी कार्यालयाकडे अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
जालना महोत्सव सर्वांसाठी
खुला असल्याची माहिती महोत्सवाचे
स्वागताध्यक्ष तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवात सहभागी होण्याचं
आवाहनही लोणीकर यांनी केलं आहे. येत्या मंगळवार पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध सांस्कृतिक
कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
उभारी उपक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यात, आत्महत्याग्रस्त
७५१ कुटुंबांचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं, यापैकी, रोजगाराभिमुख प्रशिक्षणासाठी मागणी
केलेल्या ३०६ कुटुंबातल्या तरुणांसाठी, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या
मार्गदर्शनाखाली विशेष प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांनी तांत्रिक
प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहावं, असं आवाहन केलं
****
बीड जिल्ह्यात सात्रापोत्रा इथल्या रामनगर शिवारातल्या
तलावात बुडून काल दोघांचा मृत्यू झाला. अनुक्रमे पंधरा आणि आठ वर्ष वयाचे हे बहीण भाऊ
पोहण्यासाठी तलावात उतरले असता, ही दुर्घटना घडली.
लातूरहून रायचूरच्या दिशेनं जाणारा एक टेंपो उलटून झालेल्या
अपघातात टेंपोमधले तीन मजूर जागीच ठार झाले. काल सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.
//***********//
No comments:
Post a Comment