आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१ जून २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
भारत आणि सिंगापूर दरम्यान
आज अनेक सामंजस्य करार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंगापुरच्या दौर्यावर
असून, आज त्यांनी सिंगापुरचे पंतप्रधान ली सियेन लूंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली,
त्यानंतर हर करार करण्यात आले. दोन्ही नेत्यांमध्ये धोरणात्मक, आर्थिक आणि तंत्रज्ञान
विषयक व्यापक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
****
राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग
फुंडकर यांच्या पार्थिव देहावर आज बुलडाणा जिल्ह्यात खामगाव या त्यांच्या मूळ गावी
अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. काल सकाळी मुंबईत अनेक मान्यवरांनी फुंडकर यांचं अंत्यदर्शन
घेऊन, श्रद्धांजली अर्पण केली. हृदयविकाराच्या धक्क्यानं काल मुंबईत त्यांचं निधन झालं,
ते सदुसष्ठ वर्षांचे होते.
****
यवतमाळ जिल्ह्याच्या आरणी
तालुक्यात कोसधनी घाटात ट्रक आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दहा जण
जागीच ठार, तर दोन जण जखमी झाले. आज पहाटे हा अपघात झाला. जखमींना यवतमाळ ग्रामीण रुग्णालयात
दाखल करण्यत आलं असून, त्यांची प्रकृति गंभीर आहे. मृत सर्वजण पंजाब राज्यातले असल्याचं
समजतं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या अजिंठा
आणि वेरुळ इथं येत्या २२ ते २५ ऑगस्ट दरम्यान जागतिक बुद्धिस्ट परिषद होणार आहे. नवी
दिल्ली इथं पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री के जे अल्फोन्स
यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्रात प्रथमच जागतिक बुध्दिस्ट
परिषद होणार असून, यात किमान २५ राष्ट्रे सहभागी होतील, असं त्यांनी सांगितलं.
****
सार्वजनिक वाहतुकीसाठी विजेवर
चालणाऱ्या वाहनांचा वापर वाढवण्यासाठी राज्य सरकारनं काही खाजगी कंपन्यांसोबत काल
पाच सामंजस्य करार केले. यामध्ये खाजगी वाहतूक सेवांमध्ये ई व्हेईकलचा वापर करणं, चार्जिंग
केंद्र उभारणं, आदी करारांचा समावेश आहे.
****
मराठवाड्यात काल अनेक ठिकाणी
अवकाळी पावसानं हजेरी लावली. बीड शहर परिसरात पावसासोबत आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे
अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, तर काही घरांसह मोंढ्यातल्या आडत दुकानांवरचे पत्रे
उडून गेले. हिंगोली जिल्ह्यातही काल कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव, आखाडा बाळापूर
परिसरात तसंच नांदेड आणि बीड जिल्ह्यातही रात्री जोरदार पाऊस झाला.
****
No comments:
Post a Comment