Monday, 18 June 2018

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 18.06.2018 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 18 June 2018

Time - 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ जून २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

सायबर सुरक्षा सुधारण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्ली इथं आज झालेल्या बैठकीत त्यांनी सामाजिक माध्यमांच्या चुकीच्या वापराबात चिंता व्यक्त केली. सायबर क्राईम संदर्भात नागरिकांना तक्रारी नोंदवण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

****

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या सहकाऱ्यांसह नायब राज्यपालांच्या कार्यालयात सुरू केलेल्या आंदोलनाबाबत दिल्ली उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी करताना न्यायालयानं, अशा प्रकारचं आंदोलन करण्याचा अधिकार कोणी दिला, अशी विचारणा केली. यासंदर्भात न्यायालयानं कोणतेही अंतरीम आदेश दिले नाहीत मात्र कोणाच्या कार्यालयात किंवा घरात आंदोलन करण्याऐवजी बाहेर आंदोलन केलं जावं असं मत व्यक्त केलं. दिल्ली सरकारच्या सनदी अधिकारऱ्यांच्या कथित संपाविरोधातल्या याचिकेवरही आज न्यायालयात सुनावणी झाली. या दोन याचिकांशिवाय दिल्ली विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजेंदर गुप्ता यांनी देखील केजरीवाल यांच्या धरणं आंदोलनाविरोधात याचिका दाखल केली असून, तिची सुनावणी येत्या २२ तारखेला होण्याची शक्यता आहे.

****

सरकार रेल्वे गाड्या वेळेवर चालवण्यावर आणि स्वच्छता तसंच खानपान सेवेवर विशेष लक्ष देत असल्याचं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते. रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकांचं आपण स्वत: निरीक्षण केलं असून प्रवाशांच्या सुरक्षेवरही लक्ष केंद्रीत करत असल्याचं त्यांनी सांगितलं. काही कारणांमुळे रेल्वेगाड्या उशीरा धावत असतील, तर प्रवाशांना वेळेवर पाणी आणि जेवणाची व्यवस्था करण्यात येईल, असंही गोयल यांनी यावेळी सांगितलं.

****

वस्तु आणि सेवा कर लागू झाल्यामुळे देशात कराधारित अर्थव्यवस्था निर्माण झाली असल्याचं अर्थमंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. जीएसटी कर प्रणालीअंतर्गत केंद्र  तसंच राज्यांची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर संग्रहासंबंधीची माहिती अधिक योग्यरित्या उपलब्ध होईल, असंही या पत्रकात म्हटलं आहे. जीएसटी कर प्रणाली सोपी बनवण्यासाठी आणि करदात्यांच्या सुविधेसाठी त्यात अनेक बदल केले जात असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

२०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत देशाचा आर्थिक वृद्धी दर सात पूर्णांक सात सात टक्के इतका झाला असून, भारत जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था झाली असल्याचं यावरुन सिद्ध होतं, असं केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. सामाजिक माध्यमावरच्या एका संदेशात जेटली यांनी,  अर्थव्यवस्थेची ही स्थिती पुढचे काही वर्ष अशीच कायम रहावी, अशी आशा व्यक्त केली.

****

शासनाने आधारभूत खरेदी किंमत योजनेंतर्गत धोरण ठरवलं असताना नोंदणीकृत शेतकऱ्यांची तूर आणि हरभरा खरेदी होण्यापूर्वीच खरेदी बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे. अशा शेतकऱ्यांना सरसकट दोन हजार ५०० रूपये फरकाची रक्कम देण्याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढू, असं महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सांगितलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर इथं तूर आणि हरभरा खरेदीबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

****

वर्धा यवतमाळ नांदेड या नवीन रेल्वेमार्गास गती देण्याचा प्रयत्न केला जात असून, येत्या पंधरा दिवसात रेल्वेच्या कळंब ते यवतमाळ दरम्यान रुळ टाकण्यासाठी आवश्यक असलेल्या मातीकामास प्रारंभ केला जाणार असल्याची माहिती रेल्वे अधिका-यांनी दिली आहे. यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनी आज वर्धा नांदेड रेल्वेमार्गाच्या कामाचा आढावा घेतला, त्यावेळी ही माहिती देण्यात आली.

****

नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद शहर आणि तालुक्यातल्या नागरी सुविधांची कामं त्वरीत सुरु करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत. मंत्रालयात आज यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते.

****

नांदेड जिल्ह्यातल्या चार तालुक्यांना सोयाबीन पिक विम्यातून वगळण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शासनानं या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन आज उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांना देण्यात आलं.

****

मुंबई शहर आणि उपनगरात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. वाढत्या पावसासोबतच वारा असल्यानं वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटनाही वाढत आहेत.

जालना जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून, उकाडा जाणवत आहे. जिल्ह्यात मागील दहा दिवसांपासून पाऊस न झाल्यामुळे खरीपातल्या पेरण्या रखडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

//***********//


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...