Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 June 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ जून २०१८ सकाळी ६.५० मि.
****
§
बेरोजगार युवक-युवतींसाठी राज्यशासन प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत रोजगार
मोहीम राबवणार
§
केंद्रीय
शिक्षक पात्रता परीक्षा, सर्व प्रादेशिक भाषांमधून घेण्याचे केंद्रीय शिक्षण मंडळाला
निर्देश
§
माल
वाहतूकदारांचा देशव्यापी बेमुदत संप कालपासून सुरू
§
वर्धा-
यवतमाळ -नांदेड या नवीन रेल्वेमार्गाच्या कामाला येत्या पंधरा दिवसात प्रारंभ होणार
आणि
§
बेकायदा
गर्भपात प्रकरणी बीड जिल्ह्यात दोन रुग्णालयांचे परवाने निलंबित
****
प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत
बेरोजगार युवक-युवतींना लाभ मिळवून देण्यासाठी राज्यात रोजगार मोहिम सुरू करणार असल्याची
माहिती, अर्थमंत्री
सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. मुनगंटीवार यांनी
काल राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त,
जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वनाधिकारी यांच्याशी दूर दृष्य संवाद प्रणाली मार्फत संवाद
साधला त्यावेळी ते बोलत होते. यावर्षी मुद्रा योजनेअंतर्गत
देशभरात तीन
लाख कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.
यातील अधिकाधिक हिस्सा महाराष्ट्राला मिळवता यावा, यासाठी
प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न आणि सूक्ष्म नियोजन करावं, प्रत्येक
जिल्ह्यात मुद्रा बँक समन्वय समितीमध्ये अशासकीय सदस्यांची तत्काळ नियुक्ती करण्यात
यावी, अशा सूचना मुनगंटीवार
यांनी यावेळी केल्या.
****
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा, सर्व २० प्रादेशिक भाषांमधून घेण्यात यावी,
असे निर्देश, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं, केंद्रीय शिक्षण मंडळाला दिले आहेत.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री, प्रकाश जावडेकर यांनी काल ट्वीट करून ही माहिती दिली.
केंद्रीय अभ्यास मंडळानं यापूर्वी ही परीक्षा प्रादेशिक भाषामधून न घेता फक्त तीन भाषांमधून
घेण्याचा निर्णय घेतला होता, या निर्णयावर अनेक राज्यांमधून टीका झाली होती.
दरम्यान, गेल्या चार वर्षात संशोधनावर
भर दिल्यामुळे शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र परिवर्तन झाल्याचा दावा जावडेकर यांनी केला
आहे. नवी दिल्लीत काल ते वार्ताहरांशी बोलत होते. शालेय पोषण आहार योजनेची तरतूद वाढवण्यात आली असून, भारतीय व्यवस्थापन
संस्थांना स्वायत्तता देण्यात येणार असल्याची माहीतीही जावडेकर यांनी दिली.
****
उघड्यावर शौचापासून मुक्त
गावांचं प्रमाणीकरण
जून अखेरपर्यंत पूर्ण करावं, अशी सूचना, केंद्रीय पाणी पुरवठा, आणि स्वच्छता
विभागाचे सचिव, परमेश्वर
अय्यर यांनी केली आहे. मुंबईत काल झालेल्या
बैठकीत ते बोलत होते. उघड्यावर
शौचापासून मुक्ती, स्वच्छता या क्षेत्रात महाराष्ट्राचं काम
देशात अग्रेसर असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
****
मुंबईतल्या श्री सिद्धिविनायक गणपती
मंदिर न्यासाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारनं
घेतला आहे. त्यानुसार मंदिराचे सध्याचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांना राज्य मंत्रिपदाचा
दर्जा मिळाला आहे.
****
डिझेलच्या वाढत्या किंमतीच्या विरोधात
माल वाहतूकदारांनी कालपासून देशव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. या संपाला देशभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर
दरवाढ झाल्यानं इंधन दरवाढ करण्यात आल्याचं कारण सरकार देत आहे. मात्र प्रत्यक्षात
सरकारी करांमुळे ही दरवाढ झाल्याची टीका ऑल इंडिया कन्फेडरेशन ऑफ गुड्स व्हेईकल्स ओनर्स
असोसिएशनचे अध्यक्ष चन्ना रेड्डी यांनी केली आहे.
****
नोंदणीकृत शेतकऱ्यांची तूर आणि हरभरा
खरेदी होण्यापूर्वीच खरेदी केंद्र बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट दोन हजार ५०० रूपये
फरकाची रक्कम देण्याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढू, असं महसूल
राज्यमंत्री संजय राठोड यांनी सांगितलं. यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर इथं तूर आणि हरभरा
खरेदीबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत काल ते बोलत होते. खरेदी केंद्र बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचं
मोठं नुकसान होत असल्याचं ते म्हणाले.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी
काल आपल्या पक्षाची कार्यकारिणी जाहीर केली. यात दहा नेते तर १२ सरचिटणीसांचा समावेश
आहे. नेत्यांमध्ये माजी आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, दीपक पायगुडे, जयप्रकाश
बावीस्कर, यांचा तर सरचिटणीसांमध्ये आदित्य शिरोडकर, परशुराम उपरकर, शालिनी ठाकरे आदींचा
समावेश आहे.
****
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत
२५ जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. जुलै ऑगस्टमध्ये होणाऱ्या या परीक्षेची विलंब शुल्कासह
अर्ज भरण्याची मुदत काल संपणार होती, मात्र ही मुदत पुढच्या सोमवारपर्यंत वाढवण्यात
आली आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
वर्धा- यवतमाळ -नांदेड या नवीन रेल्वेमार्गास गती
देण्याचा प्रयत्न केला जात असून, येत्या पंधरा दिवसात रेल्वेच्या कळंब ते यवतमाळ दरम्यान
रुळ टाकण्यासाठी आवश्यक असलेल्या माती कामास प्रारंभ केला जाणार असल्याची माहिती रेल्वे
अधिकाऱ्यांनी दिली आहे. यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनी काल वर्धा- नांदेड रेल्वेमार्गाच्या कामाचा आढावा घेतला, त्यावेळी
ही माहिती देण्यात आली.
****
बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी, बीड जिल्ह्याच्या माजलगाव
इथल्या दोन महिला डॉक्टरांच्या रुग्णालयातलं गर्भापात आणि कुटुंब कल्याण केंद्र निलंबित करण्यात आलं आहे. जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी ही माहिती दिली. या प्रकरणाची समितीमार्फत चौकशी करण्यात येत असून समितीचा
अहवाल आल्यानंतर त्यांचे परवाने रद्द केले जातील, असं ते म्हणाले.
****
ऊस उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही
मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ
खोत यांनी दिली आहे. ते काल सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट इथं बोलत होते. शेतमालाला
हमीभावासाठी अनुकुल निर्यात धोरण राबवण्याचा सरकारचा प्रयत्न असून, त्यासाठी शेतकऱ्यांच्या
मागण्या सरकारपर्यंत पोहोचवत असल्याचं ते म्हणाले.
****
यंदाचा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक
कार्यकर्त्या पुष्पा भावे यांना जाहीर झाला आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार
यांनी काल कोल्हापूर इथं वार्ताहरांना ही माहिती दिली. एक लाख रुपये असं या पुरस्काराचं
स्वरूप असून, येत्या २६ तारखेला, शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी तो प्रदान करण्यात येईल.
****
लातूरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांना उद्या बुधवारी
केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते संसद रत्न पुरस्कार प्रदान करण्यात
येणार आहे. संसदेच्या अधिवेशन काळात शंभर टक्के उपस्थिती लावून प्रत्येक चर्चेत सहभाग
नोंदवला, त्यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या चार तालुक्यांना सोयाबीन पिक
विम्यातून वगळण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शासनानं या निर्णयाचा
पुनर्विचार करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं
निवेदन काल उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांना देण्यात आलं.
****
हिंगोली नगरपरिषदेनं प्लॉस्टिक बंदी विरोधात काल
मोहीम राबवत सहा क्विंटल ७० किलो प्लॉस्टिकच्या पिशव्या जप्त केल्या. संबंधित व्यापाऱ्यांकडून
सहा हजार चारशे रूपयांचा दंडही वसूल केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं काल दोन भावंडांचा तलावात
बुडून मृत्यू झाला. सहा आणि आठ वर्ष वयाची ही दोन्ही मुलं, स्वच्छतेसाठी तलावात उतरली
होती.
****
सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत, लातूर जिल्ह्यात सक्रीय क्षय रुग्ण शोध मोहिमेच्या पहिल्या फेरीस
कालपासून सुरुवात झाली. यावेळी आशा कार्यकर्ती यांना उपस्थित
मान्यवराच्या हस्ते सक्रीय शोध मोहिमेचं साहित्य वितरीत करण्यात आलं. ३० जून पर्यंत हे अभियान सुरू असेल.
****
अल्पवयीन मेहुणीवर
लैंगिक अत्याचार प्रकरणी बीड जिल्हा सत्र न्यायालयानं, आरोपीला बारा वर्ष सक्तमजुरीची
शिक्षा ठोठावली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ही घटना घडली होती.
****
राज्य कृषी मूल्य
आयोगाचे अध्यक्ष, पाशा पटेल यांची भारतीय जनता पक्षाच्या अखिल
भारतीय किसान मोर्चाचे गुजरात प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पाशा पटेल
हे अखिल भारतीय किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.
****
नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद तालुक्यातल्या नागरी
सुविधांची कामं त्वरीत सुरु करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे
पालकमंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment