Wednesday, 1 August 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.08.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१ ऑगस्ट  २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 केंद्र सरकार आजपासून ग्रामीण स्वच्छतेचं सर्वात मोठं सर्वेक्षण सुरू करत आहे. हे सर्वेक्षण यामहिन्याअखेरपर्यंत चालणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना या मोहिमेत सहभाग घेण्याचं आवाहन केलं असून, नागरिकांनी असा सहभाग घेतल्यास स्वच्छ भारत निर्माणाच्या राष्ट्रीय प्रयत्नाला बळ येण्यासह याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती जमा होण्याचं काम पार पडू शकेल, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

****

 भारतीय रिझर्व्ह बॅंक आज चालू आर्थिक वर्षातलं तिसरं द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहे. यासंदर्भात बँकेच्या पतधोरण समितीची तीन दिवसांची बैठक सोमवारी सुरू झाली होती. यावेळी व्याजदरात बदल होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज भारतीय स्टेट बँकेनं व्यक्त केला आहे.

****

 जळगाव, सांगली मिरज कूपवाड आणि वसई-विरार  महानगर पालिकांच्या निवडणुकीसाठीचं मतदान आज सुरू झालं आहे. जळगावमध्ये पंचाहत्तर जागांसाठी आणि सांगली मिरज मध्ये अट्ठ्याहत्तर जागांसाठी तर वसई-विरारच्या एका जागेसाठी   हे मतदान होत आहे. या निवडणुकीची मतमोजणी, परवा, तीन तारखेला होणार आहे.

****

 औरंगाबाद शहरातल्या आदिवासी मुलींच्या वसतीगृहाच्या प्रभारी गृहपाल रंजना भोजने यांना पाच हजार रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं काल रंगेहाथ पकडलं. वसतीगृहाला भोजन पुरवणाऱ्या कंत्राटदाराचं देयक प्रमाणित करून मंजुरीसाठी पाठवण्याकरता भोजने यांनी लाच मागितली होती.

****

 अहमदनगर जिल्ह्यातल्या पिंपळदरी इथल्या आश्रम शाळेतले पंचावन्न विद्यार्थी दूषित पाणी प्यायल्यानं आजारी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रामकृष्णहरी वारकरी शिक्षण संस्थेच्या या शाळेला पिण्यासाठी विहिरीचं पाणी  पुरवण्यात येत असल्यामुळे ही घटना घडल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं.

****

 चीन मधल्या नानजिंग इथं सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालनं महिला एकेरीच्या तर के श्रीकांतनं पुरुष एकेरीच्या उपउपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.  दुसऱ्या फेरीच्या सामन्यात सायनानं तुर्कस्तानच्या एलिये देमिरबेग हिचा २१ -१७, २१-८ असा, आणि श्रीकांतनं स्पेनच्या पाब्लो अबियानचा २१-१५,१२-२१,२१-१४ असा पराभव केला.

*****

***

No comments: