Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 1 August 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १ ऑगस्ट २०१८ दुपारी
१.०० वा.
****
अमेरिकेनं, पाकिस्तानमधल्या लष्कर
ए तोयबा या अतिरेकी संघटनेचा कमांडर अब्दुल रेहमान अल-दाखिल, तसंच या संघटनेला पैसा
पुरवणाऱ्या दोन व्यक्ती हमीद-उल्-हसन आणि अब्दुल जब्बार, यांना विशेष जागतिक दहशतवादी
घोषित केलं आहे. या घोषणेमुळे अतिरेकी कारवायांना आळा बसेल आणि अमेरिकेच्या अधिकारातल्या
भागातली त्याची सगळी संपत्ती गोठवता येईल, असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं याबाबत
जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
****
आसामच्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिकेत ४० लाख
लोकांचं नागरिकत्व अवैध ठरल्याचा मुद्द्यावरून राज्यसभेत आजही गदारोळ झाला. या विषयावर
भाजप अध्यक्ष अमित शाह त्यांचं म्हणणं मांडत असताना काँग्रेसच्या सदस्यांनी केलेल्या
घोषणाबाजीमुळे त्यांचं बोलणं पूर्ण होऊ शकलं नाही. सभापती एम.व्यंकय्या नायडू यांनी
वारंवार आवाहन करूनही गदारोळ सुरू राहिल्यानं सभापतींना सदनाचं कामकाज बारा वाजेपर्यंत
स्थगित करावं लागलं. तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री
ममता बॅनर्जी यांनी या नोंदणी पुस्तिकेच्या प्रक्रियेबाबत केलेल्या विधानांवर टीका
करत, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याबाबत अशी बेजबाबदार विधानं कोणीही करू नयेत, असं
संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी आज म्हटलं. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या पक्षांनी,
आपण भारतीय नागरिकांच्या बाजूनं आहोत का घुसखोरांच्या, हे ठरवावं, असंही अनंतकुमार
म्हणाले.
चीनसोबतचा डोकलाम वाद राजकीय परिपक्वतेच्या आधारे
पूर्णपणे सोडवल्याचं, तसंच तिथल्या भारतीय भूभागात कणभरही बदल झाला नसल्याचं, परराष्ट्रमंत्री
सुषमा स्वराज यांनी आज लोकसभेत सांगितलं. तृणमूल काँग्रेस सदस्य सुगत बोस यांच्या पुरवणी
प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती
शी जिनपिंग यांची यावर्षीच्या एप्रिल महिन्यात झालेली भेट अतिशय यशस्वी ठरल्याचंही
स्वराज यांनी यावेळी सांगितलं.
****
आयएनएक्स मेडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दिल्ली
उच्च न्यायालयानं आज माजी केंद्रीय मंत्री पी.चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामिनाला येत्या
अट्ठावीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. सक्त वसुली संचालनालयानं या प्रकरणाबाबतचा आपला
प्रतिसाद येत्या चार आठवड्यात सादर करावा, असे निर्देशही न्यायालयानं आज दिले.
****
राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागातले पेयजल प्रकल्प
पूर्ण करण्याकरता राज्यशासनानं सात हजार नऊशे बावन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर केला
आहे. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी काल एक निवेदन जारी करून ही माहिती दिली
आहे. यामध्ये औरंगाबाद विभागातल्या जलप्रकल्पांचाही समावेश आहे. गेल्या चार वर्षात
सुमारे साडेपाच हजार कोटी रुपयांची, साडेसहा हजार प्रकल्पांची कामं पूर्ण झालं असल्याचंही
लोणीकर यांनी सांगितलं आहे.
****
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठीचे ऑनलाईन अर्ज
भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. या महिन्याच्या सत्तावीस तारखेपर्यंत इच्छुकांना
अर्ज करता येतील तर, परीक्षा शुल्क येत्या तीस तारखेपर्यंत भरता येईल. या परीक्षेसाठीचे अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनं,
सीटीईटी.निक.इन, या संकेतस्थळावरून भरायचे आहेत.
****
धुळे इथले उद्योजक, जैन कॉन्फरन्सचे माजी राष्ट्रीय
अध्यक्ष आणि काँग्रेस नेते पद्मश्री सुवालालजी बाफना यांचं आज सकाळी निधन झालं. ते
अट्ठ्याऐंशी वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी धुळे इथे अंत्यसंस्कार
करण्यात येणार आहेत.
****
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त
तसंच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
त्यांना आदरांजली वाहिली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही यानिमित्त विविध कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे.
****
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी क्रिकेट सामन्यांच्या
मालिकेतला पहिला सामना आजपासून बर्मिंगहम इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी
साडेतीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. याआधी झालेली तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिका
भारतानं, तर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका इंग्लंडनं जिंकली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment