Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 1 August 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १ ऑगस्ट २०१८ सायंकाळी ६.००
****
अनुसूचित जातीजमातींच्या हिताच्या दृष्टीनं सरकार विधेयक
आणणार असल्याची माहिती, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज दिली. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या
आजच्या निर्णयांबद्दल पत्रकारांना ते माहिती देत होते. देशात तेरा नवीन केंद्रीय विद्यालयं
उघडणार असल्याचं, तसंच ‘स्वच्छ भारत योजने’साठी वाढीव आर्थिक तरतूद करणार असल्याचंही
प्रसाद यांनी यावेळी सांगितलं.
****
चालू
आर्थिक वर्षातलं तिसरं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर करताना भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो
दरात वाढ केल्यानं आता हा दर सहा पूर्णांक पाच दशांश टक्के इतका झाला आहे. परिणामी
रिव्हर्स रेपो दर आता सहा पूर्णांक पंचवीस शतांश टक्के इतका झाला आहे. या आर्थिक वर्षात
सकल घरगुती उत्पादनाचा वृद्धी दर सात पूर्णांक चार दशांश टक्के तर महागाईचा दर चार
पूर्णांक आठ दशांश टक्के राहण्याचा आपला अंदाज बँकेनं कायम ठेवला आहे. बँकेच्या पतधोरण
समितीची पुढची बैठक येत्या तीन ते पाच ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.
****
राष्ट्रीय
नागरिक नोंदणी पुस्तिकेच्या मुद्यावरून विरोधी पक्षांनी केलेल्या गोंधळामुळे आज राज्यसभेचं
काम दुपारनंतर दिवसभरासाठी स्थगित करावं लागलं. पंतप्रधानांनी या मुद्यावर उत्तर द्यावं,
अशी मागणी करणाऱ्या घोषणा देत तृणमूल काँग्रेस पक्षाचे सदस्य हौद्यात उतरल्यानंतर सभापती
एम.व्यंकय्या नायडू यांनी कामकाज स्थगित केलं. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसनं संसदेत
लोकशाहीची हत्या केली असून, आम्ही विरोधी पक्षांच्या या वागण्याची निंदा करतो, असं
केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. राज्यसभेचं कामकाज स्थगित करावं लागल्याच्या
पार्श्वभूमीवर ते वार्ताहरांशी बोलत होते. विरोधी पक्ष या मुद्यावर सदनात चर्चा होऊ
देत नसून, घुसखोरांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप जावडेकर यांनी यावेळी केला.
****
मराठा
आरक्षणासंदर्भातल्या कायदेशीर बाबींची पूर्तता न करता घाईनं आरक्षणाचा निर्णय घेणं
म्हणजे दीर्घकालीन न्यायालयीन लढ्याला सामोरं जाणं, असा अर्थ असून, सरकार अशा पद्धतीनं
आंदोलकांना फसवू इच्छित नाही, असं राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज स्पष्ट
केलं. ते मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत होते. सरकार याबाबतीत प्रामाणिकपणे प्रयत्न करत
असल्याचं आंदोलकांच्या लक्षात यायला हवं, आणि या प्रयत्नांमध्ये, आंदोलन सुरू ठेवून
अडथळे आणू नयेत, असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान,
आरक्षणाच्या मागणीसाठी आज मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत ‘जेल भरो’
आंदोलन केलं. या आंदोलनामुळे मुंबईतल्या रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला नसल्याचं
अधिकृत सूत्रांनी सांगितलं. राज्याचे कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या लातूर
इथल्या निवासस्थानासमोरही आंदोलकांनी निदर्शनं केली. सोलापूर इथं या आंदोलकांनी सोलापूर-पुणे
राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. पुणे जिल्ह्यात जुन्नर, शिरूर आणि
खेड तालुक्यांमध्ये निषेध मोर्चे काढण्यात आले. हिंगोली जिल्ह्यामध्ये सापटगाव इथं
सकल मराठा समाजाच्यावतीनं बैलगाडी मोर्चा काढण्यात आला, तर भानखेडा, कवठापाटी, खैरखेडा
इथं राज्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. गेल्या दहा दिवसांपासून सुरू
असलेल्या या आंदोलनादरम्यान आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
मराठा
आरक्षणाबाबत कोणत्याही पक्षानं आतापर्यंत काहीही कार्यवाही न केल्यानं मराठा समाजानं
स्वतंत्र राजकीय पक्ष काढावा, असं मत शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज जालना
इथं आंदोलकांशी चर्चा करतांना व्यक्त केलं.
****
राज्यातल्या
आरोग्य सुविधांचा आढावा घ्यावा आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांकडे
असलेल्या औषध खरेदीच्या मर्यादा वाढवाव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी आज दिले. मंत्रालयात आरोग्य विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली
झाली, त्यावेळी त्यांनी हे निर्णय घेतले. ग्रामीण आणि दुर्गम भागातल्या आरोग्य केंद्रांमध्ये
पावसाळ्याच्या काळात औषधांची कमतरता भासू नये यासाठी, तसंच जिल्ह्यांमध्ये असलेल्या
आरोग्य सुविधांचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीनं हे निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या देगलूर, लोहा, नांदेड आणि नायगाव तालुक्यांसह अन्य काही भागात, तसंच
हिंगोली शहर आणि परिसरात आज दुपारी मुसळधार पाऊस झाला. या पावसानं खरीप पिकांना जीवदान
मिळालं आहे. काल संध्याकाळी अर्धापूर आणि नांदेड तालुक्यात पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या
काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज हवामानखात्यानं वर्तवला आहे.
****
No comments:
Post a Comment