Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 02 August 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ ऑगस्ट २०१८ सकाळी ६.५० मि.
****
Ø अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या सुधारीत
विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Ø रिजर्व्ह बँकेचं तिसरं द्वैमासिक पतधोरण जाहीर; रेपो दरात
पाव टक्क्यानं वाढ
Ø वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठातांच्या औषध खरेदी मर्यादेत
वाढीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
आणि
Ø मराठा आरक्षणाचा प्रश्न तत्काळ सोडवण्याची शेतकरी कामगार
पक्षाच्या अधिवेशनात मागणी
****
अनुसूचित जाती - जमाती अत्याचार निवारण सुधारीत विधेयकाच्या
मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री
रामविलास पासवान यांनी काल वार्ताहरांना ही माहिती दिली. या कायद्याचं मूळ प्रारूप
कायम ठेवण्याची तरतूद या विधेयकात आहे. या दुरूस्तीमुळे सर्वोच्च न्यायालयानं यासंदर्भात
दिलेले निर्णय निष्प्रभ ठरणार आहेत. संसदेच्या चालू अधिवेशनातचं हे विधेयक संसदेत सादर
करून मंजूर करुन घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं पासवान यांनी सांगितलं. केंद्रातलं
सरकार अनुसूचित जाती - जमातींच्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं
उचलत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
‘स्वच्छ भारत योजने’साठी १५ हजार कोटी रूपयांची अतिरिक्त
तरतूद करण्यासही केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. या निर्णयाचा देशभरातल्या
जवळपास दीड कोटी कुटुंबांना लाभ मिळेल, असं केंद्रीय दळणवळण मंत्री रविशंकर प्रसाद
यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं.
परभणी आणि वाशिम इथं राज्यातली दोन केंद्रीय विद्यालयं
स्थापन करण्यासाठी काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली.
****
भारतीय रिजर्व्ह बँकेचं चालू आर्थिक वर्षातलं तिसरं
द्वैमासिक पतधोरण काल जाहीर करण्यात आलं. बँकेनं रेपो दरात पाव टक्क्यानं वाढ केली
आहे. यामुळे आता हा दर सहा पूर्णांक पाच दशांश टक्के इतका झाला आहे. परिणामी रिव्हर्स
रेपो दरही सहा पूर्णांक पंचवीस शतांश टक्के इतका झाला आहे. यामुळे कर्ज दरात वाढ होण्याची
शक्यता आहे. या आर्थिक वर्षात सकल घरगुती उत्पन्नाचा वृद्धी दर सात पूर्णांक चार दशांश
टक्के तर महागाईचा दर चार पूर्णांक आठ दशांश टक्के राहण्याचा आपला अंदाज बँकेनं कायम
ठेवला आहे.
****
मराठा आरक्षणासंदर्भातल्या कायदेशीर बाबींची पूर्तता
न करता आरक्षणाचा निर्णय घाईनं घेणं म्हणजे दीर्घकालीन न्यायालयीन लढ्याला सामोरं जाणं
असून, सरकार अशा पद्धतीनं आंदोलकांना फसवू इच्छित नाही, असं राज्याचे अर्थमंत्री सुधीर
मुनगंटीवार यांनी काल स्पष्ट केलं. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. सरकार याबाबत
प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याचं आंदोलकांनी लक्षात घ्यायला हवं, आणि आंदोलन सुरू
ठेवून या प्रयत्नांमध्ये, अडथळे आणू नयेत, असंही मुनगंटीवार म्हणाले.
दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी काल मराठा क्रांती
मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत ‘जेल भरो’ आंदोलन केलं. या आंदोलनामुळे मुंबईतल्या
रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला नसल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. राज्याचे
कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या लातूर इथल्या निवासस्थानासमोरही आंदोलकांनी
निदर्शनं केली. नांदेड जिल्हात नायगाव इथं जेलभरो आंदोलन करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यामध्ये
सापटगाव इथं सकल मराठा समाजाच्यावतीनं बैलगाडी मोर्चा काढण्यात आला, तर भानखेडा, कवठापाटी,
खैरखेडा इथं राज्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. परभणी जिल्ह्यात सेलू
तालुक्यातल्या खूपसा इथंही रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं.
सोलापूर इथं या आंदोलकांनी सोलापूर-पुणे राष्ट्रीय
महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. पुणे जिल्ह्यात जुन्नर, शिरूर आणि खेड तालुक्यांमध्ये
निषेध मोर्चे काढण्यात आले. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान
आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
मराठा आरक्षणाबाबत कोणत्याही पक्षानं आतापर्यंत काहीही
कार्यवाही न केल्यानं मराठा समाजानं स्वतंत्र राजकीय पक्ष काढावा, असं मत शिवसेनेचे
आमदार हर्षवर्धन जाधव यांनी काल जालना इथं आंदोलकांशी चर्चा करतांना व्यक्त केलं.
****
राज्यातल्या आरोग्य सुविधांचा आढावा घ्यावा आणि शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांकडे असलेल्या औषध खरेदीच्या मर्यादा वाढवाव्यात,
असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. मंत्रालयात आरोग्य विभागाची
आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्यांनी हे निर्णय घेतले.
ग्रामीण आणि दुर्गम भागातल्या आरोग्य केंद्रांमध्ये पावसाळ्याच्या काळात औषधांची कमतरता
भासू नये यासाठी, तसंच जिल्ह्यांमध्ये असलेल्या आरोग्य सुविधांचा दर्जा सुधारण्याच्या
दृष्टीनं हे निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये प्रतिलिटर
अनुदानाचा लाभ देण्यासंदर्भातला शासन निर्णय कालपासून लागू झाला. प्रकिया संस्थांनी
उत्पादित केलेल्या पिशवीबंद दुधाला हे अनुदान असणार नाही.
****
जालना शहरात राष्ट्रीय स्तरावरचे पशू प्रदर्शन भरवण्यासाठी
नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पशुसंवर्धन विभागाला
दिल्या. मराठवाडा विशेष पॅकेज अंतर्गत जालना जिल्ह्यातल्या पशुधन विकासासाठी उपलब्ध
निधीचा वापर, तसंच मुख्यमंत्री पशुधन योजनेंतर्गत मागेल त्याला पशुधन देण्याची योजना,
प्रभावीपणे राबवण्याची सूचनाही त्यांनी केली.
****
सोयाबीन अनुदान वितरीत करण्यासाठी शेतकऱ्यांची माहिती
तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी राज्यातल्या
खासगी बाजार समित्यांना दिले आहेत. हिंगोली आणि वाशीम जिल्ह्यातल्या खासगी कृषी उत्पन्न
बाजार समित्यांमध्ये सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रलंबित अनुदानाबाबत देशमुख
यांनी काल बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.
*****
मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवण्याची मागणी
शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनातून करण्यात आली आहे. औरंगाबाद इथं शेकापच्या १७ व्या
राज्यस्तरीय अधिवेशनाला कालपासून सुरूवात झाली. या अधिवेशनात मराठा आरक्षणासह एकूण
दहा ठराव मांडण्यात आले. या ठरांवावर आज आणि उद्या चर्चा होणार आहे. आमदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत काल या
अधिवेशनाचं उद्धाटन झालं. राज्यातल्या धरणांचा व्यावसायिक वापर होत असेल, तर शेतकऱ्यांना
पाण्याची रॉयल्टी द्यावी, असं पाटील म्हणाले. उद्या अधिवेशनाचा समारोप होणार आहे.
*****
केंद्र सरकारच्या वतीनं सर्वसामान्यांसाठी पंतप्रधान
जीवनज्योती विमा योजना सुरू करण्यात आली आहे. विमा सदस्याचा कोणत्याही कारणामुळे मृत्यू
झाल्यास वारसदाराला दोन लाख रुपये मिळतात. या योजनेचा विमा हप्ता हा दर वर्षाला ३३०
रूपये प्रमाणे प्रत्येक सदस्यानं द्यावयाचा असतो. परभणी जिल्ह्यातल्या लाभार्थी सुनिता
मोरे यांनी या योजनेच्या लाभा बद्दल माहिती दिली. त्या म्हणाल्या…
मी सुनिता अंगद मोरे, परभणी येथील रहिवासी आहे. पती
अंगद मोरे यांचे अचानक निधन झाले. या संकटामुळे घराची परिस्थिती विस्कळीत झाली. काय
करावे असा प्रश्र निर्माण झाला तेव्हा पंतप्रधान मंत्री जीवनज्योती विमा योजनेची माहिती
मिळाली. त्यामुळे कार्यवाही होऊन दोन लाख रूपये मिळाले.आणि माझ्या घराला आधार झाला.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात पाणी पुरवठ्याच्या स्थगित केलेल्या
सर्व योजनांवरची बंदी उठवण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार
सुजितसिंह ठाकूर यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या
१३५ गावांचा राष्ट्रीय पेयजल योजनेत तर ३५ गावांचा मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेत
समावेश करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय पेयजल योजना कृती आराखड्यात
जिल्ह्यातल्या १७२ गावांसाठी ७३ कोटी १७ लाख रुपये निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.
यामुळे उस्मानाबादसह अनेक गावांचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास
त्यांनी व्यक्त केला.
****
नांदेड जिल्ह्यात नांदेड, देगलूर, लोहा आणि नायगाव
तालुक्यांत काल पाऊस झाला. हिंगोली शहर आणि परिसरात काल दुपारी मुसळधार पाऊस झाला.
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड आणि परिसरात पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद शहर परिसरातही
काल सकाळपासून पावसाची भुरभुर सुरू होती. या पावसानं खरीप पिकांना जीवदान मिळालं आहे.
दरम्यान, येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये
मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज हवामानखात्यानं वर्तवला आहे.
****
नांदेड-बिकानेर-नांदेड साप्ताहिक रेल्वेगाडीचा विस्तार
करण्यात आला असून, येत्या नऊ तारखेपासून ही गाडी श्रीगंगानगरपर्यंत धावणार आहे. नांदेडहून
दर गुरुवारी सुटणारी ही गाडी शनिवारी श्रीगंगानगरला पोहोचेल, तर परतीच्या प्रवासात
ही गाडी दर शनिवारी श्रीगंगानगरहून निघून बिकानेरमार्गे सोमवारी नांदेडला पोहचणार आहे.
****
हिंगोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातला
कनिष्ठ सहाय्यक राजाराम मुंडे यांना चार हजार रूपयांची लाच घेतांना काल पोलिसांनी अटक
केली. रजा मंजुरीच्या आदेशाची फाईल आणि सेवा पुस्तिका, गटशिक्षणाधिकारी कार्यालयात
पाठवण्यासाठी त्यांनं ही लाच मागितली होती.
****
हिंगोली जिल्ह्याच्य कळमनुरी तालुक्यातल्या कवडी
इथं खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून दोन शाळकरी मुलं आणि एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
दोन्ही मुलं तोल जाऊन पाण्यात पडली होती, त्यांना वाचवण्याचा प्रयत्नात शेतकऱ्याचाही
बुडून मृत्यू झाला. काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली.
****
लंडन इथे सुरू असलेल्या महिला विश्व चषक हॉकी स्पर्धेच्या
उपान्त्यपूर्व फेरीत आज भारताचा आयर्लंडशी सामना होणार आहे. भारतीय संघानं इटलीच्या
संघाला तीन - शून्य अशा फरकानं पराभूत करून हे उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
****
भारत
आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना कालपासून बर्मिंगहम
इथं सुरु झाला. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दिवसअखेर इंग्लंडच्या
नऊ गडी बाद २८५ धावा
झाल्या आहेत. रविचंद्रन अश्विननं चार आणि मोहम्मद
शमीनं दोघांना बाद केलं.
*****
***
No comments:
Post a Comment