Sunday, 5 August 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 05.08.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 August 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ ऑगस्ट २०१ सकाळी .५० मि.

****

v      डिजीटल व्यवहाराच्या माध्यमातून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना, वस्तू आणि सेवा करांत वीस टक्क्यांपर्यंत सवलत देण्याचा निर्णय

v मराठवाड्यात रस्ते आणि सिंचनाची ७५ हजार कोटी रूपयांची कामं होणार - केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

vराज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना येत्या जानेवारीपासून सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आणि

vजागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताची पी व्ही सिंधू अंतिम फेरीत; तर पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा इंग्लंडकडून ३१ धावांनी पराभव

****



 रुपे डेबिट कार्ड, भीम अॅप तसंच आणि अनस्ट्रक्चरड सप्लीमेंटरी सर्व्हीस डाटा यु.एस.एस.डी यासारख्या डिजीटल व्यवहाराच्या माध्यमातून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना, वस्तू आणि सेवा करांत वीस टक्क्यांपर्यंत सवलत देण्याचा निर्णय काल वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. जी.एस.टी. परिषदेची एकोणतीसावी बैठक काल नवी दिल्लीत झाली. त्यानंतर अर्थमंत्री पियुष गोयल यांनी, वार्ताहरांना ही माहिती दिली. यासाठी प्रायोगिक तत्वावर प्रोत्साहन देणं सुरु होईल, असंही गोयल यांनी सांगितलं.



 जी.एस.टी.विषयक विविध समस्यांचा आढावा घेण्याबाबत अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली एका मंत्रिगटाची स्थापना करण्यात आली असून, या गटाला विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी उपगट स्थापन करता येतील. कायदेशीर बाबींसह जी.एस.टी. दराबाबत  स्वतंत्र गट असतील आणि त्यांच्या शिफारसी हा मंत्री गट लक्षात घेईल. तर, अंतिम निर्णय जी.एस.टी.परिषदेत घेतला जाईल, असंही गोयल यांनी सांगितलं.

****



 मराठवाड्यात रस्ते आणि सिंचनाची ७५ हजार कोटी रूपयांची कामं होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. औरंगाबाद इथं काल या संदर्भातल्या आढावा बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. ते म्हणाले....

 
मराठवाड्याच्या राष्ट्रीय महामार्गाची लाईन टोटल ६हजार ७०० किलोमिटर. सद्या मराठवाड्यामध्ये ५७ हजार ६५१ कोटी रूपयांची कामे सूरू आहे. १७ इरीगेशन प्रोजेक्ट प्रधानमंत्री सिचाई योजना आणि आपले बळीराजा योजना या दोन्ही योजनात आम्ही मंजूर केलेले. औरंगाबाद मध्ये ५ आहेत तर अर्धवट जालन्यात ६ आहे. नांदेडचे २ आहेत. लातूर चे ३ आहेत. आणि बिडचा १ आहे. नदी जोड प्रकल्पा करीता आता आम्ही पहिले  ६ प्रकल्प आम्ही २ लाख कोटी रूपयाचे यावर्षी डिसेंबर पर्यंत सुरू करणार आहे. यात दमणगंगा आणि पिंजाळ हा प्रकल्प आहे. तापी नर्मदा हे दोन महाराष्ट्राचे प्रकल्प आहेत.



 औरंगाबाद शहरातल्या जालना रस्त्यावरील नगर नाका ते केंब्रीज शाळा, औरंगाबाद ते जळगाव, औरंगाबाद ते पैठण आणि शेगाव ते पंढरपूर या रस्त्यांची कामं लवकरच सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय परिवहन मंत्र्यांनी दिली.

****



 राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना येत्या जानेवारी, २०१९ पासून सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन अदा केलं जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. काल विविध अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत काल झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. कर्मचारी संघटनांनी येत्या सात ऑगस्टपासून तीन दिवस संपावर जाण्याचा इशारा दिला होता, त्या पार्श्वभूमीवर संघटनांशी मुख्यमंत्र्यांनी ही चर्चा केली. १ जानेवारी २०१६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाचे लाभ देण्यात येतील तसंच २०१७ या वर्षातल्या चौदा महिन्यांची थकीत महागाई भत्त्याची रक्कमही यासोबत अदा केली जाईल, असं ते म्हणाले. सातव्या वेतन आयोगाच्या संदर्भात सेवानिवृत्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखालील निुयक्त वेतन समानीकरण समितीचं  काम अंतिम टप्प्यात आहे, लवकरच त्यांच्याकडून अहवाल सादर केला जाईल, असं सामितीनं कळवलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.



 दरम्यान या  बैठकीत पाच दिवसांचा कामकाजाच्या आठवड्यासह निवृत्तीचं वय ६० वर्षे करण्याबाबतही लवकरच निर्णय होईल असं सांगून  चतुर्थश्रेणी कर्मचारी आणि शिक्षकांच्या प्रश्नांवर स्वतंत्र बैठक घेऊ निर्णय घेतले जातील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.



 नव्या अंशदायी निवृत्तिवेतन योजनेत सुधारणा आणि  शंका निरसनासाठी अभ्यासगटाची नेमणूक करण्यात येईल, असंही ते म्हणाले.

****



 अॅट्रॉसिटी कायदा संरक्षण विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्यानं या मागणीसाठी पुकारलेलं येत्या नऊ ऑगस्टचं भारत बंद आंदोलन आता रद्द करण्याचं आवाहन सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. अनुसूचित जाती जमाती, अल्पसंख्याकांसह सर्वांच्या न्याय्यहक्कांसाठी आपण केंद्र सरकारसोबत काम करत असल्याचं आठवले म्हणाले.

*****



 जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या उपांत्य सामन्यात, सिंधूने उपांत्य फेरीत जपानच्या अकाने यामागुची हिचा २१-१६, २४- २२ असा सरळ दोन सेट्समध्ये पराभव करून अंतिम फेरी गाठली, आज होणाऱ्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मरीनशी सिंधूची लढत होणार आहे.

****



 भारत-इंग्लंड यांच्यातला पहिला कसोटी क्रिकेट सामना इंग्लंडनं ३१ धावांनी जिंकला आहे. दुसऱ्या डावात १९४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ १६२ धावांमध्ये सर्वबाद झाला. आपल्या हजाराव्या कसोटी सामन्यातील विजयासह इंग्लंडनं पाच सामन्यांच्या मालिकेत एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे. दुसरा कसोटी सामना येत्या गुरुवारपासून लंडन इथं लॉर्डस् मैदानावर खेळवला जाणार आहे.

****



 प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचं स्वत:च्या घराचं स्वप्न पूर्ण होत आहे. जालना इथले या योजनेचे लाभार्थी शरद घुले यांनी याबाबतचा आपला अनुभव या शब्दांत व्यक्त केला...


नमस्कार, मी शरद घुले. राहणार जालना. मी काही महिन्यापूर्वी जालना शहरात १ बिएचके रो हाऊस घेतले. यासाठी एका विषय संस्थेमार्फत मी आणि पत्नीच्या नावाने गृहकर्ज घेतले. आणि त्यानंतर मला प्रधानमंत्री आवास योजने अतंर्गत २ लाख रूपये ३७ हजार रूपयांचे अनुदान जवळपास ५ महिन्यामध्ये जमा झाले. प्रधानमंत्री आवास योजनाची रक्कम जमा झाल्याने माझ्या मासिक इएमआय मध्ये जवळपास ३ हजार रूपये कमी झाले आहे. या बद्दल मी शासनाचा खूप खूप आभारी आहे. तसच माझे घराचे स्वप्नही पूर्ण झाले आहे.



****



 लातूर इथं काल शिवाजी चौकात छावा संघटना विद्यार्थी आघाडीच्या कार्यकर्त्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला, मात्र पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन यापासून रोखत उपचारासाठी शासकीय रुग्णालयातात दाखल केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. काल सकाळी अकरा वाजता या संघटनेचे कार्यकर्ते चौकात जमले होते त्यावेळी ही घटना घडली. घटनेनंतर शिवाजी चौकात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.

****



 धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातल्या अंबड इथं काल काही तरुणांनी अचानक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत बंदचं आवाहन केलं. बंद पाळण्यास विरोध करणाऱ्या काही व्यापाऱ्यांच्या दुकानांवर दगडफेक करण्यात आली, यात दोन जण जखमी झाले. आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे जालन्याहून अतिरिक्त पोलिसांची कुमक मागवून अंबड शहरात बंदोबस्त लावण्यात आला असून, दगडफेक करणाऱ्या २२ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

****



 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तहसील कार्यालयासमोर काल थाळी नाद आंदोलन करण्यात आलं. लातूर इथं, शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या निवास्थासमोर आंदोलन करण्यात आलं.

     

 हिंगोली इथं सकल मराठा समाजाच्या वतीनं काल अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं. शहरातल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अर्धनग्न अवस्थेत प्रदक्षिणा घालून, आंदोलकांनी सरकारचा निषेध केला.



 जालना इथंही शहरात छत्रपती संभाजी राजांच्या पुतळ्यासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु आहे.



 नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यात केदार वडगाव इथं एका २३ वर्षाच्या तरुणानं, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कीटकनाशक प्राशन केलं, त्याच्यावर प्राथमिक उपचार करून, त्याला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

****



 उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या शांळांमधल्या पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत या वर्षी साडे अकरा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची भर पडली असल्याचं, जिल्हा परिषद उपाध्यक्ष –शिक्षण सभापती अर्चना पाटील यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. विविध उपक्रमांमुळे शाळांची गुणवत्ता वाढल्यामुळे विद्यार्थी संख्येत वाढ झाल्‍याचं त्या म्हणाल्या.

****



 उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूरच्या नगराध्यक्ष, अर्चना गंगणे यांना अपात्र ठरवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय नगरविकास मंत्र्यांनी कायम ठेवला आहे. त्यामुळे गंगणे यांचं नगराध्यक्षपद रद्द झालं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



नांदेड इथं काल गोदावरी नदीत बुडून तीन मुलांचा मृत्यु झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. शहरातल्या  जुना मोंढा भागातली  ही  तीन मुलं नदीत पोहण्यासाठी गेली होती.

*****

*** 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...