Wednesday, 8 August 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 08.08.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

८ ऑगस्ट  २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 तामीळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुक पक्षाचे अध्यक्ष एम.करुणानिधी यांच्या पार्थिव देहावर आज चेन्नईत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यापूर्वी आज सकाळपासून, राजाजी हॉल इथे ठेवण्यात आलेल्या त्यांच्या पार्थिव देहाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी राजकीय नेतेमंडळींसह सर्वसामान्य नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. करुणानिधी यांच्या निधनामुळे देशात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. 

 दरम्यान, करुणानिधी यांच्या पार्थिव देहावर चेन्नईच्या मरीना समुद्र किनाऱ्यावर समाधी संस्कार करण्यास मद्रास उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे.

****

 जम्मू काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये अतिरेक्यांशी लढताना वीरगती प्राप्त झालेले मेजर कौस्तुभ राणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली आहे. भारतमातेसाठी केलेल्या सर्वोच्च त्यागाबद्दल आपण राणे यांना वंदन करतो, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे. ठाण्याचे रहिवासी असलेल्या मेजर राणे यांच्या वीरमरणाबद्दल ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शोकभावना व्यक्त केली असून, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला कायमचा धडा शिकवला पाहिजे, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

****

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाच वर्षात एकही जागा न लढविणाऱ्या आणि जाहीरनाम्यातल्या आश्वासनांच्या पूर्ततेचा अहवाल मतदारांच्या माहितीसाठी प्रसिद्ध न करणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्यात येणार असल्याचं राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सध्या राजकीय पक्ष नोंदणी आदेश २००९ अस्तित्वात असून त्यात राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, विचारवंतांनी केलेल्या सूचनांच्या अनुषंगानं सुधारणा केल्या असल्याचं सहारिया म्हणाले.

****

 हॉकीच्या चँपियन्स करंडक स्पर्धेत रौप्यपदक मिळवल्यानंतर भारतीय पुरुष हॉकी संघ आता जागतिक क्रमवारीत एका स्थानाची प्रगती करत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. आघाडीच्या दहा संघांपैकी फक्त भारतीय संघानंच अशी प्रगती केली आहे.

*****

***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 June 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...