Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 3 August 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३ ऑगस्ट २०१८ दुपारी
१.०० वा.
****
आसाममध्ये सुरू असलेली राष्ट्रीय नागरिक नोंदणी प्रक्रिया
पूर्णत: नि:पक्षपणे राबवली जात असल्याचं, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटलं
आहे. ते आज राज्यसभेत शून्यप्रहरात बोलत होते. सध्या ४० लाख कुटुंबं नव्हे तर, ४० लाख
व्यक्तींचे नागरिकतेसंदर्भातले पुरावे नसल्याचं, सिंह सांगितलं. यापैकी जे लोक आपल्या नागरिकतेचा योग्य
पुरावा देतील, त्यांचं नाव या पुस्तिकेत समाविष्ट केलं जाईल, असं सिंह यांनी स्पष्ट
केलं. या संवेदनशील मुद्यावर सर्वांनी आपल्या
जबाबदारीचं योग्यपणे पालन करावं, असं आवाहन केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलं.
दरम्यान, आसाम विधान सभेत तृणमूल काँग्रेसच्या आमदारावर
झालेल्या कारवाईप्रकरणी आज तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभेत घोषणबाजी केली.
हौद्यात उतरून या सदस्यांनी गदारोळ केल्यामुळे अध्यक्षांनी सदनाचं कामकाज काही मिनिटांसाठी
तहकूब केलं होतं. कामकाज सुरू झाल्यावर शून्यप्रहरात विविध पक्षांच्या सदस्यांनी या
मुद्यावर आपली मतं मांडली.
****
जम्मू काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या सोपोर परिसरात
सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले.
आज पहाटे ही चकमक झाली. या परिसरात काल संध्याकाळपासून शोधमोहीम सुरु करण्यात आली होती,
त्याचदरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केल्यानंतर ही चकमक झाली.
****
रेल्वेनं सहायक इंजिन चालक आणि
तंत्रज्ञांच्या भरतीसाठीची पदसंख्या दुपटीनं वाढवली आहे. २६ हजार
५०२ जागा भरण्याची घोषणा रेल्वे भरती
मंडळानं फेब्रुवारी महिन्यात केली होती. त्यासाठी
देशभरातून ४७ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले. संगणकाधारित
चाचण्यांची पहिली फेरी येत्या नऊ
तारखेला होणार आहे. मात्र,
आता ही पदसंख्या वाढवून ६० हजार केली आहे. उमेदवारांना
त्यांच्या गावात किंवा जवळच्या शहरातच परीक्षा केंद्र मिळावं, यासाठी
जास्तीत जास्त काळजी घेतली असल्याचं रेल्वे मंत्रालयानं कळवलं आहे.
****
रेल्वेगाड्यामंध्ये चोरीच्या वाढत्या घटनांबद्दल केंद्र
सरकारनं चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भात राज्य सरकारांनी लवकरात लवकर प्रथम माहिती
अहवाल दाखल करावा आणि तपास सुनिश्चित करावा, असं गृह मंत्रालयानं राज्यांच्या मुख्य
सचिवांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे. प्रवाशांच्या तक्रारी वेळेवर दाखल करुन घ्याव्या,
तसंच रेल्वे पोलिसांच्या माध्यमातून तत्काळ तपास करावा, असं मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत देशभरात
रेफ्रिजरेशन आणि वातानुकूलन काम करणाऱ्या एक लाखाहून अधिक तंत्रज्ञांना,
सरकार विशेष प्रशिक्षण देणार आहे. रेफ्रिजरेटर्स आणि वातानुकूलन यंत्रात ओझोन थराला
घातक असलेले पदार्थ टाळून इतर पर्याय शोधणं तसंच ऊर्जेची बचत करणं हे या
योजनेमागचं उद्दिष्ट आहे.
****
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर
आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग आणि केंद्रीय
अन्वेषण विभागानं दाखल केलेला गोपनीय अहवाल मुंबई उच्च न्यायालयानं नाकारला आहे. या
प्रकरणात गोपनीय असं काहीच नसून, तपास कामाबाबत समाधानी नसल्याचं न्यायालयानं म्हटलं
आहे. तपास यंत्रणा आणि सरकारला आपली प्राथमिकता निश्चित करणं आवश्यक असल्याचंही न्यायालयानं
म्हटलं आहे.
****
सांगली-मिरज-कुपवाड तसंच जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक
निवडणुकीसाठी बुधवारी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी होत आहे. जळगाव महापालिकेमध्ये
शिवसेना - भारतीय जनता पक्ष यांच्यात प्रमुख लढत होत आहे, महापालिकेच्या १९ प्रभागातल्या
एकूण ७५ जागांपैकी, ५७ जागांवर भाजप आघाडीवर असून, शिवसेना १४ जागांवर, एमआयएम तीन
जागांवर तर एका जागेवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे. तासाभरात हा निकाल हाती येईल, असं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस,
भाजपा आणि शिवसेना यांच्यात तिरंगी लढत पहायला मिळत आहे. पहिल्या टप्य्यात कॉंग्रेस
राष्ट्रवादी आघाडीने २२ जागांवर आघाडी घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
चीनमधल्या नानजिंग इथं सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन
अजिंक्यपद स्पर्धेत भारताची सायना नेहवाल आणि मिश्र दुहेरीत सात्विक साईराज आणि अश्विनी
पोनाप्पा जोडीचं आव्हान आज संपुष्टात आलं. मिश्र दुहेरीच्या आज झालेल्या उपान्त्यपूर्व
फेरीत अश्विनी सात्विक जोडीला चीनच्या सिवेई झिंग आणि याक्वांग हुआंग या जोडीकडून २१-
१७, २१ - १० असा पराभव पत्करावा लागला. तर महिला एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत सायना
नेहवालचा स्पेनच्या कॅरोलिन मरीननं २१ - सहा, २१ - ११ असा पराभव केला.
//***********//
No comments:
Post a Comment