Saturday, 4 August 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 04.08.2018 - 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 4 August 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ४ ऑगस्ट २०१ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयुष्यमान भारत अंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या ‘आरोग्य हमी कार्यक्रमा’च्या तयारीचा आढावा घेतला. या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य खर्चाची हमी देण्यात येणार असून, गरीब आणि दुर्बल घटकांमधील दहा कोटी कुटुंबांना या आरोग्य सोयींचा फायदा पोहचवणे हा योजनेचा प्रमुख हेतू आहे.

****

मराठवाड्यात रस्ते आणि सिंचनाची ७५ हजार कोटी रूपयांची कामं होणार असल्याची माहिती, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. औरंगाबाद इथं आज या संदर्भातल्या आढावा बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. मराठवाड्यात सहा हजार सातशे किलोमीटर राष्ट्रीय महामार्गासाठी सध्या ५७ हजार ६५१ कोटी रूपयांची कामं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. औरंगाबाद शहरातल्या जालना रस्त्यावरील नगर नाका ते केंब्रीज शाळा, औरंगाबाद ते जळगाव, औरंगाबाद ते पैठण आणि शेगाव ते पंढरपूर या रस्त्यांची कामं लवकरच सुरू होणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मराठवाड्याचा सिंचनाचा अनुशेष दुर करण्यासाठी दमण गंगा ते पिंजाळ या नदीजोड प्रकल्पाचं काम येत्या डिसेंबर अखेर सुरू करणार असल्याचंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं.

****

अल्पसंख्यांक समुदायातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी केंद्र सरकार तत्पर असल्याचं अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीमध्ये एका अल्पसंख्यांक माध्यमिक शाळेला एक संगणक केंद्र समर्पित केल्यानंतर ते आज बोलत होते. गेल्या चार वर्षांमध्ये केंद्र सरकारनं अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना दोन कोटी पन्नास लाख रुपयांची शिष्यवृती दिली असल्याचंही नक्वी यावेळी म्हणाले.

****

धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातल्या अंबड इथं आज काही तरुणांनी अचानक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत बंदचं आवाहन केलं. बंद पाळण्यास विरोध करणाऱ्या काही व्यापाऱ्यांच्या दुकानांवर दगडफेक करण्यात आली. यात दोन जण जखमी झाले. आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे जालन्याहून अतिरिक्त पोलिसांची कुमक मागवून अंबड शहरात बंदोबस्त लावण्यात आला असून दगडफेक करणाऱ्या २२ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तहसिल कार्यालयासमोर आज थाळी नाद आंदोलन करण्यात आलं. या मागणीसाठी वेगवेगळे आंदोलन करुनही सरकार दखल घेत नसल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं.

****

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातल्या दौंड-मनमाड रेल्वे विभागात ब्लॉकमुळे आणि रेल्वे रूळ दुरुस्तीच्या कामामुळे काही रेल्वे गाड्या रद्द, तर काही अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे ते निझामाबाद सवारी गाडी ३० सप्टेंबरपर्यंत, निझामाबाद ते पुणे, निझामाबाद ते पंढरपूर आणि पंढरपूर ते निझामाबाद सवारी गाडी दोन ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. नांदेड ते दौंड सवारी गाडी २९ सप्टेंबरपर्यंत कोपरगाव ते दौंड दरम्यान रद्द करण्यात आली आहे.

****

महाराष्ट्र शासन आणि परभणीच्या तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या वतीनं गुलाबी बोंड अळी नियंत्रण जनजागृती रथ चालवण्यात येत आहे. या रथाचं उद्घाटन आज जिल्हाधिकारी पी शिवशंकर आणि आमदार मोहन फड यांच्या हस्ते करण्यात आलं.

****

परभणी जिल्हा परिषदेच्या ‘स्वच्छ भारत अभियान’च्या वतीनं आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेचं उद्घाटन आज मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांच्या हस्ते झालं. गावात स्वच्छतेची संस्कृती रुजवण्यासाठी आणि नागरिकांचं आरोग्यमान उंचावण्यासाठी गावस्तरावर शाश्वत स्वच्छता टिकवणं आवश्यक असल्याचं मत पृथ्वीराज यांनी व्यक्त केलं.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथल्या कवयित्री संध्या रंगारी यांना त्यांच्या ‘वाताहतीची कैफियत’ या कवितासंग्रहासाठी २०१८ सालचा ‘राज्यस्तरीय सूर्यांश वाङमय पुरस्कार’ जाहीर झाला आहे. उद्या चंद्रपूर इथं एका कार्यक्रमात छत्तीसगढ साहित्य परिषदेचे अध्यक्ष कपूर वासिक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल.

****

भारत-इंग्लंड यांच्यातला पहिला कसोटी क्रिकेट सामना इंग्लंडनं ३१ धावांनी जिंकला आहे. दुसऱ्या डावात १९४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ १६२ धावांमध्ये सर्वबाद झाला. आपल्या हजाराव्या कसोटी सामन्यातील विजयासह इंग्लंडनं पाच सामन्यांच्या मालिकेत एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे.

****

चीन इथं सुरु असेलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत आज महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या पी.व्ही सिंधुचा सामना जपानच्या आकाने यामागुचीसोबत होणार आहे. काल उपांत्यपूर्व फेरीत सिंधूनं जपानच्याच नोझोमी ओकुहाराचा २१ - १७, २१ -१९ असा सरळ सेटमधे पराभव केला होता.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...