Saturday, 4 August 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 04.08.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 4 August 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ४ ऑगस्ट २०१ दुपारी १.०० वा.

****



 केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात, अनुसूचित जाती आणि जमातींमधल्या उमेदवारांना सरकारी नोकऱ्या मधल्या बढतीमध्ये आरक्षण देण्याचं जोरदार समर्थन केलं आहे. बढती मध्ये अनुसूचित जाती आणि जमातींचं प्रमाण २२ पूर्णांक पाच दशांश टक्के एवढं नसल्यास, आरक्षणाच्या मूळ उद्देशाचा भंग होईल, असं महाधिवक्ता के के वेणूगोपाल यांनी म्हटलं आहे. १२ वर्षांपूर्वी अनुसूचित जाती आणि जमातींमधील क्रिमीलिअर बाबत न्यायालयानं दिलेल्या निर्णयामध्ये नव्या भूमिकेची गरज आहे का, याबाबत सध्या सुनावणी सुरू आहे. २००६ मध्ये के नागराज प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं घेतलेल्या भूमिकेमुळे, बढत्यांमधल्या आरक्षणाला खिळ बसली असून, त्याबाबत फेरविचार करण्याची गरज असल्याचंही केंद्र सरकारनं म्हटलं आहे.  

****



 उच्च न्यायालयांमधल्या तीन न्यायमूर्तींची, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायमूर्तींची संख्या आता २५ झाली आहे. केंद्र सरकारनं जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये, उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती के एम जोसेफ, मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि ओडिसा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती विनीत सरन यांची, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. ३० एप्रिल रोजी केंद्र सरकारनं न्यायमूर्ती जोसेफ यांचं नाव फेरविचारासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे परत पाठवलं होतं, त्यानंतर कॉलिजियमनं न्यायमूर्ती जोसेफ यांच्या नावाची पुन्हा शिफारस केली होती. 

****



 जम्मू काश्मीरमधल्या शोपिया जिल्ह्यात दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेल्या अभियानादरम्यान झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी मारले गेले. एक दहशतवादी काल रात्री मारला गेला, तर चार जण आज सकाळी ठार झाले. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातली इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधमोहीम सुरु केली.

****



 सनदी अधिकाऱ्यांनी देशाच्या विकासात आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीत मोलाची भूमिका बजावली असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी म्हटलं आहे. सनदी अधिकाऱ्यांच्या १२०व्या तुकडीच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी, काल राष्ट्रपती भवनाला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. आर्थिकदृष्टया दुर्बल, सामाजिक प्रतिकूलतेचा सामना करणारे तसंच राजकीयदृष्टया सक्षम नसलेल्या घटकांवर, सनदी अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकालात लक्ष केंद्रीत करायला हवं, असं राष्ट्रपतींनी सांगितलं.

****



 भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण - यु आय डी ए आयनं, एक आठ शून्य शून्य - तीन शून्य शून्य - एक नऊ चार सात, हा आपला अधिकृत टोल फ्री क्रमांक नसल्याचं स्पष्ट केलं आहे. एक नऊ चार सात हा अधिकृत टोल फ्री क्रमांक असून, गेल्या दोन वर्षांपासून हा क्रमांक वापरात असल्याचं प्राधिकरणानं जारी केलेल्या अधिकृत वक्तव्यात म्हटलं आहे. ॲन्ड्राईड फोनच्या संपर्क सूचीमध्ये सदर क्रमांक अगोदरपासून जतन केलेला असल्याच्या आरोपावर प्राधिकरणानं हे स्पष्टीकरण दिलं.

****



 ग्रामीण स्वच्छ भारत अभियानामुळे २०१४ पासून आतापर्यंत दोन लाखांहून अधिक नागरिकांचा जीव वाचवण्यात यश आल्याचं, जागतिक आरोग्य संघटनेनं केलेल्या सर्वेक्षण अहवालात म्हटलं आहे. ग्रामीण स्वच्छ भारत अभियानाचे आरोग्यविषयक लाभ जाणून घेण्यासाठी, पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयानं केलेल्या विनंतीवरून हे सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणाचा अहवाल काल नवी दिल्ली इथं प्रकाशित करण्यात आला.

****



 राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयक २०१८ काल लोकसभेत पारित करण्यात आलं. देशातलं पहिलं क्रीडा विद्यापीठ मणिपूर इथं उभारण्याचं या विधेयकात प्रस्तावित असल्याची माहिती क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी दिली. या विधेयकामुळे देशात खेळांना प्रोत्साहन मिळेल असं राठोड यांनी या विधेयकावरच्या चर्चेत बोलतांना सांगितलं.

****



 राज्यातल्या ज्या महाविद्यालयांनी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना दिलेला नाही, अशा शिक्षण संस्थांची बैठक येत्या दोन दिवसात जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. समस्येचं निराकरण करून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून द्यावा, तसंच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळानं पत हमी दिलेली सर्व कर्ज प्रकरणं तातडीनं मंजूर करण्यासाठी प्रयत्न करावेत असंही त्यांनी सांगितलं.

****



 औरंगाबाद सिडकोच्या मुख्य प्रशासकपदी मधुकर आर्दड यांची नियुक्ती करण्यात आली असून, काल त्यांनी पदभार स्विकारला. आर्दड हे सिडकोचे ३५ वे प्रशासक आहेत.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...