Saturday, 4 August 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 04.08.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

 ऑगस्ट  २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 वस्तू आणि सेवा कर परिषदेची बैठक आज नवी दिल्ली इथं प्रभारी अर्थमंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. आज होणाऱ्या या २९ व्या बैठकीत सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोगांना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजना याविषयी, तसंच रुपे कार्ड आणि भीम अ‍ॅपचा वापर करुन डिजीटल पद्धतीनं भरणा करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन म्हणून काही रक्कम कॅशबॅकच्या स्वरुपात देण्यासंदर्भात मंत्रीगटानं केलेल्या शिफारसींवर चर्चा होईल.

****



 मराठवाडा विभागानं पाच कोटी ५६ लाख ९९ हजार २८७ वृक्षांची लागवड करून १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेत विभागाच्या उद्दिष्टापेक्षा अधिक चांगली कामगिरी केली आहे. तसंच मराठवाडा विभागानं राज्यात अव्वल स्थान प्राप्त केल्याबद्दल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्यासह सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, वनाधिकारी यांचं काल दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे अभिनंदन केलं.

****



 परभणी जिल्ह्यात ३५ लाख २५ हजार वृक्ष लागवड करण्यात आल्याची माहिती विभागीय वन अधिकारी विजय सातपूते यांनी दिली आहे. जिल्ह्यासाठी ३४ लाख १६ हजार वृक्ष लागवडीचं उद्दीष्टं देण्यात आलं होतं, मात्र गेल्या ३१ जुलैपर्यंत उद्दीष्टाहून अधिक लागवड करण्यात आल्याचं सातपूते यांनी परभणी इथं बोलतांना सांगितलं.

****



 मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच जालना आणि परभणी इथं वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे. जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी काल या दोन्ही वसतिगृहांच्या इमारतींची पाहणी केली.

****



 यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि देसरडा महाविद्यालयातर्फे काल औरंगाबाद इथं निवृत्त न्यायमूर्ती बी.एन. देशमुख यांच्या हस्ते सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आले. वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजाराम राठोड, उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद माने, डॉ.कानन येळीकर, सुभाष लोमटे यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

****



 जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी, अंबड आणि परतूर या तालुक्यांसाठी कालपासून पैठणच्या जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आलं. सध्या पावसानं उघड दिल्यानं सिंचनासाठी पाणी सोडण्याचे निर्देश पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले होते.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 10 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...