Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 3 August 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३ ऑगस्ट २०१८ सायंकाळी ६.००
****
जळगाव
महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं असून, सांगली मिरज -
कुपवाड महानगरपालिकेत भाजपची बहुमताच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. ७५ जागा असलेल्या
जळगाव महानगरपालिकेत भाजपनं ५७ जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत शिवसेनेला अवघ्या
१५ जागांवर समाधान मानावं लागलं. जळगाव महानगरपालिकेवरचं आमदार सुरेश जैन यांचं गेल्या
तीस वर्षांपासूनचं वर्चस्व संपुष्टात आलं आहे. एमआयएमनं पहिल्यांदाच या निवडणुकीत तीन
जागांवर विजय मिळवला आहे.
सांगली-मिरज-कुपवाड
महापालिकेच्या मतमोजणीमध्ये भारतीय जनता पक्षानं आघाडी घेतली असून, आतापर्यंत हाती
आलेल्या निकालानुसार, भारतीय जनता पक्षानं ७८ जागांपैकी ३२ जागांवर विजय मिळवला आहे,
तर २३ जागांवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.
दरम्यान,
भाजपला मिळालेलं हे यश म्हणजे जनतेनं विकासाला दिलेला कौल असून, या विजयाबद्दल आपण
मतदारांचे आभार मानतो आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष
खासदार रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. तर जनतेचा भाजपवर विश्वास असल्याचं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
****
केंद्रीय
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी आज लोकसभेत अनुसूचित जाती
आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध सुधारणा विधेयक २०१८ सादर केलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं
या आठवड्यात या कायद्याचं मूळ प्रारूप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
****
छोट्या
व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी वस्तू आणि सेवा कर - जीएसटी परिषदेची
उद्या नवी दिल्ली इथं बैठक होणार आहे. सध्या बहुतांशी व्यापार हा ऑनलाईन केला जात असून,
लहान व्यापाऱ्यांना ऑनलाइन प्रक्रियेतून व्यापार करण्याची सवय नसल्यामुळे अडचणी येत
असल्याचं, परिषदेचे अध्यक्ष बिहारचे उपमुख्यमंत्री, सुशील कुमार मोदी यांनी सांगितलं.
एक लाख कोटी रुपयांचा महसूल दर महिन्याला मिळण्याचं लक्ष्य साध्य झाल्यानंतर, पेट्रोलियम
उत्पादनांनाही नवीन कर व्यवस्थेच्या अंतर्गत आणण्याचा विचार केला जाईल, असं ते म्हणाले.
****
आयएनएक्स
मिडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा
कार्ती चिदंबरम याला जामीन द्यायच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप
करण्यास, सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. उच्च न्यायालयाच्या जामीन आदेशाविरोधात
केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
****
प्रधानमंत्री
मुद्रा योजनेअंतर्गत राज्यात जुलै २०१८ अखेरपर्यंत ५७ हजार ४४३ कोटी रुपयांचं कर्ज
वितरित करण्यात आलं आहे. आतापर्यंत एक कोटीहून अधिक कर्ज प्रकरणं मंजूर करण्यात आली
असून, तरुणांना सर्वाधिक १६ हजार २५९ कोटी रुपयांचं कर्ज वितरित करून महाराष्ट्र देशात
अव्वल राज्य ठरलं आहे. देशातल्या असंघटित लघु उद्योगांच्या विकासासाठी आणि त्यांच्या
वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी एप्रिल २०१५ मध्ये मुद्रा योजना सुरू करण्यात आली होती.
****
क्रांतिसिंह
नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. मंत्रालयात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार
अर्पण करून अभिवादन केलं.
****
मराठा
आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथं खासदार राजीव सातव यांच्या
घरासमोर आज ठिय्या आंदोलन करण्यात आलं. विनायक भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन
करण्यात आलं असून, यावेळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
औरंगाबाद
इथं आमदार अतुल सावे यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी सरकारविरोधात
घोषणाबाजी करण्यात आली.
रत्नागिरी
शहरात सकल मराठा समाजानं आज बंद पाळला. शहरातली बस, रिक्षा आणि इतर वाहतूक बंद असून,
व्यापारी संघासह इतर व्यावसायिक संघटनांनी बंदला पाठिंबा दिला आहे. दुकानं, शाळा-महाविद्यालयांसह
शहरातले सर्व व्यवहार बंद आहेत. रत्नागिरीत काढण्यात आलेल्या मोर्चात माजी खासदार निलेश
राणे सहभागी झाले होते.
****
धुळे
शहरातल्या डेअरीवर दरोडा टाकून फरार झालेल्या आरोपींमध्ये आपापसात गोळीबार झाल्याची
घटना मनमाड शहरात घडली आहे. आज पहाटे ही घटना घडली. मालेगाव रस्त्यावरच्या दुध डेअरीत
गोळीबार करत १५ हजार रुपयांची रोकड लूटून फरार झालेल्या आरोपींमध्ये पैसे वाटपावरुन
झालेल्या वादातून हा गोळीबार झाला.
****
No comments:
Post a Comment