Sunday, 5 August 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 05.08.2018 - 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 5 August 2018

Time 18.00 to 18.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ५ ऑगस्ट २०१ सायंकाळी ६.०० वा.

****

युवकांनी आपलं कुटुंब, समाज आणि विशेषतः वंचितांसाठी उच्च आणि मोठी स्वप्न बाळगावीत, असा सल्ला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिला आहे. ते आज तेलंगणातल्या हैद्राबाद इथल्या संरक्षण संस्थेच्या सातव्या दीक्षांत समारंभात बोलत होते. २१व्या शतकानुरूप आधुनिक काळाशी सुसंगत रहावं, असं सांगतानाच राष्ट्रपतींनी, देशातल्या विज्ञान संस्था केवळ पदवीधर तयार करत नसून, सर्जनशीलता, शोधवृत्ती, तंत्रज्ञान, उद्योजकतेला चालना देणाऱ्या असल्याचं ते म्हणाले.

****

मराठा आरक्षणाचा प्रश्न अगोदरच्या आणि सध्याच्याही सरकारनं दुर्लक्ष केल्यामुळे चिघळला आहे, असा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. पुणे इथं आज ते वार्ताहरांशी बोलत होते. आरक्षणाबाबत सरकारनं गांभीर्यानं विचार करायला हवा, असं ते म्हणाले. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या मागण्यांचं पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवणार असल्याचं भोसले यांनी सांगितलं. आरक्षणाबाबत निर्णय होईल. आंदोलकांनी आत्महत्या, हिंसाचार करु नये, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

****

मराठा आरक्षणासंदर्भात सरकारची मानसिकता योग्य नाही, अशी टीका भारीप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते अमरावती इथं वंचित बहुजन आघाडीच्या संवाद यात्रेनिमित्त आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते. संविधान वाचवण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांना आमची साथ राहील. काँग्रेसकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर लोकसभेच्या राज्यातल्या सर्व ४८ जागा लढवू, असं ते म्हणाले.

****

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातल्या डिग्रसवाडी इथल्या युवकानं आत्महत्या केल्याचं वृत्त आहे. अनंत लेवडे असं या तरुणाचं नाव असून, त्यांनी सामाजिक माध्यमावर संदेश लिहून आत्महत्या केली. यामुळे सेलू शहरात तणाव निर्माण झाला असून, बंद पाळण्यात येत आहे.

औरंगाबाद इथं आज विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या घरासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आलं. आरक्षण भारतीय जनता पक्षाचं सरकारच देईल, अशी ग्वाही बागडे यांनी यावेळी दिली, मात्र आंदोलकांचं समाधान न झाल्यानं त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू केली.

धुळे इथं सुरु असलेल्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागलं. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू असताना आंदोलनकर्त्यांनी खासदार हीना गावित यांच्या गाडीची तोडफोड केली. गावित यांना कोणतीही इजा झाली नाही, मात्र गाडीचं मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

सातारा जिल्ह्यातल्या कऱ्हाड इथं दत्त चौकात सुरू असलेल्या महिलांचं ठिय्या आंदोलन आज पाचव्या दिवशीही सुरूच राहिलं.

कोल्हापूर शहरातल्या दसरा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.

****

धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आज सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर इथं चंद्रभागा नदी पात्रात मुंडण आंदोलन करण्यात आलं. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या मागणीसाठी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर येत्या सात ऑगस्टला लाक्षणिक ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे, तर ३० ऑगस्टला औरंगाबाद इथं धनगर समाजाचा महामेळावा आयोजित करण्यात आला असल्याचं समाजाचे नेते संतोष सुळे यांनी सांगितलं.

****

केंद्र शासनाच्या पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या वतीनं देशातल्या सर्व जिल्ह्यांचं गुणांकन ठरवण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार असून, यात ग्राम पंचायतींनी पुढाकार घेऊन गावस्तरावर मोठ्या प्रमाणात स्वच्छता करावी, असं आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी केलं आहे. स्वच्छतेत गावं शाश्वत रहावीत, यासाठी केंद्र शासनाच्या वतीनं या उपक्रमाचं आयोजन केलं आहे.

****

सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक भागात पावसानं महिनाभरापासून दडी मारल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला असून, जिल्ह्यातल्या जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्राला याचा फटका बसणार आहे. सुरवातीला दमदार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी खरीप पिकं पेरली, मात्र पाऊस न पडल्यानं खरीप हंगाम वाया जाण्याची भिती व्यक्त होत आहे.

****

चीनमधल्या नानजिंग इथं झालेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या पी. व्ही. सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. आज झालेल्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मरीननं सिंधुचा २१- १९, २१ - १० असा पराभव केला आणि सिंधु रौप्य पदकाची मानकरी ठरली.

****

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद - आयसीसीच्या कसोटी मानांकन यादीत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. सचिन तेंडुलकर नंतर कसोटी क्रमवारीत पहिला क्रमांक मिळवणारा कोहली सातवा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. लोकेश राहुल १९व्या, अजिंक्य रहाणे २२व्या, तर शिखर धवन आणि मुरली विजय २३व्या स्थानावर आहेत.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 11.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 11 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...