Sunday, 5 August 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 05.08.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 5 August 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ५ ऑगस्ट २०१ दुपारी १.०० वा.

****



 स्वच्छ भारत अभियानात १२५ कोटी भारतीय जोडले गेल्यामुळे देशाला स्वच्छतेच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी मदत मिळाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज सकाळी ट्विटरच्या माध्यमातून सहारनपूरच्या एका नागरिकाच्या पत्राचा उल्लेख करत ते बोलत होते. सहारनपूरचे प्रणव सक्सेना यांनी स्वच्छ भारत मिशनचा उल्लेख करत इतरांनाही या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. स्वच्छतेच्या कार्याशी संबंधित आणखी एका पत्राचा पंतप्रधानांनी आपल्या ट्विट मध्ये उल्लेख केला. 

****



 भारत सरकारनं अँटिग्वा सरकारकडे फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसी याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली असून, त्यासंबंधीचं विनंती पत्र पाठवलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. भारतानं निरव मोदीच्या प्रत्यार्पणाची मागणीही केली आहे. पंजाब नॅशनल बँकेत ११ हजार कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा या दोघांवर आरोप आहे.

****



 केंद्र सरकारतर्फे ऑक्टोबर - २०१४ मध्ये कार्यान्वित झालेल्या स्वच्छ भारत अभियानात ग्रामीण स्वच्छतेत ३९ हून ८९ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयानं ही माहिती दिली. आतापर्यंत १९ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश उघड्यावर शौचापासून मुक्त घोषित करण्यात आली असून, आतापर्यंत सुमारे आठ कोटी शौचालयं बांधले गेल्याचं मंत्रालयानं जाहीर केलेल्या माहितीत नमूद करण्यात आलं आहे.

****



 शिक्षणाला अर्थपूर्ण करण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण देणं आणि सरकारी शैक्षणिक संस्थांचा दर्जा उत्तम राखणं गरजेचं असल्याचं मत रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांनी व्यक्त केलं आहे. राज्याच्या उच्च आणि शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं २०१८च्या रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक आणि डॉक्टर भारत वाटवानी यांचा काल मुंबईत उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. मानसोपचारांची गरज असलेल्यांसाठी देशभरात मानसोपचार संस्थांची उभारणी गरजेची असल्याचं वाटवानी यांनी नमूद केलं.

****



 नवी मुंबईच्या रसायनी, तळोजा आणि कोपरखैरणे परिसरात महसूल गुप्तवार्ता संचालनालयानं धाड टाकून सुमारे ३७ कोटी रूपये बाजारमूल्य असलेला अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. यामध्ये २६३ किलो केटामाइन आणि १२ किलो मेटाफेटामिनचाही समावेश आहे. तळोजा, कोपरखैरणे परिसरातल्या गोदामांमध्ये याचा साठा केला जात होता, या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.

****



 नाशिक मध्ये सोन्याच्या गुंतवणुकीतून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या मिरजकर ज्वेलर्सच्या संचालकांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. संचालक महेश मिरजकर, अकौंटंट प्राजक्ता कुलकर्णी आणि संचालक हर्षल नाईकची पत्नी कीर्ती नाईक यांनी गुंतवणुकीवर जादा व्याजाचं आमिष दाखवून एक कोटी २२ लाखांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं होतं. त्यानंतर या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

****



 परिवर्तनाच्या चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत आणि काँग्रेस नेते प्रेमानंद रुपवते यांचं काल सायंकाळी मुंबईच्या टाटा रुग्णालयात निधन झालं, ते ७२ वर्षांचे होते. बाबुजी या नावानं ओळखले जाणारे रुपवते आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते दादासाहेब रुपवते यांचे पुत्र होते. मुंबईतल्या चेतना महाविद्यालयाचे विश्वस्त म्हणून त्यांनी काम केलं होतं. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रुपवते यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलआहे. आज सायंकाळी दादरच्या चैत्यभूमी इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

****



 रायगड जिल्ह्यात गेल्या दहा-बारा दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यामुळे भात पिकं धोक्यात आली असून, शेतकरी चिंतेत आहेत. शेतात पाणी नसल्यानं अलिबाग तालुक्यातल्या अनेक शेतांत जमिनीला भेगा पडल्याचं चित्र आहे. पावसाळ्याच्या सुरवातीला दमदार पाऊस झाला, मात्र ऑगस्टच्या पहिल्या पाच दिवसात चार टक्केच पाऊस झाला. येत्या दोन-चार दिवसांत पावसाची नितांत गरज असल्याचं शेतकरी सांगत आहेत.

****



 लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातल्या सुगाव इथं नागरिकांनी गुटख्यानं भरलेला ट्रक पकडून प्रशासनाच्या ताब्यात दिला आहे. सुगाव इथं गेल्या दहा वर्षांपासून गुटखा विक्री केली जात होती, मात्र वारंवार प्रशासनाला तक्रारी करूनही कसलीच कार्यवाही केली जात नसल्यानं ग्रामस्थांनीच पुढाकार घेऊन ट्रक पकडला. अन्न आणि औषधी विभागानं मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. 

****



 चीनमधल्या नानजिंग इथं सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीचा अंतिम सामना आज भारताची पी. व्ही. सिंधू आणि स्पेनची कॅरोलिना मरीन यांच्यात होणार आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सिंधूनं जपानच्या अकाने यामागुची हिचा २१-१६, २४- २२ असा सरळ दोन सेट्समध्ये पराभव केला.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...