आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
५ ऑगस्ट २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
केंद्र सरकारतर्फे तीन रुपये
किलो दरानं तांदळाचा आणि दोन रुपये किलो दरानं गव्हाचा होत असलेला पुरवठा पुढच्या वर्षी
जूनपर्यंत सुरू राहील, अशी माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न
आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी दिली आहे. ते चंदीगड
इथं एका कार्यक्रमात बोलत होते. २०१३
साली लागू झालेल्या अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत
सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या अनुदानित
धान्यांच्या किंमतीत सरकारनं काहीही वाढ केलेली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
****
सर्व
रुग्णालयांनी केवळ परवानाधारक रक्तपेढ्यांकडूनच रक्त स्वीकारावं अशी सूचना सरकारनं केली आहे. देशात
एकूण तीन हजार तेवीस परवानाधारक रक्तपेढ्या आहेत. रक्त
तसंच त्यातील घटकांवर प्रक्रिया करण्यासाठी आकारण्यात येणारे दर हे राष्ट्रीय रक्त
संक्रमण परिषदेनं आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसारच असावेत, असे निर्देश सर्व
परवानाधारक रक्तपेढ्यांना देण्यात आले आहेत.
****
आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटूंबातल्या पाल्यांच्या
मदतीसाठी पुण्यजागर प्रकल्पाला आजपासून पुणे इथं प्रारंभ होत आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्याच्या
अर्धापूर तालुक्यातल्या कोंढा, देळूब, धामदरी, मालेगाव, नांदला दिग्रस इथल्या आत्महत्या
केलेल्या शेतकरी कुटूंबातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आलं आहे.
पुणे भोई फाऊंडेशनचे डॉक्टर मिलिंद भोई यांनी ही माहिती दिली.
****
अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध
- अॅट्रॉसिटी कायदा संरक्षण विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्यानं या मागणीसाठी
पुकारलेलं येत्या नऊ ऑगस्टचं भारत बंद आंदोलन रद्द करण्याचं आवाहन सामाजिक न्याय राज्यमंत्री
रामदास आठवले यांनी केलं आहे. अनुसूचित जाती जमाती, अल्पसंख्याकांसह
सर्वांच्या न्याय्य हक्कांसाठी आपण केंद्र सरकारसोबत काम करत असल्याचं ते म्हणाले.
****
उस्मानाबाद
जिल्हा परिषदेच्या शांळांमधल्या पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत
या वर्षी साडे अकरा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची भर पडली असल्याचं, जिल्हा
परिषद उपाध्यक्ष –शिक्षण सभापती अर्चना पाटील यांनी सांगितलं. विविध उपक्रमांमुळे शाळांची
गुणवत्ता वाढल्यामुळे विद्यार्थी संख्येत वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं.
*****
***
No comments:
Post a Comment