आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ जून २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
नवनियुक्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सकाळी
नवी दिल्ली इथं युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ बांधलेल्या राष्ट्रीय स्मारकस्थळी
श्रद्धांजली वाहिली. सेनेच्या तिनही दलाचे प्रमुख, सेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत, वायुसेना
प्रमुख चीफ मार्शल बी. एस. धनोवा आणि नवदल प्रमुख एडमिरल करमबीर सिंह देखील यावेळी
उपस्थित होते. राजनाथ सिंह आज संरक्षण मंत्री म्हणून औपचारिक पदभार स्वीकारणार आहेत.
राष्ट्रीय सुरक्षा अधिक मजबूत बनवण्यास प्रतिबध्द राहील, असं सिंह यांनी आपल्या टि्वटर
संदेशात म्हटलं आहे.
****
काँग्रेसच्या ५२ नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांची आज
नवी दिल्ली इथं पहिली बैठक होणार आहे. या बैठकीत संसदीय पक्षाच्या नेत्याची निवड होण्याची शक्यता आहे. याशिवाय या बैठकीत पक्षाचे राज्यसभा
सदस्य ही सहभागी होणार आहेत. काँग्रेस संसदीय पक्षाच्या सध्याच्या अध्यक्षा सोनिया
गांधी आहेत. तसचं या बैठकीत संसदेच्या आगामी सत्रासाठीची रणनिती ठरवली जाणार आहेत.
२५ मे ला झालेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीच्या अध्यक्षपदी राहूल गांधी होते.
****
लोकसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन १७ जून ते २६ जुलै
या कालावधीत बोलावण्यास मंत्रीमंडळानं मान्यता दिली आहे. या अधिवेशनादरम्यान १९ तारखेला
लोकसभा अध्यक्षांची निवड केली जाईल. २० जूनला राष्ट्रपतीचं अभिभाषण होईल. आर्थिक सर्वेक्षण
चार जुलैला तर ५ जुलैला अर्थसंकल्प सादर केला जाईल.
****
सामान्य
नागरिकांना आर्थिकदृष्ट्या साक्षर
करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं येत्या
३ ते ७ जून या कालावधीत देशभरात आर्थिक साक्षरता सप्ताह आयोजित केला आहे. ’शेतकऱ्यांना औपचारिक बँकिंग प्रणालीद्वारे मिळणारे
फ़ायदे’ ही या साक्षरता सप्ताहाची यंदाची संकल्पना आहे. या सप्ताहादरम्यान विविध
संदेशपर भित्तीपत्रकांच्या माध्यमातून
शेतकऱ्यांमध्ये आर्थिक साक्षरतेविषयी जागृती केली जाईल, अशी माहिती रिझर्व्ह बँकेच्या
प्रसिद्धिपत्रकात देण्यात आली आहे. आर्थिक साक्षरता केंद्र, एटीएम
आणि संकेतस्थळांवर ही भित्तीपत्रकं लावण्यात यावीत, अशा सूचना रिझर्व्ह बँकेनं,
ग्रामीण क्षेत्रातल्या बँकांना दिल्या आहेत. आर्थिक जागरूकता संदेश
प्रसारित करण्यासाठी आकाशवाणी आणि दूरदर्शनवरही या जून महिन्यात व्यापक प्रचार
अभियान चालवलं जाईल, असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.
****
पुढील तीन महिन्यात राज्यातल्या जनतेची उरलेली काम
पूर्ण करू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी नवी मुंबईत व्यक्त केला
आहे. जर तीन महिन्यात ती कामे पूर्ण झाली नाही तरी ज्या प्रमाणे जनतेने केंद्रात सत्ता
दिली त्याप्रमाणे राज्यात देखील देणार आहे, पुन्हा सत्ता आल्यावर ही कामे पूर्ण करण्याची
पुष्टीही त्यांनी यावेळी जोडली. ते नवी मुंबईच्या
बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे , यांच्या श्री गोवर्धनी सार्वजनिक
सेवा संस्थेच्या नवी मुंबई उत्सावाच्या वेळी बोलत होते.
****
उस्मानाबाद इथं कृषी विभाग, आत्मा यांच्या वतीने २ जून ते ५ जून या कालावधीत खरीप हंगामपूर्व तुळजाभवानी
कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आल आहे. या कृषी महोत्सवाचे उद्घाटन दोन जून रोजी खासदार
ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे. महोत्सवात कृषीविषयक तंत्रज्ञान यांची
माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. तसंच शास्त्रज्ञ संवाद आणि संशोधन विस्तार,
शेतकरी विपणन साखळी सक्षमीकरण, शेतकरी समूह, शेतकरी गट संघटीत करून स्थापित शेतकरी
उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी केली जाणार आहे. कृषी महोत्सवात शेतकरी, महिला गट
शेतकरी उत्पादक कंपन्या यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची दालने खते, औषधे बी-बियाणे,
शेती अवजारे, ठिबक, तुषार सिंचन, सेंद्रिय उत्पादने प्रक्रिया उद्योजक आणि खाद्यपदार्थांची
दालने यांचे नियोजन असणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment