Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 01
June 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ जून
२०१९ दुपारी १.०० वा.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचे माजी
प्रमुख डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा
आराखडा मनुष्य बळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडे काल नवी दिल्लीत सोपवला.
नव्या अभ्यासक्रम धोरणात भारतीय ज्ञान संस्थेचा समावेश करण्याबरोबर खासगी शाळांमध्ये
आकारल्या जात असलेली अवाजवी शुल्क आकारणीवर निर्बंध घालण्याची शिफारस करण्यात आली आहे.
तसंच या धोरणात भारताचे गणित, खगोलशास्र, तत्वज्ञान, मानसशास्त्र, योगा, स्थापत्यशास्र,
औषधीशास्रामधल्या योगदानाबरोबरच सुशासन, राजकारण, समाज संवर्धनसारख्या विषयांचा समावेश
करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
****
काँग्रेसच्या ५२
नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांची आज नवी दिल्ली इथं पहिली बैठक पार पडली. या बैठकीत संसदीय
पक्षाच्या नेत्या म्हणून सोनिया गांधी यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे. या बैठकीत
संसदेच्या आगामी सत्रासाठीची रणनिती ठरवली जाणार आहेत. तर प्रत्येक कॉंग्रेस सदस्याने
आपण संविधानाच्या सुरक्षेसाठी लढत आहोत हे लक्षात ठेवावे, असं पक्षाचे अध्यक्ष राहुल
गांधी यावेळी म्हणाले.
****
जम्मू आणि काश्मीर मधल्या पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं
बालाकोटमधे केलेल्या लक्ष्यभेदी हल्ल्यानंतर भारतानं जारी केलेल्या विमानांच्या हवाईमार्गांवरील
तात्पुरते निर्बंध पूर्णपणे मागे घेण्यात आले आहे. भारतानं पाकिस्तान मधल्या हवाईमार्गाने
भारतात प्रवेश करण्याऱ्या सर्व प्रकारच्या विमानांवर निर्बंध घातले होते. या निर्बंधामुळे
या मार्गे येणाऱ्या विमानांना सुमारे तीन तासांपेक्षा जास्त उशीर लागत होता.
****
काश्मीर खोऱ्यातले
विविध दहशतवादी गटांमध्ये सामील असलेल्या पाच तरुणांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून आत्मसमर्पण
केले आहे. या तरुणांच्या कुटुंबाचे सातत्याच्या प्रयत्नांमुळे या तरुणांना हिंसाचारापासून
परावृत्त करण्यात यशस्वी झालो असल्याचं कुलगामच्या राज्य विकास पोलिसांनी म्हटलं आहे.
सुरक्षेच्या कारणांमुळे या तरुणांची ओळख जाहिर केली नसल्याचंही पोलिसांनी या याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांचे मेहूणे रॉबर्ट
वाड्रा हे काल अंमलबजावणी संचलनालयासमोर चौकशीसाठी उपस्थित राहिले नाही. संचलनालयानं
वाड्रा यांना मनी लॉड्रींग प्रकरणी समन्स काढून काल पुन्हा उपस्थित राहण्यास बजावले
होते. त्यांना परदेशात बेहिशेबी मालमत्ता खरेदी प्रकरणी हे समन्स बजावण्यात आले होते.
वाड्रा यांनी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणाने संचलनालयासमोर हजर राहण्याचे टाळले आहे.
संचलनालयानं आता वाड्रा यांना चार जून रोजी हजर राहण्यास बजावले आहे.
****
२०१७-१८ मध्ये देशात
बेरोजगारीचा दर ६ पूर्णांक १ टक्के होता, जो गेल्या ४५ वर्षांत सर्वाधिक आहे. सरकारने
जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, या काळात सर्व नियोजित शहरी तरुणांपैकी ७ पूर्णांक ८
टक्के बेरोजगार होते आणि ग्रामीण भागात ही टक्केवारी ५ पूर्णांक ३ टक्के एवढी होती.
सांख्यकी सचिव प्रवीण श्रीवास्तव यांनी काल नवी दिल्लीत जुलै २०१७ ते जून २०१८ या कालखंडातला
नियतकालीन श्रम शक्ती सर्वेक्षण वार्षिक अहवाल जारी केला त्यात ही माहिती देण्यात आली
आहे.
****
भारतीय हवामान खात्यानं देशात यंदा सरासरीच्या
९६ टक्के पावसाचा सुधारित अंदाज व्यक्त केला आहे. येत्या सहा जूनपर्यंत केरळमध्ये पावसाचं
आगमन होईल. त्यानंतर साधारणत: सप्टेंबरपर्यंत पाऊस राहणार असल्याचंही विभागानं म्हटलं
आहे.
दरम्यान, देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट कायम असून
काल राजधानी दिल्लीत ४७ अंश सेल्सियस
एवढ्या तापमानाची नोंद झाली. राजस्थानमधल्या श्रीगंगानगर इथं काल उष्णतेचा पारा जवळपास
५० अंश डिग्री सेल्सिअसच्या वर गेला होता.
****
इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत
काल झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं पाकिस्तानवर सात गडी राखून सहज विजय मिळवला. या स्पर्धेत आज न्युझीलंड आणि श्रीलंका तसंच अफगाणिस्तान
आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सामने होणार आहेत. भारताचा या स्पर्धेतील पहिला सामना
येत्या बुधवारी दक्षिण अफ्रिके विरुध्द होईल.
*****
***
No comments:
Post a Comment