आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१९ जून २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
राज्याचा काल जाहीर झालेला अतिरिक्त अर्थसंकल्प राज्याचं
उत्पन्न वाढवितानाच खर्च कमी करून सर्व घटकांना सर्वार्थानं पुढं घेऊन जाणारा असल्यानं
तो `सर्वजनहिताय सर्वजनसुखाय आहे`, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त
केली आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, दिव्यांग, वंचित-उपेक्षितांना खऱ्या अर्थानं न्याय देणाऱ्या योजना
सादर करतानाच उद्योग आणि रोजगारनिर्मितीवर भर देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. देशातील
सर्व राज्यांशी तुलना करता महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चांगली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
****
अतिरिक्त अर्थसंकल्पात सरपंचांच्या मानधनामध्ये लक्षणीय
वाढ करण्याचं प्रस्तावित करुन त्यासाठी
दोनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाचं ग्रामविकास मंत्री पंकजा
मुंडे यांनी स्वागत केलं आहे. यामुळं ग्रामविकासासाठी झटणाऱ्या सरपंचांना मोठं प्रोत्साहन
मिळेल अशी प्रतिक्रीया मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
****
राज्य सरकारनं अतिरिक्त अर्थसंकल्पात बारा
बलुतेदारांना कुठलीही सवलत दिली नसल्याचा तसंच इतर मागासवर्गीयांना न्याय हक्कांपासून
वंचित ठेवल्याचा आरोप करत बारा बलुतेदार महासंघानं आजपासून सरकार विरूद्ध जनजागरण आंदोलनाचा
इशारा दिला आहे. या आंदोलनाला आज सातारा जिल्ह्यातून सुरूवात करणार असल्याचं बाराबलुतेदार
महासंघाचे अध्यक्ष कल्याण दळे यांनी कळवलं आहे.
****
राज्य शासनानं विद्यार्थी पटसंख्येपेक्षा कमी असलेल्या शाळांची
माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरु केली असून त्यानुसार अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत
साडे तिनशे प्राथमिक शाळा तर
महानगरपालिकेची एक शाळा पटसंख्येत कमी आहे. भविष्यात या शाळा बंद
होण्याचे संकेत असल्यानं सातशे दोन शिक्षक
अतिरिक्त होतील आणि त्याचं समायोजन करण्यासाठी
शासनाला कसरत करावी लागण्याची शक्यता आमच्या वार्ताहरानं व्यक्त
केली आहे.
****
लोकसभा अध्यक्षपदासाठी भारतीय
जनता पक्षाचे ओमपकाश बिर्ला यांनी काल आपला निवडणूक अर्ज दाखल केला. लोकसभा अध्यक्षांच्या निवडीची औपचारिक घोषणा आज
केली जाणार आहे.
दरम्यान, काँग्रेस पक्षानं, लोकसभेतल्या पक्षनेतेपदी पश्चिम बंगाल
मधले पक्षाचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांची नियुक्ती केली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment