Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 19
June 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ जून
२०१९ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा अध्यक्षपदी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे ओमपकाश बिर्ला
यांची आज एकमतानं निवड करण्यात आली. छप्पन वर्षीय बिर्ला
हे राजस्थान मधील कोटा इथून सलग दोन वेळा लोकसभेवर
निवडून आले आहेत. लोकसभा अध्यक्षपदाच्या शर्यतीत अन्य कोणताही उमेदवार
नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या
नावाचा प्रस्ताव ठेवल्यानंतर आवाजी मतदानानं त्यांची निवड करण्यात आली. काँग्रेस पक्षानं, लोकसभेतल्या पक्षनेतेपदी पश्चिम बंगाल
मधले पक्षाचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांची नियुक्ती केली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं एक देश
एक निवडणूक या मुद्दयावर लोकसभेत प्रतिनिधीत्व करत असलेल्या सर्व पक्षांच्या अध्यक्षांची
बैठक घेणार आहेत. या बैठकीत यावर्षी साजरी होत असलेली महात्मा गांधी यांची दिडशेवी
जयंती तसंच 2022मध्ये साजरा होत असलेला स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव, संसदीय कामकाजाची
गती वाढवणं तसंच महत्वाकांक्षी जिल्ह्यांचा विकास या मुद्यांवरही चर्चा होईल. दरम्यान
या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेस
अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्राद्वारे
कळवलं आहे. एकराष्ट्र एक निवडणूक या मुद्दयावर मत मांडायला प्रत्येक पक्षाला पुरेसा
वेळ द्यावा असं मतही ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलं आहे.
****
सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला गुजरातमध्ये
राज्यसभेच्या दोन जागांसाठी स्वतंत्र पोटनिवडणूक घेण्याच्या त्यांच्या निर्णयावर २४
जून पर्यंत बाजू मांडायला सांगितलं आहे. काँग्रेसपक्षाच्या गुजरात शाखेनं या संदर्भात
याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि सूर्यकांत यांच्या पिठानं या प्रकरणी
२५ जून रोजी सुनावणी ठेवली आहे.
****
राज्याचा काल जाहीर झालेला अतिरिक्त
अर्थसंकल्प राज्याचं उत्पन्न वाढवितानाच खर्च कमी करून सर्व घटकांना सर्वार्थानं पुढं
घेऊन जाणारा असल्यानं तो `सर्वजनहिताय सर्वजनसुखाय आहे`, अशी प्रतिक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी,
महिला, दिव्यांग, वंचित-उपेक्षितांना
खऱ्या अर्थानं न्याय देणाऱ्या योजना सादर करतानाच उद्योग आणि रोजगारनिर्मितीवर भर देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. देशातील सर्व राज्यांशी
तुलना करता महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चांगली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी
म्हटलं आहे.
****
अतिरिक्त अर्थसंकल्पात सरपंचांच्या
मानधनामध्ये लक्षणीय वाढ करण्याचं प्रस्तावित करुन त्यासाठी दोनशे कोटी रुपयांचा
निधी उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाचं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वागत
केलं आहे. यामुळं ग्रामविकासासाठी झटणाऱ्या सरपंचांना मोठं प्रोत्साहन मिळेल अशी प्रतिक्रीया
मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
****
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी
राज्य सरकार लवकरच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु करणार आहे. उद्योग विकास
आयुक्त डॉक्टर हर्षदीप कांबळे यांनी ही माहिती दिली. या योजनेखाली येत्या पाच वर्षात
10 लाख रोजगार निर्माण करायचे आहेत. उद्योग खात्याच्या या योजनेत
महिला उद्योजकांसाठी 30 टक्के आरक्षण असेल. उत्पादन क्षेत्रातल्या
मंजूर प्रकल्पांसाठी 50 लाख रुपये, आणि
सेवा क्षेत्रातल्या उद्योगासाठी 10 लाख रुपयांपर्यंत खर्चाच्या
प्रकल्पांना, या योजनेअंतर्गत वित्तीय सहाय्य दिलं जाईल,
असं उद्योग विकास आयुक्त डॉक्टर कांबळे यांनी सांगितलं.
****
राज्य सरकारनं अतिरिक्त अर्थसंकल्पात बारा बलुतेदारांना
कुठलीही सवलत दिली नसल्याचा तसंच इतर मागासवर्गीयांना न्याय हक्कांपासून वंचित ठेवल्याचा
आरोप करत बारा बलुतेदार महासंघानं आजपासून सरकारविरूद्ध जनजागरण आंदोलनाचा इशारा दिला
आहे. या आंदोलनाला आज सातारा जिल्ह्यातून सुरूवात करणार असल्याचं बाराबलुतेदार महासंघाचे
अध्यक्ष कल्याण दळे यांनी कळवलं आहे.
****
नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र
मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक आणि दिग्दर्शक
वेद राही यांना ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर यांच्या हस्ते काल नाशिक इथं प्रदान
करण्यात आला. नांदेड इथले अमृत तेलंग यांना, प्रथम क्रमांकाचा विशाखा काव्य पुरस्कार देण्यात
आला.
****
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची
संरक्षक भिंत पाडल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी सोमावरपासून पुकारलेला बंद अद्याप सुरू आहे. व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात दुचाकी वाहनफेरी काढत प्रशासनाविरुद्ध विविध घोषणा देऊन निषेध व्यक्त केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment